You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पोळपाट-लाटणे बनवणाऱ्याच्या हातात आता पोलिसांची लाठी आली'
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी
- Published
"तुम्हा झोपडपट्टीत राहणाऱ्यांची शिकायची लायकीच नाही रे, चला निघा इथून," असं म्हणून सहावीत शिकणाऱ्या केवल कतारी आणि त्यांच्या मोठ्या भावाला मॅडमनी शाळेतून हाकलून दिलं होतं.
केवल सांगतात की, "2004ला संगमनेर नगरपालिकेच्या एका शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. आम्हाला बाईंनी शाळेतून हाकलून दिलं होतं."
संगमनेर शहरात कतारी समाजाची एक वस्ती आहे. महाराष्ट्रात कतारी समाजाचे सुमारे एक लाख लोक राहतात. कतारी समाज हा भटक्या विमुक्त प्रवर्गातील एक समाज आहे.
याच समाजातला झोपडपट्टीत राहणारा आणि कुटुंबासमवेत पोळपाट, लाटणे आणि चौरंग बनवून बाजारात विकणारा केवल आता मुंबई महाराष्ट्र पोलीस ( Mumbai Police) दलात भरती झाला आहे.
17 मे रोजी त्याला ही नोकरी मिळाली आणि संगमनेरच्या कतारी वस्तीमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं.
अनेक दशकांपासून लाकडापासून वस्तू बनवण्याचे काम हा समाज प्रामुख्याने करत आलाय.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरणाऱ्या जत्रा आणि बाजारांमध्ये जाऊन लाकडी खेळणी, पोळपाट-लाटणे, चौरंग अशा वस्तू विकण्याचं काम हा समाज करतो.
गावांच्या वेशीवर असणाऱ्या वस्त्यांबाबत आपण नेहमी ऐकत आलोय पण शहरांच्या वस्तीवर देखील, स्वतःच्या पारंपरिक ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करून गुजराण करणारे असे अनेक समाज आढळून येतात.
कतारी समाजातील मुलांच्या शिक्षणाचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. केवल कतारी यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "घरात मुलगा जन्माला आला की त्याच्याकडे अगदी कमी वयापासूनच कमाईचं साधन म्हणून बघितलं जातं.
घरात जन्माला आलेला मुलगा कधी मोठा होतो आणि कधी दोन-चार पैसे कमवून कुटुंबाचं पोट भरायला हातभार लावतो याचीच सगळे वाट बघत असतात."
केवल कतारी यांच्या घरीही फारसं वेगळं वातावरण नव्हतं. असं असलं तरी त्यांचे मोठे भाऊ धनसिंग कतारी यांनी मात्र प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतः शिकायचा आणि केवल कतारी यांना शिकवण्याचा निर्णय घेतला होता.
शाळेत गेल्यावर या वस्तीतल्या मुलांकडं झोपड्पट्टीतली मुलं म्हणून पाहिलं जाई आणि घरी आल्यावर 'कशाला शाळेत जाता? दोन पैसे कमवा' असा सल्ला मिळत असे. त्यामुळे ही दुहेरी लढाई लढत-लढत केवल शाळेत जाऊ लागले.
सहावीत शाळेतून हाकलून दिलं जाऊनही त्यांनी शाळेत परत जायचा निर्णय तर घेतला पण कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कुटुंबाच्या पारंपरिक कामातही मदत करावी लागायची.
दहावी नापास झालो, शिक्षण सुटलं; पण नियतीला ते मान्यच नव्हतं
महाराष्ट्रात डिसेंबर ते एप्रिल हा काळ जत्रांचा काळ म्हणून ओळखला जातो. जत्रेत वेगवेगळे जिन्नस आणि वस्तू विकणाऱ्या समाजासाठी हीच खरी दिवाळी असते.
कतारी समाजाचा व्यवसायदेखील या महिन्यांमध्ये तेजीत असतो. 2008 मध्येही असंच घडलं होतं, केवल कतारी यांच्या दहावीच्या परीक्षा याचकाळात आल्याने त्यांना अभ्यास करता आला नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
इतर सगळ्या विषयात पास होऊनही गणितात मात्र केवल कतारी दहावीत नापास झाले. भावाच्या मदतीनं ऑक्टोबर महिन्यात पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला मात्र तिथेही गणिताने त्यांची साथ दिलीच नाही.
