You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ललित मोदींना दिलेलं नागरिकत्व रद्द करणारा 80 बेटांचा 'हा' देश आहे तरी कसा?
एरवी जगात फारसे कुणाला माहीत नसणारी ठिकाणं किंवा देश एखाद्या गोष्टीमुळे चर्चेत येतात. विशेषत: ती जर दूरवर महासागरात असणारी बेटं असतील तर त्यांची नावंदेखील फारशी परिचित नसतात. वानुअतु हा असाच एक चिमुकला देश ललित मोदी यांच्यामुळे चर्चेत आला आहे.
वानुअतु हा 80 हून अधिक बेटांचा एक द्वीपसमूह आहे. हा देश कधीकाळी न्यू हेब्रिड्स या नावानं ओळखला जात होता. 1980 मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनपासून हा द्वीपसमूह स्वंतत्र झाला होता.
सध्या हा देश चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे, ललित मोदी यांनी त्या देशाचं नागरिकत्व घेतलं होतं. मात्र, नंतर वानुअतुच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं की, ललित मोदी यांना देण्यात आलेलं नागरिकत्व ते परत घेत आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार वानुअतुचे पंतप्रधान जॉथम नापत यांनी एक वक्तव्यं जारी करत ललित मोदी यांना दिलेला पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले, "सिटिझनशिप आयुक्तांना मी तात्काळ प्रभावानं ललित मोदी यांना देण्यात आलेला पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत."
पंतप्रधान जॉथम नापत यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, ललित मोदी यांनी पासपोर्टसाठी दिलेल्या अर्जाचा बारकाईनं तपास करण्यात आला होता आणि त्यात ललित मोदी कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोषी असल्याचे पुरावे मिळाले नव्हते.
2009 मध्ये आयपीएलच्या टीव्हीवरील प्रसारणासंदर्भातील हक्कांच्या एका करारात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप ललित मोदी यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.
मे 2010 मध्ये ललित मोदी लंडनला निघून गेले होते. तेव्हा ललित मोदी आयपीएलचे चेअरमन होते. त्यानंतर बीसीसीआयनं त्यानं पदच्युत केलं होतं.
भारतीय पासपोर्ट केला सरेंडर
ललित मोदी यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात अर्ज केला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ही माहिती दिली होती.
रणधीर जायसवाल यांनी सांगितलं होतं की नियम आणि प्रक्रियांनुसार या अर्जाची छाननी केली जाईल.
ते पुढे म्हणाले होते, "आम्हाला ही देखील माहिती मिळाली आहे की ललित मोदी यांनी वानुअतु देशाचं नागरिकत्वं मिळवलं आहे. कायद्यानुसार त्यांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास आम्ही पुढे देखील सुरू ठेवू."
ललित मोदी यांचे वकील महमूद आब्दी यांनी देखील याला दुजोरा देत म्हटलं आहे की त्यांनी दक्षिण पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह असलेल्या वानुअतु देशाचं नागरिकत्वं घेतलं आहे.
नेमका कुठे आहे वानुअतु देश?
हा द्वीपसमूह दक्षिण पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आहे. 80 बेटांचा मिळून हा देश बनलेला आहे. याच्या बहुतांश बेटांवर मानवी वस्ती आहे. मात्र काही बेटांवर सक्रिय ज्वालमुखी देखील आहेत. वानुअतुचा बहुतांश प्रदेश डोंगराळ आहे.
या द्वीपसमूहाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे. हा सर्व भाग भूंकप आणि भरतीच्या लाटांच्या प्रभावाखाली असतो. 2015 मध्ये हा देश 'पाम' या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडला होता.
या चक्रीवादळामुळे वानुअतुचं मोठं नुकसान झालं होतं. या देशातील बेटांवर राहणारे बहुतांश लोक गावांमध्ये राहतात. शेती हेच त्यांचं प्रमुख उपजीविकेचं साधन आहे.
