'जेन झी' आंदोलनाची झळ भाजप नेत्यांच्या घरापर्यंत; मुलीच झाल्या 'बंडखोर'

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर 30 जून 2026 रोजी सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक समर्थक तेथे जमले होते.
फोटो कॅप्शन, नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर 30 जून 2026 रोजी सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक समर्थक तेथे जमले होते.
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 37 दिवस चाललेल्या 'जेन झी' आंदोलनात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींनी आपली भूमिका मांडत आंदोलनाला समर्थन दिले होते. त्याचवेळी काही भाजप नेत्यांच्या मुलींनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला त्याचीही चर्चा सुरू आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मुरली मनोहर जोशी हे शिक्षणमंत्री होते. 23 जुलै रोजी त्यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांच्या कठोर वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

"महिलांवर इतक्या कठोर पद्धतीने बळाचा वापर झाल्याचे पाहून मला खूप वेदना झाल्या," असं मुरली मनोहर जोशी म्हणाले होते.

परंतु, हा विषय इथेच थांबला नाही. आसाम गण परिषदेच्या (एजीपी) एका मंत्र्यांची मुलगी, ओडिशातील भाजपच्या एका वरिष्ठ खासदारांची मुलगी आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या एका माजी आमदारांची मुलगी यांनीही जेन झी आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला.

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. समर्थकांनी हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे सांगत जल्लोष केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. समर्थकांनी हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे सांगत जल्लोष केला.

कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनाचा परिणाम भाजप नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू होती. आंदोलनाचे समर्थक भाजप नेत्यांच्या घरीही दिसले, आणि त्यांच्या मुलीही आंदोलनात सहभागी झाल्या.

दिल्लीतील जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 23 जुलै रोजी गुवाहाटी येथेही आंदोलन झाले. त्यामध्ये आसाम सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि एजीपीचे नेते केशव महंत यांची मुलगी दिबिसाही यात सहभागी झाली होती.

मागील आठवड्यात शनिवारी (25 जुलै) ओडिशातील भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता सचिन राहरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आनंद व्यक्त करणारी ती पोस्ट असल्याचे मानले गेले.

उत्तर प्रदेशामधील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह ही देखील सोशल मीडियावर पक्षावर टीका करत करताना दिसल्या. या तिघीही जेन-झी पिढीतील आहेत. म्हणजेच त्यांचा जन्म साधारणपणे 1997 ते 2012 या काळात झाला आहे.

यशस्विनी सिंह

यशस्विनी सिंहने 29 जुलै रोजी या विषयावर कतारच्या अल जझीरा वृत्तवाहिनीला आपली भूमिका सांगितली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बोलताना यशस्विनी म्हणाली, "धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सर्व काही संपलं, असं मानणं चुकीचं आहे. त्यांच्या राजीनाम्यात खेद किंवा जबाबदारीची भावना कुठेच दिसत नाही. उलट त्यांचा सूर असा काही आहे, की जणू काही त्यांनी मोठं बलिदानच दिलं आहे."

यशस्विनी सिंह म्हणाली, "सीजेपीने राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या अनेक लोकांना एकत्र आणण्याचं खूप चांगलं काम केलं. त्यांनी वेगळ्या पद्धतीचे संदेश, मीम्स आणि सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून अनेकांपर्यंत आपला मुद्दा पोहोचवला."

"त्यांचा मुख्य भर इन्स्टाग्रामवर होता आणि त्यामुळे आंदोलनाची माहिती सामान्य लोकांपर्यंत तिथे मोठ्या प्रमाणात पोहोचली. आता नव्या शिक्षणमंत्र्यांची झालेली नियुक्ती पाहिली, तर मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की, हा एक अत्यंत वाईट विनोद आहे."

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी 25 जुलै 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या समर्थकांनी जल्लोष केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी 25 जुलै 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या समर्थकांनी जल्लोष केला.

आपले वडील भाजपमध्ये असताना आपण मात्र वेगळी भूमिका का घेतली, यावर यशस्विनी म्हणाली, "मी ढोंगी आहे, असं मला वाटत नाही. मी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून नाही. मी स्वकमाईवर राहते. गेली साडेतीन वर्षे मी भारतात स्वतंत्रपणे राहत आहे."

"अशा प्रकारच्या वातावरणापासून दूर राहण्याचा पर्याय मी निवडला आहे. अनेक वर्षांपासून मी फतेहपूरला गेलेली नाही. त्या सर्वांपासून मी जाणीवपूर्वक अंतर ठेवते. त्यामुळेच मला माझी भूमिका मांडताना ढोंगीपणा किंवा खोटपणा वाटत नाही."

विक्रम सिंह हे उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आहेत. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभव झाला. आजही ते फतेहपूरमध्ये भाजपचे सक्रिय नेते म्हणून कार्यरत आहेत.

दिबिसा महंता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आसाम सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि आसाम गण परिषदेचे (एजीपी) ज्येष्ठ नेते केशव महंत यांची मुलगी दिबिसा महंत ही गुवाहाटीतील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर चर्चेत आली. सोशल मीडियावरील अनेक व्हीडिओंमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देताना दिसते.

केशव महंत हे आसाममधील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तानुसार, "दिबिसाने गेल्या वर्षी ब्रिटनमधून दोन पदव्युत्तर पदव्या पूर्ण केल्या आहे. व्हीडिओंमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देताना आणि 'न्याय द्या' अशी मागणी करताना दिसून येते."