दहावीत दोनदा नापास झाल्याने खचलेल्या केवल कतारी यांनी मग शिक्षणच सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरची सहा वर्षे, मिळेल ती कामं करून, वडिलांना त्यांच्या कामात मदत करून केवल जगू लागले होते.
एव्हाना कतारी समाजातील इतर कारागिरांप्रमाणे जंगलात जाऊन लाकूड गोळा करणं, गोळा केलेल्या लाकडापासून पोळपाट-लाटणे बनवणं अशा कामांमध्ये केवल तरबेज झाले होते.
वस्तीतल्या इतर लोकांसारखंच आपलंही नशीब असेल असा विचार करून, त्यांनी नशिबाशी एक सौदा केला होता पण कदाचित नियतीलाच ते मान्य नव्हतं.
कतारी वस्तीतल्या इतर पोरांपेक्षा केवल कतारी हुशार होते. त्यांना इंग्रजी, मराठी लिहिता-वाचता येत होतं. वस्तीतल्या त्यांच्या एका मोठ्या भावाने केवलचे हे गुण हेरले होते.
म्हणूनच, राजकीय कार्यकर्ता असणाऱ्या अमर कतारी यांनी केवलला त्यांच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉयची नोकरी देऊ केली. दहावी नापास झालेल्या केवलसाठी ही एक नवीन संधी होती.
त्यांनी ती घेतली आणि ऑफिसबॉय म्हणून तिथे काम करू लागले. तिथे काम करत असताना एका बाईंनी केवलला पुन्हा शिक्षण सुरु करण्याचा सल्ला दिला आणि तिथेच शिक्षणापासून दूर फेकले गेलेले केवल पुन्हा शिक्षणाच्या जवळ आले.
मित्राच्या टोमण्याने आयुष्य बदललं
तब्बल सहा वर्षांच्या गॅपनंतर केवल कतारी शाळेत गेले आणि निर्धार करून दहावीची परीक्षा पास झाले. त्यांनी अकरावीत प्रवेश घेतला आणि त्यांच्या मित्राने त्यांना मारलेल्या एका टोमण्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं.
त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असणाऱ्या मुलांसोबत शिकत असल्याने, एकप्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात होता.
अकरावीत इकॉनॉमिक्सच्या वर्गात शिक्षकांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि नुकताच अभ्यास सुरु केलेल्या केवल यांना त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
इकॉनॉमिक्सचा वर्ग संपला आणि एकाच बाकावर शेजारी बसलेला त्यांचा मित्र म्हणाला की, "केवल काय ते तुझी लायकी तुला साधं एका प्रश्नाचं उत्तर देता येत नाही?"
बस्स!
प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने मित्राने काढलेली लायकी केवल यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी खूप शिकून त्या मित्राचं तोंड कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला.
कतारी समाजातल्या पोरांना अपमान होणं काही नवीन नव्हतं. त्यांच्या पारंपरिक व्यवसायावरून, गरिबीवरून, शिक्षणाच्या अभावावरून पदोपदी अपमान होत आला होता.
मात्र काही पोरांना अपमान सहन होत नाही आणि मग ती केवल यांच्यासारखी पेटून उठतात. त्यानंतर केवल कतारी यांनीही कधी मागे वळून पाहिलंच नाही.
आधी अकरावी, मग बारावी आणि त्यानंतर पदवी मिळवून ते सुशिक्षित झाले.
पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतांना, मैदानावर काही मुलांना जीव तोडून पळताना पाहिलं. त्यात त्यांचा एक भाऊही होता.
त्याला विचारल्यावर त्यांना समजलं की, ही सगळी मुलं पोलीस भरतीची तयारी करत आहेत.
भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना पोलिसच का व्हावं वाटतं?
भटक्या विमुक्त समाजातील मुलांना पोलीस होण्याची इच्छा का असते? यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार म्हणतात की, "सामाजिक उतरंडीत तळाशी असणाऱ्या भटक्या विमुक्तांना भारतातल्या मुख्य नागरी वस्त्यांनी कधी मनापासून स्वीकारलंच नाही.
त्यामुळे पारंपरिक ज्ञानावर आधारित व्यवसाय करणाऱ्या या समाजाला नेहमीच शहरांच्या आणि गावांच्या वेशीवर वस्त्या करून राहावं लागतं."
