इम्रान खान न्यायालयात का हजर होत नाहीयेत?- कोर्टाचा सवाल

इम्रान खान यांना आज (16 मार्च) सकाळी दहा वाजेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. लाहोर हायकोर्टाने खान यांच्या घरासमोरील ऑपरेशन तात्पुरतं स्थगित करण्याचा आदेश दिला होता.
आज या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात इस्लामाबाद कोर्टात ताजी सुनावणी झाली.
या दरम्यान इम्रान खानचे वकीस ख्वाजा हॅरिस यांनी कोर्टाला विचारलं की इम्रान खान यांना अटक करून कोर्टात आणणं गरजेचं आहे का?
यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल म्हणाले, “आम्हाला असं वाटतं की इम्रान खान यांनी कोर्टात यावं, ते कोर्टात का येत नाहीयेत?”
इम्रान खान यांनी कोर्टाची मदत करायला हवी, विरोध करायला नको असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.
सुनावणीच्या सुरुवातीला ख्वाजा हॅरिस यांनी वॉरंट कायम ठेवण्याचा इस्लामाबाद कोर्टाचा निर्णय वाचून दाखवला.
यावर न्या. इकबाल म्हणाले की इस्लामाबाद कोर्टाचा निर्णयच आम्हाला अजून प्राप्त झालेला नाही.
इम्रान खान यांच्या वकिलांनी कोर्टासमोर दोन पर्याय मांडले. ते म्हणाले, “पहिला पर्याय अंडरटेकिंग अप्लिकेशनला मंजूरी देणं आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द करणं आहे दुसरा पर्याय अटकपूर्व जामीन देणं आहे. इम्रान खान एक शपथपत्र देऊ इच्छितात की ते 18 मार्चला सत्र न्यायालयासमोर हजर होतील.”
यावर न्या. जफर इक्बाल म्हणाले की निवडणूक आयोगाला नोटिस देऊ शकतात. त्यानंतर कोर्टाने सुनावणी स्थगित केली.
न्या. जफर इक्बाल म्हणाले, “इम्रान खान पाकिस्तानचे नाही तर जगातील सगळ्यात महागडे वॉरंट झाले आहेत.”
इम्रान खान एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत आणि त्यांच्या अटकेसाठी जमान पार्क या त्यांच्या निवासस्थानी पंजाब पोलीस आणि रेंजर्सने ऑपरेशन सुरू केलं होतं.
मात्र तिथे इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आणि निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्याचं रुपांतर हिंसक झटापटीत झालं.
इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने पोलिसांच्या या मोहिमेविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले हे आणि कोर्टाने सरकारला ऑपरेशन थांबवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती.
बुधवारी (15 मार्च) हायकोर्टाने पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांच्या याचिकेवर पंजाब पोलीस महानिरीक्षक, मुख्य सचिव आणि इस्लामाबाद पोलिसांना पाचारण केलं आणि कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी इम्रान खान यांच्या निवासस्थानावरील ऑपरेशन थांबवलं.
कोर्टात उपस्थित असलेले पंजाबचे पोलीस महानिरीक्षक डॉ.उस्मान अन्वर यांनी कोर्टाला सांगितलं, “इस्लामाबाद पोलिसांकडे तोशाखाना खटल्यात इम्रान खान यांना अटक करण्याचा वॉरंट आहे. कायद्यानुसार आम्हाला या आदेशाचं पालन करायचं होतं म्हणून आम्ही ही मोहिम राबवली.” पीटीआय समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 59 पोलीस जखमी झाल्याचं एका कोर्टाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
इस्लामाबाद कोर्टाने निर्णय राखून ठेवला

