You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टॉवर ऑफ सायलन्स : पारशी लोक मृतदेहांचे दफन किंवा दहन का करत नाहीत?
पारशी लोक आपले प्रियजन मरण पावल्यानंतर त्यांच्या देहाला ज्या जागी निसर्गाच्या स्वाधीन करून टाकतात त्या जागेला 'टॉवर ऑफ सायलन्स' (शांततेचा मनोरा) असं म्हणतात.
ही प्रथा प्राचीन काळापासून पारशी समुदायात चालत आली आहे. याला 'दखमा' असे म्हणतात.
पारशी लोकांची अशी धारणा आहे की, मानवी शरीर हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. त्यामुळे मृत्यूनंतर त्याला निसर्गाच्या स्वाधीन करायचं असतं.
संपूर्ण जगभर पारशी लोक अशाचप्रकारेअंतिम संस्कार करतात. कोलकात्यामध्येही हीच पद्धत पाळली जाते.
पूर्व आशियातील पहिला 'टॉवर ऑफ सायलन्स' कोलकात्यामध्ये
कोलताच्या बेलेघाट पारशी बागेत पहिला 'टॉवर ऑफ सायलन्स' 1822 मध्ये बांधण्यास सुरूवात झाली आणि 1828 मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
त्यावेळी कोलकातामध्ये पारशी समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहत होते.
तिथले नावाजलेले व्यावसायिक नौरोजी सोराबजी उमरीगर यांनी पहिला ‘टॉवर ऑफ सायलन्स’ बांधला होता.
संशोधक आणि लेखिका प्रोची मेहता सांगतात, असं म्हटलं जातं की जो कोणी 'टॉवर ऑफ सायलन्स' बांधतं किंवा त्याच्यासाठी दान देतं, सर्वांत आधी त्याचाच मृतदेह तिथे पोहोचतो. कोलकातामध्येही अशाप्रकारच्या घटना घडल्या घडल्या आहेत. ज्यांनी सर्वात आधी 'टॉवर ऑफ सायलन्स' बांधला त्यांचाच मृतदेह सर्वात आधी इथे आणण्यात आला.
त्यांचा एक पाळीव कुत्रा होता, जो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचा. मालकाच्या मृत्यूनंतर त्या कुत्र्याने खाणं-पिणंसुद्धा सोडून दिलं होतं. सात दिवसांनंतर तोसुद्धा मरण पावला, मग त्यालाही 'टॉवर ऑफ सायलन्स'च्या बाहेर पुरण्यात आलं.
पूर्व आशियाचा पहिला 'टॉवर ऑफ सायलन्स' कोलकाता मध्येच बांधला गेला होता. त्यावेळी 'कोलकाता' हे 'कलकत्ता' या नावाने ओळखले जायचे. असा दावा केला जातो की रंगून, मलय आणि एवढंच नव्हे तर सिंगापूरहूनही मृतदेहांना कोलकाताच्या 'टॉवर ऑफ सायलन्स'मध्ये आणलं जायचं. तिथे ठेवलेल्या मृतदेहांना काही काळानंतर गिधाडे खात असत आणि हळूहळू ऊन, पावसात त्या मृतदेहाचे पूर्णपणे विघटन होई.
'टॉवर ऑफ सायलन्स' हे फक्त गिधाडांसारख्या पक्ष्यांवरच अवलंबून नसतं. याप्रकारच्या अंतिम संस्कारांचा प्रमुख उद्देश हा असतो की यानिमित्ताने तुमच्या आयुष्यातील शेवटचं परोपकारी काम करता येईल.
गिधाडे आणि इतर पक्ष्यांसोबतच सूर्याच्या उष्णतेचाही यावर परिणाम होतो, असं कोलकाताच्या पारशी अग्नी मंदिराचे पुजारी असलेले जिमी होमी तारोपोरवाला सागंतात.
पारशी लोकांचा असा विश्वास आहे की, मृतदेहांना पुरल्याने किंवा त्यांना नदीत सोडल्याने निसर्गाला हानी पोहोचते. त्यामुळे ते वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेचं पालन करतात.
'टॉवर ऑफ सायलन्स'ची रचना
कोलकाताच्या पारशी समुदायाच्या धार्मिक आणि चॅरिटेबल फंडचे वरिष्ठ ट्रस्टी नूमी मेहता सांगतात, प्रत्येक मृतदेह हा ‘नासो’चा उगमस्थान असतो. आमच्या भाषेत ‘नासो’ म्हणजे प्रदूषण. कुणाच्याही मृतदेहामुळे कुठलीही जागा प्रदूषित होणे आम्हाला मान्य नाही.
मृतदेहाला नदीत फेकल्याने पाणी प्रदूषित होतं, जाळल्याने हवा प्रदूषित होते. म्हणूनच आम्ही मृतदेहाला निसर्गाच्या स्वाधीन करून टाकतो.
