You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ind vs Ban : बांगलादेशचा भारतावर एका विकेटने थरारक विजय
शाकीब अल हसनची गोलंदाजी आणि अखेरीस शेवटच्या जोडीने चिवटपणे संघर्ष करत पहिल्या वनडे सामन्यात भारतावर एका विकेटने विजय मिळवला आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. शकीब उल हसनने 5 तर एबादत हुसेनच्या 4 विकेट्सच्या बळावर बांगलादेशने भारताचा डाव 186 धावांतच गुंडाळला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशनेही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या पण मेहदी हसन मिराझ आणि मुस्ताफिझूर रहमान यांनी शेवटच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला नामोहरम केलं. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताविरुद्ध विजयासाठी 187 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था 136/9 अशी झाली होती. पण मेहदी हसन मिराझ आणि मिस्ताफिझुर रहमान या शेवटच्या जोडीने 51 धावांची थरारक भागीदारी करत दिमाखदार विजय मिळवून दिला.
मेहदी हसन मिराझने 39 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 38 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुस्ताफिझूरने नाबाद 10 धावा करत मेहदीला तोलामोलाची साथ दिली.
मेहदी-मुस्ताफिझूरची 51 धावांची भागीदारी ही वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शेवटच्या विकेटसाठीची चौथी सर्वोत्तम भागीदारी आहे. तसंच बांगलादेशसाठी वनडेमध्ये शेवटच्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागिदारी आहे.
के. एल. राहुलचं अर्धशतक
भारतातर्फे के.एल.राहुलने 73 धावांची खेळी केल्याने सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. शिखर धवन (7), विराट कोहली (9) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शकीब उल हसनने 36 धावांत 5 तर एबादतने 47 धावात 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशने सातत्याने विकेट्स गमावल्या. शकीब उल हसन आणि मुशफकीर रहीम हेही झटपट तंबूत परतले. आठव्या क्रमांकावर फलंदीजीला आलेल्या मेहदीने विजयासाठी विश्वास जागवला. अकराव्या क्रमांकाचा फलंदाज मुस्ताफिझूरला हाताशी घेत मेहदीने भारतीय संघाचे जिंकण्याचे मनसुबे धुळीस चारले. पदार्पणवीर कुलदीप सेनने 2 विकेट्स घेतल्या. सिराजने 32 धावांत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने 17 अतिरिक्त धावा दिल्या, त्याही पराभवाचं कारण ठरल्या.
बांगलादेशात पाचवा पराभव
भारताचा बांगलादेशात झालेला हा पाचवा पराभव आहे. ट्वेन्टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत दारुण पराभवानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला. पावसामुळे त्या मालिकेचा खेळखंडोबा झाला. त्यानंतर लगेचच ही मालिका सुरू झाली.
रोहित शर्मा, विराट कोहली हे प्रमुख खेळाडू परतल्यानंतरही भारतीय संघाच्या कामगिरीत बदल झाला नाही. या सामन्याआधी भारतीय संघाने यष्टीरक्षक ऋषभ पंतला मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतला. अक्षर पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
पंतच्या अनुपस्थितीत राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. मोहम्मद शमीची या मालिकेसाठी निवड झाली होती पण खांद्याच्या दुखापतीमुळे तोही मालिकेबाहेर गेला. उमरान मलिकला त्याच्याऐवजी संधी मिळाली. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा गंभीर दुखापतीतून सावरत असल्याने ते या मालिकेचा भाग नाहीत.
कुलदीप सेनचं पदार्पण
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने फास्ट बॉलर कुलदीप सेनला पदार्पणाची संधी दिली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या मध्य प्रदेशच्या कुलदीपला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका तयारीची सुरुवात मानली जात आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कुलदीपने चांगली कामगिरी केली होती. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय अ संघाचाही तो भाग होता. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये झालेल्या मालिकेत कुलदीप संघाचा भाग होता.
बीसीसीआयने जारी केलेल्या ट्वीटनुसार ऋषभ पंतला वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीये. त्याच्याऐवजी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. आजच्या लढतीत के.एल.राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. आजच्या लढतीसाठी अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पावसाने खेळखंडोबा घातला होता. न्यूझीलंड मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलील विश्रांती देण्यात आली होती. बांगलादेश मालिकेसाठी या दोघांचं संघात पुनरागमन झालं आहे.
बांगलादेशलाही दुखापतींचा फटका बसला आहे. नियमित कर्णधार तमीम इक्बाल मालिकेत खेळू शकणार नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत लिट्टन दासकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भारत
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
बांगलादेश
लिट्टन दास, अनामूल हक, नजमुल हुसेन शंटो, शकीब उल हसन, मुशफकीर रहीम, महमदुल्ला, अतिफ होसेन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, मुस्ताफिझूर रहमान, इबादत होसेन.