गोवरचा फैलाव कोरोनापेक्षा पाचपट वेगाने, तज्ज्ञांचं मत

Published

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.

1. गोवरचा फैलाव कोरोनापेक्षा पाचपट वेगाने

कोरोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गोवरचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

तरीही गोवर कोरोनापेक्षा पाचपट वेगाने पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लहान मुलांमध्ये तो अधिक वेगाने पसरण्याची भीती तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. लोकसत्ता ने ही बातमी दिली आहे.  

कोणत्याही रोगाच्या प्रसाराचा धोका आर नॉट या एककाद्वारे मोजला जातो. एका रुग्णाकडून किती रुग्णांना लागण होते यावर प्रसाराचा वेग अवलंबून असतो. गोवरची लागण ही एका रुग्णाकडून साधारण 13 ते 14 लोकांना होते. त्या तुलनेत कोरोनाची लागण एका रुग्णाकडून तीन ते चार लोकांनाच होत होती.

गोवरचा सर्वाधिक धोका पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना आहे. अपवादात्मक परिस्थितीत याची लागण 18 वर्षांवरील लोकांना होते.

2. विस्ताराचं एअर इंडियामध्ये विलिनीकरण

सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे.

या विलिनीकरणानंतर नवीन कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 25.1 टक्के भागीदारी राहील. एनडीटीव्ही ने बातमी दिली आहे.

एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे येताच एअर इंडियामध्ये ‘विस्तारा’च्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. प्रस्तावित विलिनीकरण प्रक्रिया 2024 मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे.

सध्या टाटा समूहाची ‘विस्तारा’मध्ये 51 टक्के हिस्सेदारी आहे तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. विस्तारा आणि एअर इंडियाचे विलिनीकरण केले जाईल आणि या व्यवहाराचा भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सिंगापूर एअरलाइन्सकडे असलेल्या 17.5 अब्ज सिंगापूर डॉलरच्या राखीव निधीमधून एअर इंडियाला ही रक्कम देण्याचा मानस असल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने म्हटले आहे.

टाटा समूहही 2022 आणि 2023-24 मध्ये एअर इंडियाच्या वाढीसाठी निधी देणार आहे.

3.  1 डिसेंबरपासून येणार डिजिटल रुपया; RBI ने केली मोठी घोषणा.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 1 डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपी लाँच करण्याची घोषणा केली असून किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल.

पायलट मोहिमेदरम्यान, डिजिटल रुपयाच्या उत्पादन, वितरण आणि किरकोळ वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल.

यापूर्वी, केंद्रीय बँकेने 1 नोव्हेंबर रोजी घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता. महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.

 

मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, वापरकर्ते सहभागी बँकांद्वारे ऑफर केलेल्या आणि मोबाईल फोन/डिव्हाइसवर संग्रहित डिजिटल वॉलेटद्वारे डिजिटल रुपया किंवा ई-रुपीसह व्यवहार करू शकतील.

तर ई-रुपी (e₹-R) डिजिटल टोकन म्हणून काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप असून चलनी नोटांप्रमाणे पूर्णपणे वैध आहे. त्याचा वापर व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.

4. तुकाराम मुंढे ची पुन्हा एकदा बदली

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे.

कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुन स्पष्ट नाही. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

सेवेत आल्यापासून 16 वर्षांत तुकाराम मुंढेंची 18  वेळा बदली झाली आहे.

दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती.

या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंडे यांचा कार्यभार काढला.

5. आम्ही अजूनही एकत्र-  अशोक गेहलोत

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानात गेली आहे. त्याआधी सचिन पायलट आणि अशोक गहलोत एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी गहलोत यांनी सचिन पायलट गद्दार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकत्र आल्याचे दिसत आहेत. लोकमत ने ही बातमी दिली आहे.

“देश महागाई आणि बेरोजगारी सारख्या संकटाचा सामना करत आहे आणि राहुल गांधी शांततेचा संदेश देत आहे. देशात तणावाचा सामना करण्याचं आव्हान आहे. राहुल गांधींचा संदेश सगळ्यांनी स्वीकार केला आहे असं ते पुढे म्हणाले.

हेही पाहिलंत का?