'गुरिला गर्ल्स'चं 'नग्न होर्डिंग' : पुरुषी कलाकृतींना आव्हान देणारी ही कलात्मक क्रांती काय आहे?

    • Author, फीबी हॉपसन
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

'गुरीला गर्ल्स' या महिलांसाठी चळवळ करणाऱ्या वादग्रस्त गटाची स्थापना होऊन 40 वर्षे झाली आहेत. त्यांच्या 'नेकेड पोस्टर' (नग्न पोस्टर) या सर्वात प्रभावशाली मोहिमेनं कलाविश्वात पूर्णपणे नाविन्यपूर्ण मांडणी केली होती आणि त्याचा दीर्घकालीन प्रभाव पडला होता.

1989 साली न्यूयॉर्कमध्ये, काही महिलांनी मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कायमस्वरुपी संग्रहाला भेट दिली.

'गुरिला गर्ल्स' हा अज्ञात स्त्रीवादी गटाच्या सदस्यांनी नेहमीच्या प्रेक्षकांमध्ये लपून अत्यंत गुप्तपणे या ठिकाणी प्रवेश केला आणि तिथे असलेल्या कलाकृतींमध्ये चित्रित करण्यात आलेल्या नग्न महिलांच्या संख्येच्या तुलनेत महिला कलाकाराची संख्या अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने मोजली. कला जगतातल्या वांशिक आणि लैंगिक भेदभावाकडे लक्ष वेधण्याच्या एका गुप्त मोहिमेसाठी हे करण्यात आलं.

गुरिला गर्ल्सच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनापूर्वी या गटाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणाऱ्या कॅथ कोलविट्झ बीबीसीला प्रतिक्रिया दिली. कॅथ कोलविट्झ हे तिचं टोपणनाव होतं. ती म्हणाली, "आमचा मूळ हेतू हाच होता की कधीही न विसरता येणाऱ्या या गोष्टीच्या गाभ्यात जावं आणि ते जगाला दाखवून द्यावं."

हे शोधण्यासाठी त्यांनी अनेक जागांना भेटी दिल्या. या प्रवासात त्यांना प्राचीन ग्रीसमधील नग्न पुरुषांची चित्रे दिसली, ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळात असलेल्या नग्नतेच्या अनुपस्थितीची त्यांनी नोंद घेतली. पण आधुनिक काळाच्या सुरुवातीलाच त्यांच्या हाती अशी आकडेवारी लागली, जिच्या आधारे कलाविश्वातील वाईट प्रथांवर त्यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला आधार मिळाला.

त्यानंतर जगातल्या बहुतांश अत्यंत प्रतिष्ठित अशा कला संस्थांमध्ये कुणाचा वापर एखादी वस्तू म्हणून केला गेला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गुरिला गर्ल्सचा प्रस्थापितांविरोधातला संघर्ष

"आधुनिक कलाविश्वातील महिला कलाकारांची संख्या ही 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि अगदी त्याउलट या विश्वात चितारल्या जाणाऱ्या नग्न कलाकृतींमध्ये 85 टक्के कलाकृती या महिलांच्या आहेत," एका नग्न महिलेच्या चित्राच्या बाजूला लावलेल्या पोस्टरवरचा हा मजकूर. तिथेच या समूहाची एक सदस्य त्यांची ओळख असणारा गोरिला मास्क घालून उभी होती. हे चित्र जीन-ऑगस्टे-डॉमिनिक इंग्रेस या पुरुष चित्रकाराने 1814 साली काढलेल्या एका पेंटिंगवर आधारित आहे.

आजपर्यंत हा गट अनामिक आहे. त्यात कोण कोण आहे याबद्दल माहिती नाही. बीबीसीनं जेव्हा कोलविट्झची मुलाखत घेतली, तेव्हा कोलविट्झनं मास्क घातला होता. त्या म्हणाल्या, "ते पोस्टर पाहणारा कोणीही संग्रहालयात जाऊन त्या भिंतींवर काय आहे आणि का आहे, याबद्दल विचार करू शकत नाही."

मेट म्युझियममध्ये स्थान मिळवण्यासाठी महिलांनी नग्न होणं आवश्यक आहे का? हे पोस्टर म्हणजे न्यूयॉर्क पब्लिक आर्ट फंडकडून मिळालेल्या निधीवर अवलंबून होतं.

मात्र, अंतिम गोष्ट पाहिल्यानंतर, निधी मागे घेण्यात आला. गुरिला गर्ल्स त्यांच्या संदेशासाठी, कामासाठी कटिबद्ध आहेत, त्यांनी तो स्वत:च होर्डिंग्सवर आणि बसवर लावला.

