You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पर्यावरण दिन : आदिवासी समाजाचं निसर्गाशी नाळ जोडून ठेवण्याचं गुपित, संस्कृती अन् परंपरांतून पर्यावरण संरक्षण
- Author, शताली शेडमाके
- Role, BBC News Marathi producer
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
निसर्ग ही मानवाची केवळ गरज नाही, तर त्याचं अस्तित्व यावर अवलंबून आहे. परंतु, आज माणूस तंत्रज्ञान आणि तथाकथित विकासाच्या नावाखाली निसर्गाचा 'मालक' बनू पाहतोय.
सिमेंटची जंगले उभी करून आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत, ज्यामुळे हवामान बदल आणि प्रदूषणाचे संकट गडद झाले आहे.
अलीकडच्या काही वर्षांत भारताला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. त्या संकटांची तीव्रता पर्यावरणातल्या मानवी हस्तक्षेपामुळे कशी वाढली यावरही अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावर विविध पातळीवर प्रयत्नही केले जात आहेत.
तर दुसरीकडे, या धावपळीच्या युगात, आदिवासी समाज मात्र निसर्गाशी असलेले हे आदिम नाते आजही प्रामाणिकपणे जपून आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या शेतीपेक्षा आदिवासींची शेती आणि त्यास जोडलेली संस्कृती खूप वेगळी आणि वैविध्यपूर्ण आहे. आदिवासींचा धर्मच निसर्ग आहे. आदिवासींचा पर्यावरणाशी असलेला घनिष्ठ संबंध आदिम काळापासून आहे.
माझं बालपण आदिवासी भागात गेलं. लहानपणापासून अनुभवलेल्या या परंपरा कालांतराने मागे पडत चालल्या असल्या तरी अजून टिकून आहेत.
5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आदिवासी समाज आणि त्यांच्या निसर्गाशी निगडित काही प्रथा, परंपरांबाबत जाणून घेऊयात.
'पंडुम'च्या माध्यमातून निसर्गाचं संवर्धन
एप्रिल महिन्यात आमच्या गावाकडे 'मरका पंडुम' पार पडला. मरका आणि पंडुम हे दोन्ही गोंडी भाषेतील शब्द आहेत. मरका म्हणजे आंबा आणि पंडुम म्हणजे उत्सव. आदिवासी भागांत पंडुमचं फार महत्व आहे.
झाडावरील आंबा विशिष्ट आकाराचा झाल्यानंतर म्हणजेच त्याची कोय पूर्ण तयार झालीय असं लक्षात आल्यानंतर आसपासच्या तीन-चार गावातील लोक एकत्र येऊन एका आंब्याच्या झाडाची पूजा करतात.
त्याला मोहफुलं आणि हळद-तांदूळ वाहुन आजपासून आम्ही आंबे खाण्यास सुरुवात करू, असं म्हणत परवानगी घेतात. त्यानंतर त्या भागात आंबे खाण्यास सुरुवात होते.
यामागे दोन उद्देश आहेत. पहिली म्हणजे निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता आणि दुसरं आंब्याची कोय पुन्हा मातीत पुन्हा रुजण्याचं भान आणि ज्ञान.
ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. मरका पंडुम प्रमाणेच इरका(मोहफुल) पंडुम, सित्ता (चिंच) पंडुमही आनंदाने साजरे केले जातात.
बिजोत्सव
झाडांप्रमाणेच बियाणांचाही पंडुम तितक्याच उत्साहात साजरा केला जातो, त्याला बिज्जा पंडुम म्हणतात.
बिज्जा किंवा विजा पंडुम दरवर्षी जमीन नांगरून धान पेरण्यापूर्वी करतात. विजा पंडुम केल्याशिवाय गावातील कोणीही व्यकी शेतात धानाची पेरणी करत नाहीत. हा माडिया व गोंड़ आदिवासी जमातीतील एक महत्वाचा पंडुम आहे.
