भारदस्त, कणखर आवाजाचे पुरुष महिलांना का आवडतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विल पार्क,
- Role, बीबीसी रिल्स.
- Published
पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज लावत असताना आपण त्याच्या बोलण्याच्या शैलीला खूप महत्त्व देतो.
इतकंच नव्हे तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात या गोष्टीलाच आपण जास्त महत्त्व देत असतो.
राजकीय नेते, मित्रमंडळी इतकंच नव्हे तर आपले जोडीदार आपण त्यांची बोलण्याची शैली, लहेजा या गोष्टींच्या आधारावरच निवडत असतो.
असं कशामुळे? कारण आपला आवाजच आपल्या विषयी सर्वाधिक माहिती देत असतो. आपल्या विचारांपेक्षाही जास्त त्याला महत्त्व असल्याचं मानलं जातं.
युनिव्हर्सिटी ऑफ मोंटपेलियरमध्ये भाषा विज्ञानाच्या संशोधक मेलिसा बरकत डिफ्राड्स यांच्या मते, आपण आपल्या आवाजाच्या माध्यमातून बोलतो. शिवाय, त्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाणही करतो.
त्या सोबतच आवाज आपल्या बायोलॉजिकल स्टेटसबद्दलही खूप काही सांगत असतं. तसंच आपल्या सामाजिक स्थितीबद्दलही तो माहिती देतो.
“त्यामधून हेसुद्धा कळतं की तुम्ही काय करता, तुमची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे.
यामधून तुमची मानसिक स्थिती समजते. तसंच तुमच्या आरोग्याबाबतही यामधून कळू शकतं. म्हणजे तुमच्या आवाजाची गुणवत्ता तुमच्याबाबत इतकी सगळी माहिती देत असतं.”
लोकांच्या आवाजामध्ये खूपच कमी अंतर असतं. हे अंतर आपल्याला सेकंदाच्या 10 व्या भागापेक्षाही कमी वेळेत समजू शकतं. इतक्या कमी वेळेत त्या व्यक्तीबाबत आपण अंदाज लावू शकतो.
मात्र, आवाजामध्ये असं कोणतं वैशिष्ट्य आहे, जे आपण आवर्जून पाहत असतो?
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या आवाजाने आपण त्याला नेता म्हणून कसे निवडतो?
निवडणुकीचे निकाल पाहिले तर कणखर आवाजाचे नेते बहुतांश वेळा विजय प्राप्त करतात, हे दिसून आलं आहे.
ज्या लोकांचा आवाज भरभक्कम असतो, त्यांना अधिक सक्षम, नोकरीसाठी जास्त योग्य तसंच अधिक विश्वासू मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
आवाजामुळे लोकप्रियता
आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे आपला आवाज आणि लहेजा यांच्यात बदल होतो, ही सर्वाधिक रंजक गोष्ट आहे.
साधारणपणे आपण एकमेकांच्या आवाजांची मिमिक्रीही करत असतो. आपण असेच मित्र निवडतो, ज्यांचा आवाज आणि लहेजा आपल्याशी मिळताजुळता असेल.
युनिव्हर्सिटी ऑफ ल्योनच्या बायोकाऊस्टेशन तज्ज्ञ कटारझिना पिसासिंकी यांच्या मते, “इतरांचा आवाज आणि लहेजा यांच्यानुसार आपण आपलाही आवाज बदलतो, ही अत्यंत सामान्य बाब आहे.
जर कुणी हळू आवाजात बोलत असेल, तर आपणही तसेच बोलतो. जर कुणी जोराने बोलत असेल तर आपणही तसंच बोलण्याची शक्यता असते. आपल्यामध्ये असं एक वैशिष्ट्य असतं, जे इतरांशी बोलताना आपली मदत करत असतं.
आपल्याला माहिती आहे की टेस्टोस्टेरनमुळे पुरुषांना प्रचंड फायदे मिळतात. त्यांची प्रजनन क्षमताही त्यामध्ये समाविष्ट आहे.
जर एखाद्या पुरुषाचा आवाज भरभक्कम, खोल असेल, तर त्याला अधिक लैंगिक जोडीदार मिळू शकतात. तसंच त्याच्याकडून मुलं जन्माला येण्याची शक्यता जास्त असते,” असं त्या म्हणतात.
त्यांनी म्हटलं की आपल्या आवाजातील कणखरपणाच्या माध्यमातून पुरुष आपल्या जोडीदाराला आपल्यातील क्षमतेचे संकेत देत असतात. याचा अर्थ त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. तो अत्यंत आक्रमक आणि प्रभावी आहे. तसंच त्याच्याकडे नेतृत्व गुणही आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांना कणखर आवाज आकर्षिक का करतो?
कणखर, भरभक्कम किंवा गहिरा आवाज महिलांना आकर्षक का वाटतो, असं तज्ज्ञ बायोलॉजिस्टचं मत आहे.
याचा शोध घेण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या आवाजांवर संशोधन करण्यात आलं. यामध्ये असं दिसून आलं की ज्या महिलांच्या आवाजाची पातळी जास्त होती, त्यांना जास्त पार्टनर मिळाले.
तरुणींच्या आवाजाची पातळीही जास्त असू शकते, हे खरं आहे. यामधून त्यांचं वय आणि त्यांचं सौंदर्य यांच्याबाबतही समजू शकतं.
या संदर्भात झालेल्या संशोधनात अशी माहिती समोर आली की महिला डेटवर गेल्यानंतर आपल्या आवाजाची पातळी वाढवत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत यामध्ये बदल होत असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. म्हणजेच महिला एखाद्या आकर्षक व्यक्तीसमोर आपला आवाज मृदू करतात.
कटारझिना पिसासिंकी यांनी यासंदर्भात एक अभ्यास केला. या प्रयोगामध्ये काही महिलांनी एका ठराविक व्यक्तीसोबत सहा मिनिटे संवाद साधला. महिलांकडे त्या व्यक्तीला नापसंत करण्यासाठी एक उपकरण देण्यात आलं होतं. तसंच त्यांचा आवाजही रेकॉर्ड करण्यात येत होता.
यामध्ये जो पुरुष त्यांना आवडायचा, त्याच्यासमोर महिला आपला आवाज कमी करत असल्याचं समोर आलं.
नावडत्या व्यक्तीसमोर त्यांनी आपला आवाज चढवल्याचंही प्रयोगात दिसून आलं.
शिवाय, पुरुषांनीही कोमल आवाजाच्या महिलांनाच जास्त पसंती दर्शवली.
अशाच प्रकारचा एक प्रयोग फ्रेंच पुरुष आणि महिलांसोबत करण्यात आला. त्यामध्येही पुरुषांना आवडणाऱ्या महिलांचा आवाज कमी पातळीचा तसंच मृदू असा होता.
मेलिसा बरकत डिफ्राड्स म्हणतात, “बऱ्याच काळापासून आपला याविषयी गैरसमज होता. आता यामधील सांस्कृतिक बदल आपल्याला कळून येत आहे. जी गोष्ट आपण फ्रेंच पुरुषांमध्ये पाहिली, ती यापूर्वी इतर कोणत्याही संस्कृतींमध्ये पाहण्यात आली नव्हती.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