त्या म्हणतात, "आम्ही न्यूयॉर्क शहरातील बसमध्ये जागा विकत घेण्याचं ठरवलं. न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांवर आम्ही स्वत: ते चिकटवले."

कलाविश्वातील लिंगभेद आणि वांशिक भेद

या पोस्टरने या टीमला प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यांची शैली लोकप्रिय झाली. विनोद, आकडेवारी आणि धाडसी वाक्यरचना यांचं हे अद्भूत मिश्रण म्हणजे लिंगभेद आणि वांशिक असमानतेला कसं तोंड द्यायचं यासाठीच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं फलित होतं.

व्हॉट डू दीज आर्टिट्स हॅव इन कॉमन? आणि दीज गॅलरीज शो नो मोअर दॅन 10% वीमेन आर्टिट्स ऑर नन अ‍ॅट ऑल, ही गुरिला गर्ल्स गटाची सुरुवातीची दोन पोस्टर्स होती.

ती न्यूयॉर्कमधील भिंतींवर, रस्त्यांवरील दिव्यांवर आणि टेलिफोन बूथवर लावण्यात आली होती. कलाक्षेत्रातील शक्तीशाली संस्था चालवणाऱ्यांकडून यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती.

गुरिला गर्ल्स यांचा जाहिरातीसाठीची भाषा किंवा स्लोगन स्वीकारण्याचा निर्णय हा एका कारणामुळे होता. पारंपारिक निदर्शनं किंव निषेधांच्या निष्प्रभतेसंदर्भात त्यांना वाटणारी प्रतिक्रिया म्हणून ही भाषा स्वीकारण्यात आली होती.

आदल्या वर्षी न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टच्या बाहेर होणाऱ्या निदर्शनात सहभागी झाल्यानंतर 1985 मध्ये या गटाची स्थापना झाली होती.

इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ रिसेंट पेंटिंग अँड स्कल्प्चरमध्ये 169 कलाकारांमध्ये फक्त 17 महिला कलाकार होत्या आणि 8 कृष्णवर्णीय किंवा इतर वंशाचे कलाकार होते.

त्या म्हणाल्या, "आमच्यापैकी काहीजण या निदर्शनात सहभागी झालो होतो. तिथे हे स्पष्ट दिसलं की, कोणालाही याची पर्वा नव्हती. प्रत्येकजण म्युझियममध्ये गेला. तुम्हाला महिलांच्या कलेबद्दलची ही सर्व चिन्हं माहित आहेत."

"त्यांचा एका मिनिटासाठीसुद्धा त्यावर विश्वास बसला नाही आणि तो खरोखर 'आहा' म्हणजे जाणीव करून देणारा किंवा आत्मबोध देणारा क्षण होता."

कोलविट्झ म्हणतात त्याप्रमाणे 'नेकेड' (नग्न) हे पोस्टर एक गेम-चेंजर होतं. ते बदलाला चालना देणारं होतं. "आपण अनेकदा, विचित्र दृश्य, तथ्यं आणि विनोद पाहतो. त्यांचा समावेश असलेल्या गोष्टी पाहतो. तुम्ही जर खरोखरंच आमच्या पोस्टरकडे पाहिलं तर तुम्हाला त्याच पद्धतीची कला पुन्हा दिसणार नाही."

'नाकारता न येणारा बदल'

केटी हेसेल लेखिका आणि पॉडकास्टर आहेत. त्यांनी 'द स्टोरी ऑफ आर्ट विदाऊट मेन' हे पुस्तक लिहिलं आहे.

यात त्या नमूद करतात की, "80 च्या दशकात उदयास आलेले कलाकार त्यांच्या घरातील टीव्ही पाहत कसे वाढले. महिलांबद्दलच्या माध्यमांमधील धारणा, मतांशी खेळत त्यांनी पुन्हा एकदा त्या दृष्टीकोनावर नियंत्रण मिळवलं आणि स्वत:वर लक्ष केंद्रीत केलं."

द गुरिला गर्ल्सनं कलेच्या विश्वातील असमानता आणि पद्धतशीर भेदभावाकडं लोकांचं लक्ष वेधलं. त्यांनी शेवटी प्रश्न विचारला की म्युझियम कलेच्या इतिहासाऐवजी पितृसत्ताक व्यवस्थेचा इतिहास कसा काय साजरा करू शकली?"

