You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वयाची तिशी, चाळीशी ओलांडलेल्या प्रौढ मुलांनी आई-वडिलांबरोबर राहावं की नाही?
काही दिवसांपूर्वी इटलीच्या उत्तर भागातील पेव्हिया शहरात एका 75 वर्षीय वृद्ध महिलेनं मुलांना घरातून बाहेर काढण्यासाठी न्यायलयात धाव घेतली होती.
त्यांच्या एका मुलाचं वय 40 वर्ष होतं तर दुसऱ्याचं 42 वर्षं. महिलेनं मुलांना अनेकदा वेगळं, स्वतंत्र राहायला सांगितलं पण ते ऐकत नसल्याचं या महिलेनं न्यायालयात सांगितलं.
त्यानंतर न्यायालयानं दोन्ही मुलांना 18 डिसेंबरपर्यंत घर रिकामं करण्यास सांगितलं आहे.
न्यायालयानं निर्णय देताना म्हटलं की, सुरुवातीला मुलांचं पालन-पोषण करणं आई वडिलांचं कर्तव्य असतं. त्यामुळं मुलं आई वडिलांबरोबर राहू शकतात. पण आता त्यांचं वय 40 पेक्षा जास्त झालं आहे, अशा परिस्थितीत हे कारण देता येणार नाही.
या निर्णयानंतर ज्या देशांमधील समाजात मुलांनी मोठं किंवा प्रौढ होताच आई वडिलांचं घर सोडायला हवं अशी अपेक्षा केली जाते, त्याठिकाणी एका नव्या चर्चेला किंवा वादाला सुरुवात झाली आहे.
मुलांनी नेमकं कोणत्या वयामध्ये आपल्या आई-वडिलांचं घर सोडून वेगळं राहणं सुरू करावं याबाबत चर्चा होत आहे. तसंच हा निर्णय वयाच्या आधारावर घेतला जावा की आर्थिक परिस्थितीच्या आधारावर याबाबतही चर्चा होतेय.
खरं म्हणजे, भारतासह अनेक देशांमध्ये एकाच घरात अनेक पिढ्यांनी राहणं ही अगदी सामान्य बाब आहे. पण काही देशांमध्ये मुलांनी प्रौढ बनल्यानंतर किंवा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्यानंतर आई-वडिलांपासून वेगळं राहावं अशी अपेक्षा केला जाते.
जे तसं करण्यात अपयशी ठरतात त्यांना सामाजिक दबाव आणि टोमण्यांचाही सामना करावा लागतो.
उदाहरण द्यायचं झाल्यास, इटलीमध्ये आई-वडिलांच्या घरी राहणाऱ्या प्रौढांची संख्या अधिक आहे.
बीबीसी साऊंडच्या 'वुमन्स आवर' या पॉडकास्टच्या प्रेझेंटर कृपा म्हणाल्या की, अशा लोकांना तिथं ‘बंबोचियोनी’ म्हणजेच ‘मोठी मुलं’ असं म्हणून चिडवलं जातं.
आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची परंपरा
हिमाचल प्रदेश विद्यापीठ, शिमला याठिकाणी सामाजिक शास्त्राच्या सहायक प्राध्यापक डॉक्टर स्नेह यांच्या मते, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये स्वावलंबन आणि स्वातंत्र्यावर अधिक जोर दिला जातो आणि मुलांना समाजात त्याच पद्धतीनं वावरण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं.
बीबीसीचे सहकारी आदर्श राठोड यांच्याशी बोलताना त्यांनी म्हटलं की, "पाश्चिमात्य देशांमध्ये मुलं प्रौढ बनल्यानंतर त्यांच्यापासून वेगळं राहण्याची परंपरा त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आहे."
"ही मुलं स्वतःची जबाबदारी सांभाळण्याइतपत मोठी झाली आहेत, असं समजलं जातं. तसंच मुलांनाही मोठं झाल्यानंतर स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना त्यांच्या जीवनात इतरांचा हस्तक्षेप नको असतो."
इटलीशी संबंधित बीबीसीच्या सहकारी पत्रकार एद्रियाना अरबानो यांनी 'वुमेन्स आवर' पॉडकास्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इटलीत बहुतांश प्रौढांनी दीर्घकाळ आई-वडिलांबरोबर राहण्याचं कारण आर्थिकच आहे.
29 वर्षीय अरबानो यांनी, त्यांच्या वयाची बहुतांश मुलं आई-वडिलांबरोबरच राहत असल्याचं सांगितलं.
"इटलीत मुलांनी दीर्घकाळ आई-वडिलांबरोबर राहणं ही अगदी सामान्य बाब आहे. त्यामागे सांस्कृतिक कारणांपेक्षा आर्थिक कारणं अधिक आहेत. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सहज मिळत नाहीत. त्यामुळं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत ते आई-वडिलांबरोबरच राहतात," असं त्यांनी सांगितलं.
