You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सळई रिक्षावर पडून मुंबईत मायलेकीचा मृत्यू
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. इमारतीवरून सळई पडून रिक्षातील महिलेसह बालिकेचा मृत्यू
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडली. या दुर्घटनेत रिक्षात बसलेल्या मायलेकीचा मृत्यू झाला आहे.
एआयएम ग्रुप व मलकानी डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत इमारतीचं बांधकाम सुरू आहे. अपघातानंतर जोगेश्वरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या दोघींना मुंबई महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केलं. पण महिलेला मृत घोषित करण्यात आलं. तर मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
या इमारतीजवळून रिक्षाने जात असलेल्या आयत व शमा यांच्या डोक्यात या इमारतीवरुन लोखंडी रॉड पडला. शनिवारी सायंकाळी 4.45च्या सुमारास ही घटना घडली. शमा हिला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
आयत हिची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी तिला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तत्पूर्वीच तिचं निधन झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
शमा यांचे पती आसिफ हे टेलर म्हणून काम करतात तर त्या स्वत: गृहिणी होत्या. या दुर्घटनेत रॉड घुसून रिक्षाचंही नुकसान झालं.
काही दिवसांपूर्वी वरळीतील फोर सीझन रेसिडेन्सी या निर्माणधीन हॉटेलच्या इमारतीवरुन क्रेनला लावलेला सिमेंटचा ब्लॉक कोसळून रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. रॉड पडून झालेल्या अपघातामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
2. ईडीचे लालूंच्या मालमत्तेवर छापे
लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित 24 ठिकाणी छापे टाकले आहेत.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार या धाडींमध्ये एक कोटी रुपयांची रोकड, 1900 अमेरिकी डॉलर, जवळपास 540 ग्रॅम सोने आणि सुमारे दीड किलोचे सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
तसेच दक्षिण दिल्लीमधील एका घरातही छापेमारी करण्यात आली. तिथे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते.हे घर दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, आता पाच वर्षानंतर ईडी सीबीआयने कारवाई का सुरू केलीय.
3. हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स
हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं.
ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. 'टीव्ही9मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
4. ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे शनिवारी (दि. 11) मुंबईत निधन झाले. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत अनेक नाटकांवर त्यांनी लिखाण केलं आहे. नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने 2019 सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
5. गुजरात विधानसभेत बीबीसीविरोधात ठराव
'पंतप्रधानांची लोकप्रियता आणि प्रतिमा खराब केल्याबद्दल' केंद्र सरकारने बीबीसीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुजरात विधानसभेत एका ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
बीबीसीने 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारीत डॉक्युमेंटरी दाखवून पंतप्रधान मोदींची प्रतिमा खराब केल्याचं ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय.
विधानसभेत ठराव मांडताना भाजपचे आमदार विपुल पटेल म्हणाले की, "बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' या माहितीपटात काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे."
अलीकडेच बीबीसीने 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' ही डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. ही डॉक्युमेंटरी केवळ ब्रिटनमध्ये राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रकाशित करण्यात आली होती. भारतात या डॉक्युमेंटरीवर बंदी असून हा केंद्र सरकारने याला 'विरोधी प्रचार' असल्याचं म्हटलं होतं. 'एबीपी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)