कोणते आमदार सर्वात श्रीमंत, सर्वात गरीब आणि कोणावर सर्वाधिक गुन्हे?

पराग शाह, प्रशांत ठाकूर आणि मंगल प्रभात लोढा

फोटो स्रोत, Facebook/ Mangal Prabhat Lodha, Prashant Thakur & Parag Shah

फोटो कॅप्शन, पराग शाह, प्रशांत ठाकूर आणि मंगल प्रभात लोढा
    • Author, रेणुका कल्पना आणि जास्मिन निहालानी
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार असून आता सत्ता स्थापनेसाठीची लगबग सुरू झाली आहे.

त्यातच विधानसभेत निवडून आलेल्या 286 आमदारांपैकी 277 म्हणजे 97 टक्के आमदार करोडपती असल्याचं समोर आलंय.

याबद्दलचा एक अहवाल असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं मंगळवारी 26 नोव्हेंबरला प्रकाशित केला. आमदारांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या स्वाक्षरी असलेल्या शपथपत्रावरून ही माहिती घेण्यात आलीय.

करोडपतींच्या यादीत सर्वाधिक म्हणजे 132 आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षातले 129 म्हणजे 98 टक्के उमेदवार आहेत. तसंच, शिवसेनेतले 57 पैकी 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 41 पैकी सगळे आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत.

तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या 20 पैकी 19, काँग्रेसच्या 16 पैकी 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 पैकी 7 आमदारांची नावंही या यादीत जोडली आहेत.

जन सुराज्य शक्ती आणि समाजवादी पक्षातून निवडून आलेले प्रत्येकी दोन आमदारही कोट्यवधींचे मालक आहेत.

विधानसभेवर निवडून आलेल्यांपैकी सर्वाधिक श्रीमंत 10 आमदार कोणते?
फोटो कॅप्शन, सर्वाधिक श्रीमंत आमदार कोण?

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही एक 'नॉन प्रॉफिट' तत्त्वावर चालणारी गैर सरकारी संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी ही संस्था संलग्न नाही. वेगवेगळ्या अहवालांच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रक्रियेत आणि राजकारणाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणणं हा या संस्थेचा उद्देश आहे.

अहमदाबादच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधल्या काही प्राध्यपकांनी एकत्र येऊन 1999 ला या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर लगेचच संस्थेने दिल्लीच्या उच्च्य न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली.

त्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची गुन्हेविषयक, आर्थिक आणि शैक्षणिक माहिती जाहीर करण्याची विनंती केली होती. या याचिकेवरूनच सुप्रीम कोर्टाने 2003 पासून सगळ्या उमेदवारांना ही माहिती असणारं शपथपत्र निवडणूक आयोगाकडे जमा करणं बंधनकारक केलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सर्वात श्रीमंत 10 आमदार कोणते?

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स जाहीर केलेल्या ताज्या अहवालात सर्वाधिक श्रीमंत 10 आमदारांची यादी दिलेली आहे.

या यादीतले पहिले तीनही आमदार भाजपकडून मुंबई आणि आसपासच्या भागात निवडून आले आहेत. त्यात 3,383 कोटी रुपये इतकी संपत्ती असणाऱ्या पूर्व घाटकोपर मतदारसंघातून निवडून आलेल्या पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे.

त्यानंतर 475 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पनवेलच्या प्रशांत ठाकूर यांचा आणि 447 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह मलाबार हिल मतदार संघातून निवडून आलेल्या मंगल प्रभात लोढा यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो.

याशिवाय भाजपच्या आणखी दोन आमदारांची नावे या यादीत आहेत. नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातल्या समीर मेघे आणि नांदेडच्या नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचे नाव अनुक्रमे सातव्या आणि नवव्या क्रमांकावर येतं. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 261 कोटी रुपये आणि 212 कोटी रुपये एवढी भरते.

पराग शाह

फोटो स्रोत, Facebook/Parag Shah

फोटो कॅप्शन, सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या आमदारांच्या यादीत पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे.

या यादीत शिवसेनेचे दोन आमदार आहेत. चौथ्या क्रमांकावर असणारे प्रताप सरनाईक ठाण्याच्या ओव्हाळ माजीवाडा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांच्याकडे साधारण 333 कोटी रुपये संपत्ती असल्याची नोंद आहे.

याशिवाय महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं नाव यादीत आठव्या क्रमांकावर आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिवच्या परांदा मतदारसंघातून पुन्हा निवडून आलेल्या सावंतांची संपत्ती 235 पेक्षाही जास्त आहे.