शेतात धान्य, बियाणं पेरण्याआधी घरातील उपलब्ध सर्व बियाणांचा छोटासा भाग एका टोपलीत काढून त्याची पूजा करून चांगलं धान्य येऊ दे अशी मागणी निसर्गाकडे केली जाते.
ओडिशा राज्यातील नियमगिरी डोंगरावर राहणारे डोंगरिया कोंध समाजातील 'बिज्जा पंडुम'चं सुंदर उदाहरण आहे.
डोंगरिया कोंध समाजात गावातील सर्वात वृद्ध पुजारीन जिला 'बेजुनी' असं म्हणतात, तिच्या मार्गदर्शनात हा विधी पार पडतो. यात गावातील प्रत्येकजण त्याच्या घरात असलेलं धान्य, बियाणं एका लहान टोपलीत गोळा करून बेजुनीजवळ आणून देतो.
बेजुनी सर्व बियाणं एका मोठ्या टोपलीत टाकून एकत्रित करते आणि रित्या झालेल्या लहान टोपल्यांत पुन्हा भरून प्रत्येकाला परत करते. एखाद्याच्या घरात ठराविक धान्य नसेल तर ते या रुपाने त्याच्यापर्यंत पोहोचावं, हा उद्देश.
हा विधी झाल्यानंतर प्रत्येकजण टोपलीतील धान्य घरामागच्या परसबागेत टाकतो. हा विधी दरवर्षी न चुकता पार पाडला जातो.
निसर्गातील संपत्ती प्रत्येकाला समानतेनं मिळावी हाच यामागचा उद्देश. जो आजही आदिम समुहाने सुंदररित्या जपून ठेवला आहे.
शेती आणि मातीचा असाच एक सुंदर उत्सव महाराष्ट्रातही साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या झाडीपट्टी भागात शेतात रोवणं संपल्यानंतर शेतामध्ये सात छोटे खड्डे करून त्यात सात प्रकारचे धान्य टाकून आशिर्वाद घेतात. याला ढोले भरणे म्हणतात. जमिनीची ओटीचं जणू यानिमित्ताने एकप्रकारे भरली जाते.
यानंतर 'नाडा तुटो, गाडा भरो, शेतकऱ्याचा ढोला भरो' असं म्हणत रोवणं करणाऱ्या सर्व महिला हातात धानाची पात घेऊन शेतात भिरकावतात. याला 'खामला फेकणं' म्हणतात. नंतर शेतकऱ्याच्या डोक्यावर चिखलाचा टीळा लावून पाठीवर मातीने भरलेल्या हाताने कौतुकाची थाप देतात.
तसेच, घराच्या भिंतींवर मातीने शेतातील औजारं, चंद्र-सूर्य, शेतकऱ्याचं चित्र कोरतात आणि शेतकऱ्याचे आभार मानतात. यानंतर 'वन्यार' म्हणजेच शेतात काम करणाऱ्या मंडळींनाही आंबिल, उसळ, चिवडा खाऊ घालून निरोप देतात.
'नाडा तुटो, गाडा भरो, शेतकऱ्याचा ढोला भरो' म्हणजे शेतात इतकं धान्य व्हावं की ज्या गाड्यात धान्याचे पोते भरले जात आहेत, त्याला बांधण्यासाठी दोरी कमी पडेल.
धानकापणी तसेच इतर पीक शेतातून काढल्यानंतर वापरात आणण्याआधीही पंडुम करून शेताची परवानगी घेतली जाते. याला 'नवा पंडुम' किंवा 'नवाखाई पंडुम' म्हणतात.
यात थोडं धान्य काढून जमिनीला अर्पण करून आजपासून आम्ही हे खायला सुरू करू अशी परवानगी घेतली जाते.
तसेच, काकडी, अंबाडी, मका व जंगलातील इतर रानभाज्या गावातील 'पोचेम' म्हणजे माताजवळ अर्पण केल्यानंतरच मका, काकडी, अंबाडी इत्यादी खाण्यास सुरुवात करतात.