कलाक्षेत्रात महिलांचं स्थान मिळवण्यासाठी दबाव टाकणारी एक संघटना इथपासून ते त्यांना ज्या ठिकाणी हे स्थान निर्माण करायचं होतं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी हक्काची जागा मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यांचं आजवर अनामिक असणं सुद्धा त्यांच्या पथ्यावरच पडलं आहे. जगभरातील महिला कलाकारांसाठी कोण संघर्ष केला हे लक्षात ठेवणं यामुळेच शक्य होईल. या गटाच्या सर्व संस्थापक सदस्य कलाकार आहेत. पण गुरिला गर्ल्स म्हणून त्यांनी फ्रिडा काहलो आणि झुबैदा आगा यांच्यासारख्या हयात नसलेल्या कलाकारांची नावे धारण केली आहेत.

मायकल वेलेन लंडनमधील टेट मॉडर्नमध्ये वरिष्ठ क्युरेटर आहेत. तिथे या गटाच्या कामाचा विनामूल्य संग्रह प्रदर्शित केला जातो.

ते म्हणतात, "अनामिक असण्यापेक्षाही, ते ज्या पद्धतीनं हे सर्व करतात ते खरोखरंच हुशारीचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही कोणाशी बोलत आहात हे शोधताना शिकण्याचा एक क्षण असतो."

मेट संग्रहालयातील मूळ नग्न चित्रांची गणना झाल्यापासून कलेचं विश्व बदललं आहे. मात्र श्वेतवर्णीय कलाकार आणि इतर वंशाचे कलाकार, महिला कलाकार यांच्यातील असमानता किंवा भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे.

हे फक्त भिंतीवर कोणाचं चित्र टांगण्यात आलं आहे यासंदर्भातच नसतं तर कलेच्या बाजारातील इतर क्षेत्रात देखील दिसून येतं.

उदाहरणार्थ, 2024 मधील आर्ट बॅसेलच्या एका अहवालानुसार, संग्रहालयाच्या गॅलरीतून होणाऱ्या कलाकृती किंवा चित्रांच्या विक्रीत महिला कलाकारांच्या पेटिंग किंवा कलाकृतींचं प्रमाण फक्त 39 टक्के आहे.

अलीकडच्या अभ्यासातून देखील असं दिसून आलं आहे की, अमेरिकेतील प्रमुख संग्रहालयातील किंवा गॅलरीतील कायमस्वरुपी चित्र किंवा कलाकृतींपैकी 85 टक्के श्वेतवर्णीयांच्या आहेत आणि 87 टक्के पुरुषांच्या आहेत.

युकेमध्ये 2023 मध्येच लंडनमधील रॉयल अकॅडमीमध्ये मरिना अब्रामोविक यांच्या आयुष्यभरातील कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्या पहिल्या महिला कलाकार बनल्या होत्या, ज्यांचं प्रमुख गॅलरीमध्ये एकट्याचंच मोठं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.

"म्युझियम कला आणि समकालीन कलेच्या इतिहासाची मांडणी किंवा प्रतिनिधित्व कसं करकतात यासंदर्भात एक नाकारता न येणारा बदल झाला आहे. ते गुरिला गर्ल्सनं कलेच्या विश्वातील असमानतेला प्रकाश टाकल्यामुळेच मोठ्या प्रमाणात घडलं आहे," असं वेलेन म्हणतात.

गुरिला गर्ल्सच्या कामाचा विस्तार

सुरुवातीला पोस्टरद्वारे करण्यात आलेला निषेध म्युझियम आणि गॅलरींच्या भिंतीवर कोणाचं चित्रं किंवा कलाकृती दाखवण्यात येतील यावर टीका करणारा होता. मात्र आता गुरिला गर्ल्स आणि कलेच्या क्षेत्रातील इतर कार्यकर्त्यांच्या बाबतीत याचा विस्तार झाला आहे. ते अधिक खोलात जात आहेत.

ते आता निधी कुठून मिळवला जातो आणि देणगीदार त्यांचे पैसे कुठून कमावतात या गोष्टींची पडताळणी करत आहेत.

2019 मध्ये अमेरिकेन कला छायाचित्रकार आणि कार्यकर्त्या नॅन गोल्डिन या गुगेनहाइममधील निषेधात सहभागी झाल्या होत्या.

म्युझियमनं सॅकलर कुटुंबाकडून देणगी स्वीकारल्याचा निषेध म्हणून त्यात हजारो प्रिस्क्रिप्शन संग्रहालयाच्या मध्यभागी टाकली होती. पर्ड्यू फार्माची मालकी सॅकलर कुटुंबाकडे आहे. ही कंपनी ऑक्सिकाँटिन या पेनकिलरची निर्मिती करते.