ते पुढे म्हणतात, "आधी समाज आणि नंतर व्यवस्थेने केलेला अन्याय सहन करत करत या समाजातली पोरं शिकण्याचा, स्वतःवरला अन्याय चांगल्या मार्गांनी दूर करण्याचा प्रयत्न करतात.
यातूनच या मुलांना व्यवस्थेत अधिकार मिळावा म्हणून पोलीस किंवा अधिकारी व्हावंसं वाटतं आणि ही मुलं या सेवांकडे आपसूकच आकर्षित होतात."
"त्यामुळे अलीकडच्या काळात भटक्या विमुक्त समाजातील मुलांचं पोलीस होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र, त्यांचा हा मार्ग अजिबात सोपा नसतो.
समाजाने आधीच त्यांच्याकडे एका विशिष्ट पद्धतीने बघण्याचं ठरवलं असतांना. बऱ्याचवेळा अधिकारी आणि व्यवस्थेने त्यांच्यावर एक ठपका लावलेला असतांना, पोलीस होण्याचं स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण करणं अजिबात सोपं नसतं."
केवल कतारी यांच्यासाठी तर हा प्रवास अजूनच अवघड होता. कारण शिक्षणात सहा वर्षांच्या घेतलेल्या गॅपमुळे पोलीस भरतीसाठी लागणारं विशीतल्या पोराचं शरीर आता त्यांच्याकडे राहिलं नव्हतं. त्यामुळे इतरांपेक्षा दुप्पट मेहनत त्यांना करावी लागणार होती.
बरं पोलीस भरतीची परीक्षा द्यायची म्हटलं की, गणिताचाही अभ्यास करावा लागणार होता आणि दहावीत असताना मोठ्या कष्टाने मानगुटीवरून दूर केलेल्या गणिताच्या भुताला त्यांना परत आता त्यांच्या मानगुटीवर बसवून घ्यावं लागणार होतं.
यासाठी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये पोलीस प्रशिक्षण अकादमीची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने केवल कतारी यांचा आत्मविश्वास आणि सामान्यज्ञान दोन्ही चांगलं झालं होतं.
एव्हाना त्यांचा मोठा भाऊही पुण्यावरून शिकून परत आला होता आणि त्यानेही केवल यांना मदत करण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांच्या नोकरीने दोनदा हुलकावणी दिली मात्र तिसऱ्या प्रयत्नात यश
2017 मध्ये केवल कतारी यांनी पहिल्यांदा पोलीस भरतीसाठी अर्ज केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना चांगले गुणही मिळाले मात्र केवळ सहा मार्कांनी त्यांचं मेरिट हुकलं.
पहिल्याच प्रयत्नात एवढे चांगले मार्क मिळाल्यावर त्यांनी पुढच्या भरतीसाठी चांगला अभ्यास सुरु केला. मात्र 2020 मध्ये कोरोना त्यांच्या मार्गात अडथळा बनून आला.
त्यानंतरची दोन वर्षे कठीण होती. कोरोनाकाळात सुरुवातीला फक्त बियर बार सुरु करण्यात आले होते. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या केवल कतारी यांना काही पैसे कमावणं भाग होतं.
त्यामुळं भावाच्या मदतीने त्यांनी बियर बारमध्ये वेटरची नोकरी मिळवली. लॉकडाऊन वाढत चालला होता आणि पोलीस बनण्याचं स्वप्न त्यांच्यापासून दूर जात होतं.
याकाळात केवल कतारी यांचं लग्नही झालं होतं. संगमनेर शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विवाहित तरुणांमध्ये केवल बहुधा एकटेच असावेत.
सगळ्या आव्हानांचा सामना करत त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्यांच्या बायकोची साथही तितकीच महत्वाची असल्याचं केवल सांगतात, "ती मला म्हणाली होती, भरती होईपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही.
तुम्ही नीट लक्ष देऊन अभ्यास करा आणि पोलीस होऊन या सगळ्यांची तोंडं कायमची बंद करून टाका."
'दोनशे रुपये भरू शकत नाही, तू काय पोलीस होणार?
पुन्हा पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेच्या वाचनालयात जाणं सुरु केलं होतं. मात्र, तिथेही पैसे लागायचे.