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये दिबिसा म्हणते, "तेथे जे काही घडलं, ते खूप दुःखद होतं. तिथे झालेल्या हिंसाचारामुळे मला खूप वाईट वाटलं. ते शब्दांत सांगता येणार नाही. विद्यार्थ्यांना फक्त शांततेत आंदोलन करायचं होतं. पण परिस्थिती हिंसक बनली. लाठीचार्ज झाला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या."

"तरीही त्या दिवशी आंदोलनासाठी तिथे उपस्थित आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मला अभिमान आहे. त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच मलाही इथे येऊन त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची प्रेरणा मिळाली."

भुवनेश्वर येथील भाजप खासदार अपराजिता सारंगी

फोटो स्रोत, @AprajitaSarangi

फोटो कॅप्शन, भुवनेश्वर येथील भाजप खासदार अपराजिता सारंगी

भाजप सरकारविरोधातील आंदोलनात स्वतःच्या मंत्र्यांची मुलगी सहभागी झाल्याबद्दल गेल्या रविवारी (26 जुलै) आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, "माझी मुलं काय बोलतात, यासाठी मी कसा जबाबदार असू शकतो?"

"माझा स्वतःचा भाऊही अनेकदा माझ्याशी सहमत नसतो. माझी मुलंही माझ्या प्रत्येक मताशी सहमत नसतात. इथे उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांचे आई-वडील भाजपचे समर्थक आहेत, पण ते स्वतः भाजपविरोधात व्हीडिओ बनवतात."

"ती मोदीजींविरोधात बोलली, याचं मला दुःख आहे. जर कधी तिची भेट झाली, तर मी तिच्याशीही याबद्दल नक्की बोलेन."

ते म्हणाले होते की, "उद्या माझा मुलगाही काही चुकीचं बोलला, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. तो पुढे वकील होईल आणि कदाचित मला न आवडणाऱ्या लोकांची तो बाजूही मांडेल."

"मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या कृतीसाठी आई-वडिलांना जबाबदार धरू नये. ती जे बोलली ते चुकीचं होतं, त्याबद्दल आम्ही तिच्याशी बोलू. त्यासाठी तिच्या वडिलांना का त्रास द्यायचा?"

भाजप खासदार अपराजिता सारंगी यांच्या मुलीची पोस्ट चर्चेत

भुवनेश्वरच्या भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता सचिन राहरच्या एका सोशल मीडिया पोस्टचीही मोठी चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, या पोस्टमुळे ओडिशातील भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

अर्चिता राहरने इन्स्टाग्रामवर तिरंग्याच्या इमोजीसह, "जय हिंद! नीट पेपरफुटी प्रकरणावर झालेल्या विद्यार्थांच्या तीव्र आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला," अशी पोस्ट केली होती.

दुसरीकडे, आई अपराजिता सारंगी यांच्यासह ओडिशातील भाजपच्या अनेक नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अर्चिता राहरच्या पोस्टवर भाजपच्या काही नेत्यांनी टीका केली. भाजप नेते जगन्नाथ प्रधान म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे सुपुत्र आहेत. त्यांच्या राजीनाम्याचं आम्हाला दुःख आहे. ओडिशाच्या जनतेनं बिहारच्या कन्येला (अपराजिता सारंगी) स्वीकारलं आणि त्यांना दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिलं."

ते म्हणाले, "अपराजिता सारंगी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर नियंत्रण ठेवायला हवं. त्यांच्या मुलीने धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांनी ओडिशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे."

ग्राफिक्स

आपल्या मुलीच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून वाद निर्माण झाल्यानंतर अपराजिता सारंगी यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी ही पोस्ट चुकून शेअर झाली होती, असं सांगितलं.

यानंतर अर्चिताने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यात तिने लिहिलं की, "डीपी यांच्या पीएसाठी सांगते, ते माझ्या आईला मेसेज करून ही स्टोरी काढायला सांगतील (जसं याआधीही घडलं आहे). पण काळजी करू नका, मी ही स्टोरी हटवणार नाही. जय जगन्नाथ! जय हिंद!"

परंतु, काही वेळाने ही स्टोरी हटवण्यात आली.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या पोस्टबाबत खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या की, "अर्चिता जेन-झी पिढीतील आहे. तिने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत ही स्टोरी शेअर केली होती. जेव्हा मी तिच्याशी बोलले तेव्हा तिला तिची चूक लक्षात आली आणि तिने ती स्टोरी डिलीट केली."

त्या म्हणाल्या, "अर्चिताने मला सांगितलं की, ती स्टोरी चुकून पोस्ट झाली होती. त्यावेळी मी ओडिशातील माझ्या मतदारसंघात होते, तर ती दिल्लीमध्ये होती."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

गेल्या शनिवारी रात्री अपराजिता सारंगी यांनीही एक्सवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत पोस्ट केली होती.

त्यांनी लिहिलं होतं की, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यासाठी मोठं धैर्य लागतं. या कठीण काळात मी त्यांच्या पाठीशी आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देते. भगवान जगन्नाथ यांची कृपा त्यांच्यावर सदैव राहो."

ओडिशा केडरच्या माजी आयएएस अधिकारी असलेल्या अपराजिता सारंगी या नोव्हेंबर 2018 मध्ये भाजपमध्ये गेल्या. त्यांच्या प्रवेशात धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

अपराजिता सारंगी यांनी नवी दिल्ली येथे पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते.

त्यावेळी तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ओडिशाचे भाजप अध्यक्ष बसंत पांडा आणि पक्षाचे ओडिशा प्रभारी अरुण सिंह हे देखील उपस्थित होते.

1994 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी असलेल्या अपराजिता सारंगी या 2013 ला केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.