यादीत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आणि पळूस कडेगावचे काँग्रेसकडून निवडून आलेले विश्वजीत कदम येतात.

तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा दहावा क्रमांक येतो.

असं असलं तरी, आयकर परताव्यानुसार सर्वाधिक संपत्ती असलेल्या तीन आमदारांमध्ये पराग शाह यांच्यानंतर रोहित पवार आणि कराडच्या डॉ. अतुल भोसले यांचं नाव येतं.

सर्वात कमी संपत्ती असलेले 10 आमदार कोणते?

सगळ्यात कमी संपत्ती असलेले आमदार म्हणून अहवालात साजिद पठाण यांचं नाव लिहिलं आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातून ते काँग्रेसकडून निवडून आलेत. त्यांच्याकडे फक्त 9,00,379 रुपये एवढी संपत्ती असल्याची नोंद आहे.

त्यापुढे वाशिमचे शाम खोडे आणि सांगलीच्या जत मतदार संघाचे गोपिचंद पडळकर हे दोन भाजपचे आमदार येतात. त्यांची एकूण संपत्ती अनुक्रमे 35 लाख रुपये आणि 65 लाखांच्या वर आहे. याशिवाय 94 लाख रुपये संपत्तीसह किसन वानखेडे हे भाजपचे आमदारही या यादीत नवव्या क्रमांकावर येतात.

सर्वात कमी संपत्ती असलेले 10 आमदार कोणते?

शिवसेनेच्या आमदारांपैकी दोन आमदार या यादीत येतात. चौथ्या क्रमांकावर असणारे संगमनेर मतदारसंघातले अमोल खटाळ 66 लाख रुपये तर दहाव्या क्रमांकावर असणारे पालघरच्या भोईसर मतदारसंघाचे विलास तारे 1 कोटी 6 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

सगळ्यात कमी संपत्ती असलेले आमदार म्हणून या अहवालात साजिद पठाण यांचं नाव नमूद आहे.

फोटो स्रोत, Facebook/Sajid Khan Pathan

फोटो कॅप्शन, सगळ्यात कमी संपत्ती असलेले आमदार म्हणून या अहवालात साजिद पठाण यांचं नाव नमूद आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकच उमेदवार, उमरगाचे प्रविण स्वामी या यादीत आहेत. सातव्या क्रमांकावर 82 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची नोंद त्यांच्याकडे आहे.

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या राजकीय पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दूल खालीक मालेगाव मतदारसंघातून पुन्हा निवडून आलेत. त्यांच्याकडे 75 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची नोंद झाल्याने त्यांचा सर्वाधिक गरी आमदारांच्या यादीत त्यांचा क्रमांक पाचवा आहे.

याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले डहाणू मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांच्याकडे जवळपास 82 लाख रुपयांची संपत्ती आहे. यादीत त्यांचा क्रमांक सहावा येतो.

तर तासगान कवठे महंकाळ मतदारसंघातून निवडून आलेले रोहित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या यादीतले एकमेव आमदार आहेत. त्यांच्याकडेही सुमारे 86 लाख रुपयांच्या संपत्ती असल्याचं हा अहवाल सांगतो.

पुन्हा निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती किती वाढली?

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 288 पैकी 182 आमदारांना दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाल्याचं या अहवालात सांगितलं आहे.

त्यात भाजपचे 88, शिवसेनेचे 34, राष्ट्रवादी काँग्रेसचे 31, काँग्रेसचे 10, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9, शरद पवारांच्या पक्षाचे 3, समाजवादी पक्षाचे 2 तर जन सुराज्य शक्ती, एआयएमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, भारतीय समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

पुन्हा निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती किती वाढली?
फोटो कॅप्शन, पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीची पक्षनिहाय सरासरी

2019 मध्ये भाजपच्या आमदारांच्या संपत्तीची सरासरी 32 कोटी रुपयांपर्यंत होती. त्यात पाच वर्षात 142.18 टक्क्यांची भर पडली. 2024 ला ही सरासरी 78 कोटी रुपये इतकी भरते.

भाजपच्या अर्धी म्हणजे 71 टक्के वाढ काँग्रेसच्या खात्यात जमा झालीय. 2019 ला काँग्रेसच्या 10 आमदारांकडे सरकारी 38 कोटी रुपयांची संपत्ती होती. 2024 मध्ये त्यात 28 कोटी रुपयांची भर पडली आहे.