एक रुपयाही न कमावणाऱ्या केवल यांच्याकडे त्याकाळी शंभर रुपयेही नव्हते. दोन महिन्यांचे पैसे थकल्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने अपमान करून त्या वाचनालयातून त्यांना एकदा हाकलूनही दिलं होतं.
मात्र कधी त्या वाचनालयात येणाऱ्या इतर मुलांची पुस्तकं वाचून तर कधी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वाचनालयात जाऊन केवल कतारी यांनी पोलीस भरतीची तयारी केली, तीनचार महिने कसून अभ्यास केला.
हे सगळं करत असतांना सप्टेंबर 2022 मध्ये भरतीची घोषणा झाली. त्यानंतर जानेवारीमध्ये पहिल्यांदा मीरा भाईंदर इथे मैदानी चाचणी होणार होती.
दुर्दैवाने त्याच्या चार दिवस आधीच केवल आजारी पडल्याचं ते सांगतात. त्यामुळे मैदानी चाचणी त्यांना देता आली नाही.
त्यानंतर आठच दिवसांनी पिंपरी चिंचवडमध्ये मैदानी चाचणी होणार होती. आजारपणातून अजूनही पूर्णपणे न सावरल्यानंतरही त्यांनी तिथे चाचणी दिली.
पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची हेळसांड ही काही नवीन गोष्ट नाही. केवलदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत.
याबाबत सांगताना ते म्हणतात की, "मैदानी चाचणीसाठी पहाटे दोन वाजता नंबर लावल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता नंबर आला.
आम्हा सगळ्यांना कित्येक तास तिथे नुसतं बसून राहावं लागलं. दरम्यान जवळ नेलेलं खाण्यापिण्याचं सामान संपलं होतं. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि तिथेही मला अपयश आलं."
दोनदा भरतीची संधी अशी हुकल्यामुळे मुंबईला होणारी भरती ही शेवटची संधी त्यांच्यासमोर होती.
त्या भरतीच्या आधी दिवस-रात्र सराव करून त्यांनी तयारी केली आणि मुंबईला होणाऱ्या चाचणीत सहभागी होण्याचं ठरवलं.
27 मार्चला झालेल्या या चाचणीत अखेर त्यांना चांगले गुण मिळवता आले. योगायोगाने त्याचदिवशी त्यांचा वाढदिवस होता.
पोलीस झाल्याचं कळलं तेव्हा
मैदानी चाचणी झाल्यानंतर त्यांनी स्वतःच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. रात्री तीन-तीन वाजेपर्यंत त्यांनी अभ्यास केला आणि अखेरच्या काही दिवसांमध्ये मनोरंजन म्हणून जी पुस्तकं वाचली, जे व्हिडिओ बघितले त्यातलेच प्रश्न त्यांना लेखी परीक्षेत विचारण्यात आले.
शेवटच्या लेखी परीक्षेत केवल कतारी यांनी अकादमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हुशार मुलांपेक्षाही जास्त मार्क मिळवले.
केवल म्हणतात की, "माझ्या आयुष्याचा सगळा अनुभव आणि शिक्षण पणाला लावून मी ती मुंबईची परीक्षा दिली होती."
परीक्षा दिल्याच्या दोन दिवसानंतर केवल कतारी बाबा झाले. त्यांच्या पोटी एका गोंडस मुलीने जन्म घेतला होता.
आता जणूकाही चांगल्या गोष्टी घडण्याची सुरुवातच झाली होती. असं असलं तरी निकालाची चिंता त्यांच्या मनात होतीच.
9 मे ला त्यांच्या मुलीचा जन्म झाला आणि त्यानंतर आठच दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला. १७ मे च्या दिवशी केवल त्यांच्या नातेवाईकांसोबत फिरायला गेले होते आणि तिथून परत येत असताना त्यांना त्यांच्या अकादमीच्या मित्राचा फोन आला.
त्या क्षणाबद्दल बोलताना केवल सांगतात की, "तो मित्र मला म्हणाला, केवल निकालाची लिस्ट लागली आहे आणि मित्रा तू पोलीस झालाय.
त्याच्या शब्दांवर मला विश्वासच बसेना. मी तिथेच रडायला लागलो. मी लगेच माझ्या आईला फोन करून मी पोलीस झाल्याचं सांगितलं आणि त्यानंतर घरी गेलो.
घरी गेल्यावर माझ्या कुटुंबियांना तर अर्थातच आनंद झाला होता.