'टॉवर ऑफ सायलन्स’ची बांधणी अशाप्रकारे केली जाते की, आम्ही अतिशय जड मृतदेहांना सर्वात वर, महिला आणि कमी वजनाचे मृतदेह मधोमध आणि मुलांच्या मृतदेहांना सर्वात खाली ठेवतो.
मृतदेहांना गिधाडे आणि इतर पक्षी खातात आणि उरलेली हाडं खाली विहिरीमध्ये पडतात. वर्षातून एक-दोनदा उरलेली सर्व हाडं काढून त्यांची विल्हेवाट लावली जाते.
पारशी लोकांची संख्या घटली
एकेकाळी कोलकातामध्ये पारशी लोक मोठ्या संख्येने राहत होते. पण आता तिथे केवळ 370 पारशी उरले आहेत.
ज्यामधील 220 लोकं 60 वर्षांवरील आहेत. 30 लोकं 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे इथल्या 'टॉवर ऑफ सायलन्स'मध्ये खूप कमी मृतदेह येतात.
स्थानिक रहिवाशी बबली सामंता सांगतात की, आजवर ही प्रक्रिया मी तीन वेळा पाहिली आहे. त्यावेळी सर्वांनी पांढरे कपडे घातले होते. आम्ही 'टॉवर ऑफ सायलन्स'पाशी कधीच गेलो नाही. कारण तो भाग जंगलाचा आहे.
मी एका इमारतीच्या गच्चीवरून हे सर्व पाहिलं. मृतदेहाला घेऊन येताना ते मंत्रोच्चार करतात. मग 'टॉवर ऑफ सायलन्स'मध्ये जातात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व लोक एकत्रितपणे ओरडतात.
नवीन पिढीचा दृष्टीकोन बदलला
काळ आता बदलतोय. गिधाडेसुद्धा जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर 'टॉवर ऑफ सायलन्स’च्या आजूबाजूच्या परिसरातही लोकवस्ती वाढू लागली आहे.
लोकांची विचारसरणीसुद्धा बदललेय. त्यामुळे आजकाल पारशी लोकांचा कल मृतदेह जाळण्याकडे किंवा पुरण्याकडे वाढू लागला आहे.
गुलनार मेहता सांगतात की, "जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा आम्ही त्यांच्या मृतदेहाला 'टॉवर ऑफ सायलन्स'मध्ये घेऊन जाऊ शकले नाही किंवा आजच्या काळात असं करणं व्यवहार्य़ नाहीये.
तिथल्या गिधाडांची संख्या कमी झाल्याने मृतदेहांची नैसर्गिकत्या विल्हेवाट लागत नाही. त्यामुळे आम्ही वडिलांच्या मृतदेहाला जाळण्याचा निर्णय घेतला. आम्ही मृतदेहाची राख 'टॉवर ऑफ सायलन्स'मध्ये पुरून त्यावर झाड लावले. मी वर्षातून एकदा त्या ठिकाणाला भेट देते."
व्यावसायिक जहान मेहता सांगतात की, आम्हाला 'टॉवर ऑफ सायलन्स'बद्दल तितकीच माहिती आहे, जितकं त्याबद्दल लिहिलं गेलं आहे. आम्ही तिथे फारसं जात नाही. कदाचित अंत्यसंस्कार करण्याची ही योग्य पद्धत राहिलेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेला पर्यावरणपूरक म्हणता येणार नाही. काळासोबत आपण पुढे जायला हवं आणि सर्वात चांगला पर्याय कोणता याचा शोध घेतला पाहिजे.
सान्या मेहता-व्यास असं म्हणतात की, "नवीन पिढी याचा स्वीकार करेल का? ही योग्य पद्धत आहे का? हे योग्य आहे, असं मला तरी वाटत नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे आम्ही आता शहरात राहतो. तुम्ही बघू शकता का, की शरीराचे अवयव कुठेतरी विखुरलेले आहेत? तुम्हाला असं वाटतं का, असं करणं योग्य आहे? "
पारशी पुजा-यांचा प्रथेमध्ये विश्वास
पारशी लोकांची नवीन पिढी आता या प्रथेपासून दूर जात आहे. परंतु पारशी पुजा-यांचा अजूनही या प्रथेमध्ये विश्वास आहे.
जिमी होमी तारोपोरवालांच्या मते, "जर तुम्ही या धर्मावर विश्वास ठेवत नसाल, तर तुम्हाला कोणताही निर्णय घेता येऊ शकतो. जर तुमचा देवावर विश्वास नाही किंवा कोणत्याही प्रथेला मानत नसाल तर तो तुमच्या वैयक्तिक निर्णय असेल.
पण साधारणपणे बहुतांश पारशी आपल्या परंपरांचे पालन करतात आणि त्यामुळेच आजही 'टॉवर ऑफ सायलन्स'चं महत्त्व टिकून आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)