धमकी देऊन माझा आवाज बंद करता येणार नाही - शरद पवार

Published

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

आपल्याला मिळालेल्या धमकीवर शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अशा प्रकारे धमकी देऊन आपला आवाज बंद करू शकेल, असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असं पवारांनी म्हटलं.

तसंच अशा प्रकारच्या धमक्यांची आपल्याला चिंता नाही, असंही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे."

"पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या धमक्यांची चिंता मी करत नाही ,' अशा शब्दांत शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तसंच ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही," असंही पवार यांनी म्हटलं आहे.

'तुमचा लवकरच दाभोळकर होणार'

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी आल्यानंतर त्यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

‘तुमचा लवकर दाभोळकर होणार’ अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली.

या धमकीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आणि धमकीसंदर्भात तक्रार दाखल केली. तसंच, या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं केली.

यावेळी शरद पवारांना सोशल मीडियावरून आलेल्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती प्रसिद्ध केली आहे. ते म्हणाले आहेत, "ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल."

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे तक्रार केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मला पवारसाहेबांबाबत व्हॉट्सअपवर मेसेज आला.

सोशल मीडियावरूनही धमकी देण्यात आली. त्यामुळे मी पोलिसांकडे आले. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना कारवाईबाबत विनंती केली. हा प्रकार राजकारणात खालची पातळी गाठणारा असून, हे थांबलं पाहिजे."

शरद पवारांना देण्यात आलेल्या या धमकीबाबत राजकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “पवारसाहेबांना धमकी देणाऱ्याची माहिती घेतली असता कळलं की, सौरभ पिंपळकर नावाच्या युजरनं धमकी दिलीय. हा सौरभ पिंपळकरच्या बायोमध्ये तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं लिहिलंय. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही, हे माहित नाही. पण तसा उल्लेख आहे.

त्याच्या पक्षानं असं बोलायला सांगितलंय का? विचारांची लढाई विचारानं करूया की. व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे. संविधानानं अधिकार दिलाय. त्या अधिकारांचा गैरवापर का करायचा? कारण नसताना एखाद्या राजकीय नेत्याबाबत बदनामीकारक टीका करण्याचा अधिकार यांना दिलाय कुणी?

“माझं तर म्हणणं असंय की, सौरभ पिंपळकरचा कोण मास्टरमाईंड आहे, कुणी त्याला हे करायला भाग पाडलं, त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याचा कुणाशी संपर्क आला, हे कळलं पाहिजे. पक्षवाढीसाठी नक्कीच प्रयत्न करावा, पण ते करत असताना कारण नसताना इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांची बदनामी करायची, चारित्रहनन करायचं, हे प्रकार अलिकडे वाढीला लागले आहेत. या प्रकाराचा निषेध करतो.”

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं की, “आदरणीय शरद पवार साहेब यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे कृत्य धक्कादायक व निषेधार्ह आहे.”

“सध्या समाजापुढे सत्य मांडणे हा जणू अपराध झाला आहे. सुमारे सहा दशके भारतीय राजकारणात असणाऱ्या पवार साहेबांना धमकी देणाऱ्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी,” असंही सतेज पाटील म्हणाले.

माजी खासदार भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, "शरद पवार यांना ट्विटरवरून जिवे मारण्याची धमकी देणे हा हिंसाचारी शक्तींच्या विकृतीचा कळस आहे. ही बाब निषेधार्ह आहेच, परंतु महाराष्ट्र शासनाने सबंधित व्यक्ती त्वरीत शोधून तिच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)