पण, संगमनेरच्या कतार वस्तीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्याचा पोरगा पोलीस झालाय हे ऐकून माझ्या सगळ्याच वस्तीतील लोकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
घरी गेल्यावर माझ्या वाईट काळात मला साथ देणारी माझी आई, हातात आठ दिवसांचं तान्हुलं बाळ घेऊन उभी असणारी माझी बायको या सगळ्यांना पाहून माझा पंधरा वर्षांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून गेला.
"एकेकाळी पोळपाट-लाटणे बनवणाऱ्याच्या हातात आता पोलिसांची लाठी येणार होती... होय मी केवल दारासिंग कतारी आता पोलीस झालो होतो....."
'शासन आपल्या दारी...पण सायेब आम्हाला दारच नाही'
भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून रोखणाऱ्या अडचणींवर बोलतांना सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अरुण जाधव असं म्हणतात की, "भटक्या विमुक्त समाजाला राहण्यासाठीची कायमस्वरूपी जागा हवी आहे.
भारतीय संविधानाने अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या संदर्भात दिलेले अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत.
भटक्या विमुक्त समाज अदखलपात्र आहे. म्हणजेच काय तर भटक्या विमुक्त समुदायातील एकच समाज महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये मोडतो, कर्नाटकात अनुसूचित जमातींमध्ये मोडतो आणि दुसऱ्या एखाद्या राज्यात इतर मागास वर्गात मोडतो.
जातीच्या प्रवर्गाबाबतही भटके नेहमी भटकतच राहतात. भटक्या विमुक्त समाजातील अनेक जातींना एका छत्राखाली आणले पाहिजे. एकाच सूचीमध्ये त्यांचा समावेश केला गेला पाहिजे.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भटक्या विमुक्त समुदायातील बहुतांश जमातींवर ब्रिटिशांच्या काळापासून लागलेला गुन्हेगारीचा ठपका पुसला गेला पाहिजे.
आजही प्रशासन आणि यंत्रणा भटक्या विमुक्तांना इंग्रजांच्याच चष्म्यातून बघत असतात."
सरकारी अर्थसंकल्प भटक्या विमुक्त समाजाबाबत काय धोरण अवलंबतो यावर बोलतांना जाधव म्हणतात की, "अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त समाजासाठी स्वतंत्र तरतूद केली गेली पाहिजे.
भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र तरतुदी केल्या जाणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ मी राहतो त्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड तालुक्याचंच उदाहरण घ्या.
आमच्या तालुक्यात तब्बल 25 हजार भटक्या विमुक्तांची मुलं राहतात. मात्र सरकारी वसतिगृहांमध्ये केवळ तीनच भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची तरतूद करण्यात आलॆली आहे.
भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था केली गेली पाहिजे.
भटक्या विमुक्त समाजाला शिक्षण, व्यवसाय, घर, नागरिकत्वाचे पुरावे, सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ हे मिळालं तर आणि तरच हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकेल.
सध्या 'सरकार आपल्या दारी' या प्रकल्पाची मोठी चर्चा केली जात आहे. मात्र भटक्यांना दारच नाही हे या सरकारला लक्षातच येत नाही."
समाजातील वेगवेगळ्या स्तरांचा उल्लेख करतांना जाधव म्हणतात की, "गावातल्या गावगाड्याचा विचार करता तीन स्तर दिसून येतात.
पहिला स्तर म्हणजे गावातल्या सवर्णांची वस्ती, दुसरा स्तर म्हणजे वेगवेगळी कामं करणाऱ्या बारा बलुतेदारांची वस्ती, तिसरा स्तर म्हणजे गावातल्या आदिवासी आणि दलितांची वस्ती.
भटका विमुक्त समाज मात्र या रचनेत कुठेही दिसून येत नाही.
गावातल्या स्मशानाजवळ, हागणदारीजवळ राहणाऱ्या या समाजाची कुणीही दखल घेत नाही.
खरं सांगायचं झालं तर समाजही आम्हाला जवळ करत नाही, आमच्या मांडीला मांडी लावून जेवण करत नाही.
गावगाड्यात भटक्या विमुक्तांचा कसलाही सहभाग दिसून येत नाही आणि म्हणूनच हा समाज नेहमी उपेक्षित राहिला आहे."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)