तसंच, शिवसेनेच्या आमदारांच्या संपत्तीत 17 कोटी रुपयांची म्हणजे 79 टक्क्यांनी वाढ झालीय. त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही 66 टक्के वाढ कमावलीय.

विनोद निकोले यांच्याकडे 2019 केवळ 51 हजार रुपयांची संपत्ती होती.

फोटो स्रोत, Facebook/Vinod Nikole

फोटो कॅप्शन, विनोद निकोले यांच्याकडे 2019 केवळ 51 हजार रुपयांची संपत्ती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संपत्तीत 70 टक्क्यांची तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संपत्तीत 66 टक्क्यांची वाढ झाल्याचं अहवाल सांगतो.

राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे एकमेव आमदार आहेत ज्यांच्या संपत्तीत घट झालेली दिसते. 2019 साली अर्ज भरताना त्यांनी 149 कोटी रुपयांच्या संपत्ती असल्याचं सांगितलं होतं.

मात्र, 2024 ला भरलेल्या अर्जात 92 कोटी रुपयांचीच नोंद आहे. म्हणजे त्यांची संपत्ती 38 टक्क्यांनी कमी झाली असावी असं आकडेवारी सुचवते.

डहाणूतून निवडून आलेल्या कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या विनोद निकोले यांच्याकडे 2019 केवळ 51 हजार रुपयांची संपत्ती होती. गेल्या पाच वर्षात त्यात 15956.15 टक्क्यांची वाढ दिसते. म्हणजे 2024 पर्यंत ते 82 लाख रुपयांचे मालक झालेत.

सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे 3 आमदार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

निवडून आलेल्या आमदारांपैकी एकूण 187 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातली पहिली तीन नावं आहेत नितेश राणे, रत्नाकर गुट्टे आणि अजित पवार यांची.

कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे जास्तीची जवळपास 58 हजार मते मिळवून पुन्हा एकदा विजयी झालेत. “पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात येतोय. आम्हाला बघायचं आहे की दुसऱ्या दिवशीची सकाळ हिंदू बघतात की मुसलमान.”

असं वक्तव्य त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथं सभेत बोलताना केलं होतं. त्यावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. अशी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची आणि गुन्हा दाखल होण्याची ही राणेंची पहिलीच वेळ नाही.

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार नितेश राणेंवर एकूण 38 खटले दाखल आहेत. या सगळ्या खटल्यांवरची सुनावणी अजूनही सुरू आहे. त्यात भारतीय दंड संहितेची 115 आणि भारतीय न्याय संहितेची 47 कलमं लागलेली आहेत. त्यातही भारतीय दंड संहितेतंर्गत 31 आणि न्याय संहितेतंर्गत 35 गंभीर गुन्हांची नोंद आहे.

सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे 3 आमदार
फोटो कॅप्शन, सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले आमदार

गुन्हेगारी धमकी देणे, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांविरोधात द्वेषाची भावना वाढवणे, कामावर रुजू असणाऱ्या लोक सेवकाला इजा पोहोचवणे, खंडणी गोळा करणे, हत्येचा प्रयत्न अशा अनेक गुन्हांसाठी ही कलमे लावली गेली आहेत.

नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.

फोटो स्रोत, Facebook/Nitesh Rane

फोटो कॅप्शन, नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टेंनी 2019 पासून राखला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते 1,41,544 मते मिळवून निवडून आले. गुट्टे यांच्यावर दाखल झालेल्या 12 खटल्यांमध्ये भारतीय दंड संहितेतली 28 गंभीर कलमं आणि 39 इतर कलमं लागली आहेत.

फसवणूक करून पैसा किंवा मालमत्ता हडप करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, बँकेची फसवणूक अशा अनेक गुन्हांचा त्यात समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली गंगाखेड शुगर्स कंपनीचे संचालक असणाऱ्या गुट्टेंवर काही वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. त्यासाठी ते जवळपास वर्षभर कारागृहात होते. शेतीच्या वादातून एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्यावर भारतीय दंड संहितेतल्या 25 कलमांसोबत 40 खटले दाखल झालेत. त्यात 20 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात बहुतेक फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, विश्वासघात करून मालमत्ता बळकावणे अशाच आरोपांची नोंद आहे.

( या बातमीसाठी बीबीसी डेटा व्हिज्युलायजेशन टीमच्या जास्मिन निहालानींनी ग्राफिक्स तयार केले आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)