सुजय विखेंसमोर बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबत आक्षेपार्ह विधान; संगमनेरमध्ये गाड्यांची जाळपोळ

सुजय विखे पाटील आणि डॉ. जयश्री थोरात

फोटो स्रोत, Facebook

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

माजी खासदार सुजय विखेंच्या व्यासपीठावरून वसंत देशमुख नामक व्यक्तीने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीवर आक्षेपार्ह शब्दात भाष्य केलं. यानंतर वादाला तोंड फुटलं आहे.

अहमदनगरमधील संगमनेरमध्ये धांदरफळ गावात भाजपनं युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. तिथं भाजपचे माजी खासदार सुजय विखे हजर होते. या सभेत हा वादग्रस्त वक्तव्याचा प्रकार घडला.

वसंत देशमुखच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे थोरात समर्थकांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान संगमनरेमध्ये जाळपोळीची घटना घडली.

एका बाजूला, या वक्तव्याबद्दल गुन्हा नोंद व्हावा यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले, तर दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील यांनी 'मी हे वक्तव्य रोखण्याचा प्रयत्न केला असं म्हणत या वक्तव्याचा निषेध केला आहे.

त्यासोबत गाड्या जाळून हिंसाचार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि रॅली-सभांना वेग आला आहे.

अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विखे-पाटील आणि थोरात या दोन कुटुंबामधील राजकीय संघर्ष हा तिसऱ्या पिढीपर्यंत घडताना दिसत आहे.

संगमनेर मतदारसंघातून विजय उर्फ बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यामधील राजकीय वाकयुद्ध चांगलंच रंगात आलं आहे.

एरव्ही हे दोघेही एकमेकांवर फारसे आरोप करताना दिसलेले नाहीत. मात्र, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील वाकयुद्ध चर्चेस कारण ठरले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मेळाव्यात नेमकं काय घडलं?

संगमनेरमधील राजकीय पार्श्वभूमीवर, आमदारकीच्या उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात जयश्री थोरातांना उत्तर देताना भाजपचे कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि एकूणच थोरात कुटुंबावर टीका केली. त्यासोबतच त्यांनी जयश्री थोरातांना लक्ष्य करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

या वक्तव्यानंतर धांदरफळमधील त्या सभेतच मोठा गोंधळ पहायला मिळाला. वसंत देशमुख यांच्या अश्लाघ्य विधानानंतर काँग्रेसच्या स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या सभास्थळी दाखल झाल्या.

या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर चढल्या आणि त्यांनी ठिय्या माडंत वसंत देशमुखांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद विधानाबाबत माफीची मागणी लावून धरली.

जयश्री थोरात

फोटो स्रोत, Facebook/Jayashree Thorat

फोटो कॅप्शन, जयश्री थोरात

त्यानंतर तणाव वाढतच गेला. मिळालेल्या माहितीनुसार, या गोंधळामध्ये काहींनी सभास्थळी असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच काही गाड्यांना आगही लावली.

वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा, यासाठी रात्री उशीरा माजी आमदार सुधीर तांबे आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं.

पहाटे हा गुन्हा नोंद झाल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सभास्थळी असलेल्या वाहनांवर दगडफेक करून गाड्यांची तोडफोड झाली असल्याने त्या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या, संपूर्ण संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण अत्यंत तणावाचे बनले आहे.

काय म्हणाले सुजय विखे-पाटील?

माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी या घटनाक्रमाबद्दल आपली बाजू मांडली आहे. त्यांनी आपल्या मेळाव्याच्या स्टेजवरुन झालेल्या वक्तव्याचा निषेध केला व त्याविरोधात कारवाईची मागणीही केली.

मात्र, त्यासोबतच ज्यांनी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करुन गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली, त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली.

सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "वसंतराव देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते नसून धांदरफळ गावातले स्थानिक रहिवासी आहेत. स्थानिक आमदारांचे परंपरागत विरोधक असल्याने ते स्टेजवर होते.

सुजय विखे-पाटील

फोटो स्रोत, Facebook/Sujay Vikhe Patil

फोटो कॅप्शन, सुजय विखे-पाटील

त्यांचं भाषण लांबल्यामुळे त्यांना स्टेजवरील इतर लोक थांबण्याची विनंती करत होते. मात्र, 'मला बोलू द्या' अशी विनंती ते करत राहिले. ज्येष्ठ व्यक्ती बोलत असल्याने आम्ही त्यांना आणखी पाच मिनिटे बोलू दिलं. मी खाली पाहून माझ्या भाषणाचे मुद्दे लिहित असताना शिट्ट्या आणि टाळ्यांचे आवाज येऊ लागले. त्यानंतर मी त्यांना बसा म्हणालो आणि माझ्या भाषणासाठी उठलो."

पुढे ते म्हणाले की, "संपूर्ण सभा संपल्यानंतर मी निघत असताना स्टेजवर काही गोंधळ पहायला मिळाला. त्यावेळी मला नेमकं वक्तव्य काय आहे ते कळाले. मी त्या वक्तव्याचा निषेध करणारच होतो, इतक्यात जाळपोळ सुरु झाली.

महायुतीची जेवढ्या गाड्या होत्या त्या फोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या. आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो. ज्यांनी ते वक्तव्य केलं त्यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाने जरुर कारवाई करावी. मात्र, त्यानंतर ज्यांनी ही दंगल घडवायचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी."

राजकीय आरोप आणि टीका

या घटनाक्रमानंतर आमदार आणि डॉ. जयश्री थोरातांचे मामेभाऊ सत्यजीत तांबे यांनी सुजय विखे-पाटील यांच्यावर टीका करताना आपल्या 'एक्स' अकाऊंटवर लिहिलंय की, "सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे.

आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच."

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटलं आहे की, "भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. त्यांनी देखील या विधानाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती. त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना."

विखे-थोरात कुटुंबाच्या राजकीय संघर्षात उतरली तिसरी पिढी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात परंपरागत विरोधक राहिले आहेत. दोघे जेंव्हा काँग्रेस पक्षात एकत्र होते तेंव्हाही हा संघर्ष कायम होताच, शिवाय आता विखे भाजपमध्ये गेल्यानंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

विखे आणि थोरात या दोन्हीही मातब्बर कुटुंबांचे मतदार संघ एकमेकांना लागूनच आहेत. दोघांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत प्रबळ असा विरोधक राहिलेला नाही.

मात्र, जे काही विरोधक असतील त्यांना एकमेकांच्या विरोधात बळ देण्याचा प्रयत्न दोघांकडूनही केला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात उभे राहिलेल्या निलेश लंके यांना बाळासाहेब थोरात यांनी याचप्रकारे बळ दिलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण राजकारण नेहमीच घराणेशाहीचे राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहात्याचे (लोणी) विखे पाटील आणि संगमनेरचे थोरात ही दोन प्रमुख घराणी या जिल्ह्यातील राजकारणामध्ये वर्चस्व ठेवून आहेत.

सहकारमहर्षी पद्मश्री (कै.) विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने विखे पाटील कुटुंबातील चौथी पिढी आता राजकारणात आहे; तर दुसऱ्या बाजूला संगमनेरवर आधी भाऊसाहेब थोरात व पुढे बाळासाहेब थोरात यांची घट्ट पकड आहे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात

फोटो स्रोत, Facebook

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या निलेश लंके यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

त्यानंतर आता विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातूनच त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेल्या टीकेवर जयश्री थोरात यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर वाकयुद्ध सुरु झाले होते.

त्या वाकयुद्धादरम्यानच आता वसंतराव देशमुख यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भडका उडाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)