फोटो स्रोत, Getty Images
इम्रान खान यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्याबाबत एक याचिका कोर्टात दाखल केली होती. लाहोर आणि आता इस्लामाबाद हायकोर्टाने या याचिकेवर निर्णय राखून ठेवला आहे.
28 फेब्रुवारीला इस्लामाबाद च्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खान यांच्या विरोधात तोशाखाना खटल्यात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.
इम्रान खान यांनी त्यांच्या वकिलामार्फत कोर्टात शपथपत्र दाखल केलं आहे की ते 18 मार्चला कोर्टात दाखल होतील.
इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारुख सुनावणीदरम्यान म्हणाले, “कोर्टाचा मान राखला जाईल आणि संघर्ष टळेल असे आदेश जारी करण्यात येईल.”
18 मार्चला इम्रान खान सत्र न्यायालयात उपस्थित राहतील याची वैयक्तिक हमी देत असल्याचं इम्रान खान यांचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी कोर्टाला सांगितलं.
यावर न्यायालयाचा सन्मान सर्वोच्च आहे आणि कायदा सर्वांसाठी समान नाही असा संदेश जायला नको, कायदा सगळ्यांसाठी समान आहे असा संदेश जायला हवं असं कोर्टाने वकिलांना सांगितलं.
वॉरंट पुन्हा जारी करण्यात काहीही अर्थ नाही असंही न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. कारण कोर्टाने इम्रान खान यांना 13 मार्चला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. ते म्हणाले की काहीही झालं तरी आरोपींनी कोर्टात हजर रहायलाच हवं.
जर एखाद्या प्रकरणात समन्स जारी झाला तर कोर्टात हजर राहणं महत्त्वाचं नाही का? मुख्य न्यायाधीश पुढे म्हणाले की, “एखाद्या आदेशाचं पालन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो रद्द होत नाही.”
कोर्टाने निर्णय राखून ठेवला असला तरी कधी निर्णय देणार हे सांगितलं नाही.
पीटीआय कार्यकर्ते विरुद्ध पोलीस

मंगळवारी (14 मार्च) जेव्हा पंजाब पोलीस आणि रेंजर्स लाहोर चे जवान जमान पार्कात त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा इम्रान खानच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी पीटीआय कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर निदर्शक विखुरले. महिलांचा या आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता.
लाहोर मध्ये उपस्थित बीबीसी प्रतिनिधी तरहब असगर यांनी सांगितलं की, “इथले रस्ते दगडांनी भरले आहेत. एक मोटरसायकल, पाण्याचा टँकर, पिकअप वॅन जाळली आहे.”
या मोहिमेदरम्यान इम्रान खान यांच्या घराजवळ अश्रूधुराचा मारा केला गेला.
मॉल रोडवरही वकिलांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात निदर्शनं केली.
पीटीआय ने एक ट्विट केलं आहे, “जमान पार्क भागात अधिकाधिक कार्यकर्ते जमा होत आहे. आम्ही सरकारचं उद्दिष्ट सफल होऊ देणार नाही.”
जमान पार्काला युद्धभूमीचं रुप आलं आहे. तिथे इम्रान खान समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक होत आहे. समर्थकांनी इम्रान खान यांना अटक होऊ दिली नाही.
काय आहे प्रकरण?

इस्लामाबाद येथील कोर्टात तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. ते घेऊन इस्लामाबाद आणि लाहोर पोलिसांची टीम इम्रान खान यांच्या निवसस्थानी पोहोचली. त्यांच्या जमान पार्क येथील घराबाहेर मोठ्या संख्येत पोलीस तैनात आहेत.
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने( पीटीआयने) निवेदनात म्हटले आहे की इम्रान खान यांचा कुठल्याच प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, तरी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इम्रान खान यांच्या विरोधात 80 हून अधिक प्रकरणं दाखल झाली आहेत, त्यापैकी चार प्रकरणात ते स्वतः न्यायालयात हजर झाले होते.
इम्रान खान हे लाहोरच्या जमान पार्क या भागात राहतात. या भागात पोलिसांव्यतिरिक्त कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे की पोलिसांच्या टीमने चारबी बाजूने जमान पार्कला गराडा घातला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