आई-वडिलांबरोबर का राहतात प्रौढ मुलं?
'विमेन्स आवर' पॉडकास्टमध्ये या विषयावर एका श्रोत्यानं प्रतिक्रिया दिली होती. "पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांना घर सोडून जायला सांगितलं जातं. गावात अनेक पिढ्या एकत्र राहून एकमेकांची मदत करतात, ती परंपरा याठिकाणी मागे पडली आहे."
या महिलेचा जो अनुभव होता, साधारणपणे तशीच स्थिती भारतातही दिसते. फक्त गावांमध्येच नव्हे तर शहरांतही.
डॉक्टर स्नेह यांच्या मते, भारतात एकाच घरात अनेक पिढ्यांनी एकत्र राहण्यामागे, आर्थिक कारणांबरोबरच काही सांस्कृतिक कारणंही आहेत.
"अनेक पिढ्या एकत्र राहत असलेली एकत्र कुटुंब पद्धती भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. अशा कुटुंबांमध्ये सर्व सदस्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सुरक्षा मिळते. मोठे-ज्येष्ठ सदस्य कुटुंबातील लहान मुलांची काळजी घेतात आणि तरुण वृद्धांची काळजी घेतात," असं त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर प्रौढ बनल्यानंतरही अनेक लोकांना आई-वडिलांबरोबर राहावं लागतं याची अशी आणखीही अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे लग्नानंतर इथं नवरी सामान्यपणे सासरी जाऊन राहते. तसंच वारसा हक्काचं घर आणि मालमत्तेमुळंही लोक एकत्र राहतात, असं प्रोफेसर स्नेह यांनी सांगितलं.
आईवडिलांचे शोषण
दिल्ली उच्च न्यायालयातील वकील प्रणव घाबरू यांनी बीबीसीचे सहकारी आदर्श राठोड यांच्याशी बोलताना म्हटलं की, कायद्याचा विचार करता भारतात आई-वडिलांना मुलांचा सांभाळ ते प्रौढ होईपर्यंत करणं गरजेचं आहे.
"सामाजिक नियम वेगळे असू शकतात, पण कायद्यानुसार मुलं प्रौढ होईपर्यंत त्यांच्या आई-वडिलांकडून उदरनिर्वाहासाठी पैशांची मागणी करू शकतात," असं ते म्हणाले.
इटलीत वृद्ध महिला कोर्टात जाण्यामागचं कारण म्हणजे, तिला मुलांचा खर्च भागवणं अशक्य झालं होतं.
पत्रकार एद्रियाना अरबानो यांच्या मते, "महिलेची दोन्ही मुलं नोकरी करत होती पण ती घरखर्चात किंवा इतर कामांमध्येही मदत करत नव्हती. त्यामुळं आईसाठी ती ओझं बनली होती. हे प्रकरण आईला गृहित धरण्याचं किंवा आईला नोकरासारखी वागणूक देण्याचं आहे."
आई-वडिलांबरोबर असं वर्तन करण्याची प्रकरणं भारतातही वाढत आहेत. अॅडव्होकेट प्रणव घाबरू यांच्या मते, अनेक आई-वडील मुलांच्या वर्तनाला किंवा शोषणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिक लवादात ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत याचिका दाखल करत आहेत.
काही प्रकरणांत लोक त्यांच्या वृद्ध आई-वडिलांच्या मालमत्तेवर ताबा मिळवत आहेत किंवा त्यांची काळजी घेत नसल्याचं पाहायला मिळालं आहे, असं त्यांनी सांगितलं.
अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आई-वडील मुलांना त्यांच्या घरातून हाकलून देऊ शकतात किंवा त्यांच्याकडून उदर-निर्वाहासाठी भत्ता घेण्यासाठीही याचिका दाखल करू शकतात, असंही अॅडव्होकेट प्रणव यांनी सांगितलं.
त्यासाठी सीआरपीसीच्या कलम 125 आणि मेन्टेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स अॅक्ट अशा कायदेशीर पर्यायांचीही मदत घेता येऊ शकते, असंही ते म्हणाले.
योग्य पर्याय कोणता?
इटलीच्या घटनेची अधिक चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, आई-वडिलांनी मुलांना घरातून हाकलून देणं ही सर्वच प्रकारच्या समाजांमध्ये एक असामान्य घटना समजली जाते.
लखनऊतील मानसोपचार तज्ज्ञ राजेश पांडे यांच्या मते, आई-वडिलांना मुलांवर कायम प्रेम करत राहावं आणि विनाअट त्यांची काळजी घेत राहावी, अशी समाजाची अपेक्षा असते.
शिमल्याच्या हिमाचल प्रदेश विद्यापीठातील प्रोफेसर डॉक्टर स्नेह यांनी भारताचं उदाहरण देत म्हटलं की, याठिकाणी लोकांच्या जीवनावर सामाजिक प्रभाव अधिक असतो.
हेही वाचलंत का?
हा व्हीडिओ पाहिलात का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.