या देशातील चालीरिती खूप जुन्या आहेत. इथल्या स्थानिक परंपरा खूप मजबूत आहेत. इथे महिलांचं सामाजिक स्थान पुरुषांच्या तुलनेत खालचं असतं. त्यांना शिक्षणाच्या कमी संधी मिळतात.
बंजी जम्पिंगचं मूळ
सध्या जगभरात बंजी जम्पिंग हा साहसी खेळ अतिशय लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की या खेळाची प्रेरणा वानुअतुच्या धार्मिक विधींमधूनच मिळाली आहे.
बंजी जम्पिंगसारख्याच दिसणाऱ्या या लॅंड डायव्हिंगच्या कर्मकांडाला नांगोल म्हणतात. याच परंपरागत लॅंड डायव्हिंगच्या धार्मिक विधीतून बंजी जम्पिंग हा साहसी खेळ आला आहे.
1990 च्या दशकापासूनच वानुअतुची राजधानी अस्थिर राहिली आहे. या काळात तिथे अनेक वादग्रस्त आघाडी सरकारं सत्तेत आली आणि वारंवार पंतप्रधान बदलले गेले.
वानुअतुबद्दलची महत्त्वाची माहिती -
राजधानी: पोर्ट विला
क्षेत्रफळ: 12,189 चौ. किमी
लोकसंख्या: 3,07,800
भाषा: बिस्लामा, इंग्रजी, फ्रेंच
आयुर्मान: 68 वर्षे (पुरुष) 72 वर्षे (महिला)
वानुअतुचे नेते कोण आहेत?
जुलै 2022 मध्ये निकेनिके वुरोबारवु यांची वानुअतुच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. टॅलिस ओबेद मोसेस यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला होता.
निकेनिके पेशानं राजकारणी आणि मुत्सद्दी आहेत. त्यांनी अनेक राजनयिक आणि सरकारी पदांवर काम केलं आहे. ते फिजीमधील वानुअतुचे पहिले रेझिडेंट उच्चायुक्त होते.
वानुअतुमध्ये राष्ट्राध्यक्ष पद मुख्यत: औपचारिक पद मानलं जातं.
इश्माएल कलसाको हे या देशाचे पंतप्रधान आहेत.
ऑक्टोबर 2022 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान बॉब लॉघमॅन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.
त्यानंतर इश्माएल कलसाको यांना पंतप्रधान करण्यात आलं होतं.
वानुअतुमध्ये एकच टीव्ही चॅनल आहे. ते चॅनल रेडिओ फ्रान्स ओव्हरसीज (आरएफओ) च्या मदतीनं सुरू करण्यात आलं होतं. हे चॅनल फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत त्याचं प्रसारण करतं.
वानुअतुचा इतिहास काय आहे?
असं मानलं जातं की या देशात इसवीसनपूर्व 500 मध्ये मानवी संस्कृतीची सुरुवात झाली. 1606 मध्ये युरोपियन प्रवासी पहिल्यांदा या बेटांवर पोहोचले होते. 1774 मध्ये ब्रिटिश संशोधक आणि नाविक कॅप्टन कुक यांनी या बेटांना न्यू हेब्राइड्स असं नाव दिलं.
1800 च्या सुरुवातीला वानुअतुमधील हजारो लोकांचं अपहरण करून त्यांना फिजीमधील साखर आणि कापसाच्या शेतीच्या कामावर लावण्यात आलं. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंडमध्ये देखील त्यांना मोठ्या संख्येनं नेण्यात आलं.
अपहरणाच्या या काळाला ब्लॅकबर्डिंग असं म्हटलं जायचं आणि ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरू होतं. 1906 मध्ये हा देश ब्रिटन आणि फ्रान्सच्या संयुक्त अधिपत्याखाली आला. 1980 मध्ये हा देश राष्ट्रकुट देशांतर्गंत एक स्वतंत्र देश झाला.
2015 मध्ये या प्रदेशात आलेल्या 'पाम' या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळेचे देशाचे राष्ट्राध्यक्ष लांसडेल म्हणाले होते की हवामान बदल हे चक्रीवादळामागचं कारण आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.