या औषधामुळे ऑपिऑईड संकट वाढल्याचा आरोप आहे. ओपिएट्स किंवा ऑपिऑईड्स श्रेणीतील औषधाचा गैरवापर किंवा त्यामुळे झालेल्या मृत्युंना ऑपिऑईड संकट म्हटलं जातं. हा निषेध 'द ब्युटी अँड द ब्लडशेड' या माहितीपटात दाखवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये द गुरिला गर्ल्सचं काम आणखी विकसित झालं आहे आणि विस्तारलं आहे. यात व्यापक मुद्यांबद्दल भूमिका घेणं, पर्यावरणाशी निगडीत समस्यांना तोंड देणं आणि जगभरात त्यांची विशिष्ट शैली वाढवण्याचा समावेश आहे.

गुरिला गर्ल्सचे संस्थापक सदस्य एका सेलसारखे काम करतात. ते आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील जवळपास 60 सहकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग मिळवतात. यावर्षी मार्च महिन्यात, त्यांनी बल्गेरियन वीमेन्स फंडसह एक पोस्ट तयार केलं.

ते पोस्टर आहे, 'डोन्ट दे डिझर्व्ह मोअर दॅन अ थिन स्लाईस ऑफ गव्हर्नमेंट?' यात देशातील सरकारमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व नसल्याबाबत टीका करण्यात आली आहे.

प्रगतीचा मागोवा घेणं कठीण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुरिला गर्ल्सनं त्या ज्यामुळे चर्चेत आल्या होत्या त्या पोस्टरवर पुन्हा काम केलं आहे. सार्वजनिक दबाब असूनदेखील छोट्या गोष्टी कसा बदल घडवू शकतात यावरील हे एक अप्रिय किंवा कठोर भाष्य आहे.

संघर्षाचा अथक प्रवास

1989, 2005 आणि 2012 दरम्यान, मेट संग्रहालयातील नग्न महिला कलाकृतींची संख्या कमी झाली. मात्र प्रत्यक्षात महिला कलाकारांची संख्या कमी झाली.

अर्थात, प्रत्येक संस्थेच्या बाबतीत असं नाही. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या कामाच्यासंदर्भात, संदेश अतिशय स्पष्ट आहे - अजून बरंच काही करायचं आहे.

कोलविट्झ यांना जेव्हा विचारण्यात आलं की त्यांनी स्वत:चं उपनाव जर्मन कलाकारावरून का ठेवलं. त्यावर त्या म्हणाल्या, "मी तिला निवडलं कारण ती एक राजकीय कलाकार होती. गुरिला गर्ल्स आणि स्वत:ला देखील मी तेच मानते."

कॅथ कोलविट्झ यांचा जन्म 1867 मध्ये झाला होता. त्यांचं काम महिलांवर केंद्रित होतं आणि तीव्रतेनं युद्धविरोधी होतं.

शैलीचा विचार करता त्यांचं काम गुरिला गर्ल्सपेक्षा खूपच वेगळं आहे. मात्र त्यांच्या कामाचा किंवा विषयाचा आशय एकमेकांशी जुळतो. व्यवस्थेविरोधातील बंडखोरपणा तोच आहे.

गुरिला गर्ल्स सक्रिय आहेत. 40 वर्षांचा प्रवास पूर्ण करणं हा एक चिंतनाचा क्षण आहे, महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र त्याचबरोबर ही पुढे पाहण्याची देखील वेळ आहे. तुम्हाला वाटेल अनेक दशकं अन्यायाशी झुंज देणाऱ्या आणि गोगलगायीच्या संथ गतीनं प्रगती करणाऱ्या व्यक्तीला थकवा येईल.

मात्र कोलविट्झ म्हणतात की बदल घडवण्याचं आव्हानच त्यांच्या गटाला प्रेरणा देतं. नोव्हेंबर महिन्यात ते लॉस एंजेलिसमधील गेटी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रदर्शन भरवणार आहेत. एक ग्राफिक कांदबरीदेखील तयार होते आहे.

त्या म्हणतात, "आम्ही संघर्ष करणं थांबवणार नाही. आमचा लढा अजून संपलेला नाही."

'गुरिला गर्ल्स: मेकिंग ट्रबल' हे प्रदर्शन 28 सप्टेंबरपर्यंत वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल म्युझियम ऑफ वीमेन इन द आर्ट्समध्ये आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)