नवा पंडुम प्रथम पट्टी, नंतर गाव यानंतर गावातील प्रत्येक घरी केला जातो. 'निसर्गातून मिळालेलं निसर्गाला अर्पण' हा साधा भाव यामागे असतो.
देवराईचं रक्षण
आदिवासी संस्कृतीत जंगलाला 'देव' मानतात. 'देवराई' ही संकल्पना याचे उत्तम उदाहरण आहे.
देवराई म्हणून राखीव ठेवलेल्या जंगलाच्या भागात लाकूडतोड करणे किंवा शिकार करणे पूर्णपणे वर्ज्य असते.
'सरहुल' आणि 'करम' सारख्या सणांमधून होणारी वृक्षपूजा ही निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता दर्शवते.
'निसर्गाकडून तितकेच घ्यावे जितकी गरज आहे, हव्यास नको', हा यामागचा मूळ मंत्र आहे.
टोटेम, आदिम समूह आणि निसर्ग
आदिम समुहात टोटेमचं फार महत्व आहे, त्याला शुभचिन्ह किंवा पवित्र चिन्ह असं म्हणता येईल.
प्रत्येक आडनावासह टोटेम स्वरुपात एक प्राणी-पक्षी, एक झाड यांचा समावेश असतो, ते त्यांच्या कुळाचं प्रतिक असतं.
उदा. पाहायचं झाल्यास शेडमाके या आडनावाचं टोटेम कासव आहे. त्यामुळे शेडमाके लोक कासवांना ईजा करू शकत नाहीत. त्यांच्यावर कासवाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. मात्र, दुसऱ्या टोटेमचे लोक कासवाची शिकार करू शकतात.
हा नियम प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. कुठल्याही एका प्राण्याची, पक्ष्याची शिकार किंवा वृक्षतोड करून ते लुप्त होऊ नये, त्यांचं रक्षण व्हावं, हा यामागचा उद्देश्य.
प्रत्येकाला आपल्या टोटेमचं संरक्षण करायचं असतं, टोटेमला कुळचिन्हाच्या रुपात पुजतात, जेणेकरुन त्या जीवाबाबतची आपुलकी कायम राहावी.
नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर
निसर्गाचं रक्षण करणं म्हणजे फक्त वृक्ष लावणं नव्हे. तर निसर्गातील संसाधनांचा उपयोग करताना ते मुळासकट ओरबाडून टाकलं जाणार नाही याची काळजी घेणे, जतन करणे होय, असं साहित्यिक प्रा. वसंत कन्नाके सांगतात.
'निसर्ग आणि आदिम समाजाचं नातं' उकलून सांगताना ते म्हणतात. "गरज तितकाच वापर हा एक महत्वाचा अलिखित नियम आदिवासी समाजात आहे.
जंगलातून आणलेली कोणतीही वस्तू ती मुळासकट तोडून आणली जात नाही, जितकी गरज असेल तितकीच घेऊन ती इतरांसाठी राखून ठेवणं हा भाव आदिम समाजात अजूनही आहे. इतरांमध्ये तसं दिसून येत नाही, ते मुळासकट तोडून टाकतात. मला आणि माझ्यापुरतं हा भाव आदिवासी समाजात नाही.
तर, सर्वांनाच मिळालं पाहिजे, सर्वच जगले पाहिजे, प्रत्येक वस्तूवर सर्वांचाच समान अधिकार आहे मग माणसं असो वा जीव-जंतू."
"निसर्गातील जे जीव-जंतू आहेत. त्यांच्या जागेवरून त्यांना हटवू नका, त्यांचं रक्षण करा. कोणालाही त्याच्या जागेवरून हटवता येणार नाही, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जल-जंगल-जमीनीवर प्रत्येक जीव-जंतूचा समान अधिकार आहे, आदिवासी समाज आजही ते पाळतात."
आपणही निसर्गाचाच भाग आहोत त्यामुळे निसर्गातील प्रत्येक जीवाचं रक्षण व्हायला हवं, ही त्यामागची भावना आहे", असं मत ते व्यक्त करतात.
