केरळमध्ये बोट बुडाल्याने 21 लोकांचा मृत्यू; महिला, लहान मुलांचा समावेश

Published

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा:

1. केरळमध्ये बोट बुडाल्याने 21 लोकांचा मृत्यू, महिला लहान मुलांचा समावेश

केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यात तुवलीथीरम बीच जवळ 30 प्रवाशांना घेऊन जाणारी एक हाऊसबोट बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 21 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार क्रीडा मंत्री व्ही.अब्दुरहिमान म्हणाले की विविध रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे 21 लोकांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने अनेक लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बोटीची सफर करत होते.

“अनेक पीडित बोटीत अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. बोट उलटल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून पीडितांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

2. सत्तासंघर्षाचा निकाल येत्या तीन चार दिवसांत येण्याची शक्यता

राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता आणि शिंदे गटातील आमदारांची अपात्रता याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ येत्या तीन-चार दिवसांत निर्णय देण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे याच आठवडय़ात निश्चित होण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांची धाकधूकही वाढली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून उद्धव ठाकरे यांनी केलेली हकालपट्टी आणि शिंदे यांनी या पदावर स्वत: ची केलेली नियुक्ती वैध आहे का, मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू की भरत गोगावले यांची नियुक्ती वैध, या मुद्दय़ांवर घटनापीठ निर्णय देणार आहे.

आतापर्यंत झालेल्या सुनावण्यांमध्ये अरुणाचल विधानसभा अध्यक्ष नबम रेबियाप्रकरणी प्रामुख्याने युक्तिवाद झाले.

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, तर त्यावर सभागृहात निर्णय होईपर्यंत त्यांना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देता येणार नाही, असा पाच सदस्यीय घटनापीठाचा निकाल आहे.

त्याचा फेरविचार करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण पाठवावे का, या मुद्दय़ाचा घटनापीठ विचार करणार आहे.

3. मी पुन्हा येईन, मी कसा येतो ते माहिती आहे- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय की मी पुन्हा येईन आणि मी कसा येतो ते तुम्हाला माहिती आहेच. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “कोर्टाचा निकाल काय येईल हे मी सांगू शकत नाही, पण देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा निकाल माहिती असेल त्याचमुळे पुन्हा येईन असं ते म्हणतायेत... जर त्यांना निकाल माहिती असेल तर ते काहीही बोलू शकतात..."

कोर्टाचा निकाल येणार याची लक्षणं दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबतची 'डिनर डिप्लोमसी' आणि मंत्र्यांच्या गोटात पसलेली अस्वस्थता असं सगळं वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

4. मणिपुरात लष्कराने 23,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं, कर्फ्यू काही काळासाठी शिथिल

मणिपुरात सध्या हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने आणि आसाम रायफल्सने 23,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं. लष्कराने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार बचाव मोहिम सुरू झाल्यावर हिंसाचाराची कोणतीच नवीन घटना घडली नाही. संचारबंदी सकाळी सात ते दहा या वेळात शिथील करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासापासून लष्कराने हवाई दक्षता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तसंच इम्फाळ भागात हेलिकॉप्टरने गस्ती घालण्याचे काम सुरू असल्याचं या बातमीत पुढे म्हटलं आहे.

बुधवारपासून मैती समुदायात संघर्ष उत्पन्न झाला असून आतापर्यंत या हिंसाचारात 54 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी सरकारने दिली आहे.

5.येत्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व महिलांचा समावेश करण्याची शिफारस

पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व महिलांचा समावेश असावा अशी शिफारस केंद्राने केली आहे. तसं पत्र लष्कराच्या तिन्ही विभागाला पाठवली असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. टाइम्स नाऊने ही बातमी दिली आहे.

दिल्लीतल्या कर्तव्य पथावर दरवर्षी परेड होते. 2023 मध्ये झालेल्या परेडमध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या रथांमध्ये नारी शक्ती ही मुख्य थीम होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)