'आदिवासींचा धर्मच निसर्ग'
"आदिवासी हे निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे, त्यांच्या संस्कृतीत पर्यावरणाबद्दलचे ज्ञान, संकल्पना व त्याचे महत्त्व आढळते. त्याचा उल्लेख त्यांच्या लोकसाहित्यात विपुल प्रमाणात दिसतो, असं ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक, समीक्षक, लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ.माहेश्वरी गावित सांगतात.
त्यांच्या मते, "आदिवासी जीवनात फक्त एकट्याचा विचार नाही, तर सृष्टीजीवनातील सर्व घटकांचा विचार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या, निसर्गाशी एकरूप झालेल्या आदिवासींमध्ये ग्रह, तारे, ऋतुमान, नैसर्गिक आपत्ती, वनस्पती, प्राणी, पक्षी याबाबतचे ज्ञान परंपरागत आलेले दिसतेही ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध अशी आहे."
त्या पुढे सांगतात, "लोककथांमधून तर त्याची निर्मिती व मानवाशी संबंध यावरही त्यांच्या कल्पना प्रकट होताना दिसतात आणि लोकगीतांमधून अलंकारिक पद्धतीने पर्यावरणातील विविध गोष्टींचा उल्लेखही आढळतो. अनेक वनस्पतींचे व झाडांचे मानवोपयोगी मूल्य पाहूनच त्यांचा उल्लेख व महत्त्व पूजा प्रकारात आलेले दिसते.
आदिवासी जीवनात मानवी मूल्यांची वैश्विक संवेदना पाहावयास मिळते. ही संवेदना म्हणजे निसर्ग व जीवसृष्टी यांच्याशी सारख्याच सहानुभूतीचे मानवाचे वर्तन. भूतमात्रांविषयीचा जिव्हाळा असल्यामुळे, त्यांच्याशी अतूट नाते राखत जीवन जगायचे असते, हे बाळकडूच त्यांना मिळालेले असते."
माहेश्वरी गावित पुढे सांगतात, "आदिवासींनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मानवता, समता, स्वातंत्र्य, सहकार्याची भावना, संवेदनशीलता या गोष्टी आत्मसात केल्या. त्यांचा धर्मच निसर्ग आहे. विज्ञानयुगात जगाचे लक्ष पर्यावरण व निसर्गनियम, जीवसृष्टी यांच्याकडे वेधले आहे. त्यामुळे निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण आदिवासीच करू शकेल, यावर त्यांचा विश्वास आहे."
पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी मूल्यांची गळचेपी, नीतीमूल्यांचा ऱ्हास याकडे पाहता आदिवासींच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाची जगाला आवश्यकता आहे. आदिवासी संस्कृती ही एक जीवन परंपरा आहे, ही परंपरा आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
पर्यावरणीय संकटांवर उपाय शोधण्यासाठी आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी,एकूणच शाश्वत विकासासाठी आदिवासी जीवन परंपरेतील ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे, असं त्या सांगतात.
एकंदरित, आदिवासी आणि निसर्ग यांच्यातील या सुंदर बंधामुळेच आदिवासीबहुल भागातील जंगल सुरक्षित राहिले आहेत. हा वारसा लोकगित-लोककथांच्या माध्यमातून पुढच्या पीढीकडे सुपूर्द केला जातो.
हळूहळू या सुंदर रिती मागे पडत चालल्या आहेत. वने नष्ट होत आहेत, गावं ओसाड पडत चालली आहेत. जिथे कधी हिरवगार रान होतं तिथे आता खाणींचं साम्राज्य आहे.
निसर्गाला जपणं म्हणजे फक्त दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करून वृक्षारोपण करणं नव्हे तर लावलेल्या रोपांचं रक्षण करून त्याचं झाडांत रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घेणं होय.
पर्यावरण दिनानिमित्ताने 'झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा' या संदेशाचं योग्य मुल्यमापन करण्याची गरज आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.