वैष्णवी हगवणे प्रकरणासारखाच हुंड्यासाठी तरुणीचा छळ? विवाहितेला जाळल्याचा सासरच्यांवर आरोप

    • Author, चंदनकुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील दादरी परिसरातील ते घर, जिथे निक्कीचं हसत-खेळत बालपण गेलं, आता हे घर दुःखात बुडालं आहे. घर आणि घराजवळील संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काहींच्या डोळ्यांत अश्रू आहेत, काहींच्या चेहऱ्यावर राग आहे, तर काही जण अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

21 ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडातील सिरसा गावात निक्की नावाच्या तरुणीचा जळून मृत्यू झाला.

या प्रकरणी निक्कीच्या सासरच्या मंडळींवर आरोप आहे. ज्यात निक्कीचा पती विपिनला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे.

निक्कीसोबत झालेल्या हिंसेचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ निक्कीच्या बहिणीने तिच्या मृत्यूपूर्वी बनवला होता असा दावा केला जात आहे.

विपिन आणि निक्कीच्या सासरच्या मंडळींकडून सतत महागडी गाडी आणि 36 लाख रुपयांची मागणी केली जात होती, असा निक्कीच्या वडिलांचा आरोप आहे.

याच कारणामुळे निक्कीला त्रास दिला जात असे आणि तिला मारहाण केला जात होती.

पोलिसांनी निक्कीचा पती विपिन, सासू दयावती, सासरा सतवीर आणि विपिनचा भाऊ रोहित यांना अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात वैष्णवी हागवणे या युवतीने हुंड्याच्या छळातून आत्महत्या केली होती, तिच्या मृत्यूसाठी तिचे सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप माहेरच्यांनी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

जसा वैष्णवी हागवणेच्या लग्नासाठी हुंडा जबाबदार असल्याचे माहेरच्या लोकांनी म्हटले त्याचप्रमाणे निक्कीच्या कुटुंबीयांनी देखील हुंड्यासाठीच निक्कीचा छळ झाल्याचे म्हटले आहे.

नोटबंदीदरम्यान झालं होतं लग्न

दादरीच्या रूपवास गावातील निक्की आणि तिची मोठी बहीण कंचनचं लग्न डिसेंबर 2016 मध्ये ग्रेटर नोएडातील सिरसा गावात एकाच कुटुंबातील दोन भावांशी झाला होता.

त्या वेळी देशात नोटबंदीमुळे लोकांकडे रोख रकमेची कमतरता होती. निक्कीचे वडील भिखारी सिंह यांनी तरीही दोन्ही मुलींच्या लग्नाच्या खर्चात कोणतीही कसर सोडली नसल्याचे बीबीसी हिंदीला सांगितलं.

लग्नानंतर निक्कीच्या पतीला एक कार दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. पण त्यांचा आरोप आहे की, तिच्या सासरची मंडळी सतत महागडी गाडी आणि सुमारे 36 लाख रुपयांची मागणी करत होते.

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी बहीण कंचनने स्वतः निक्कीला होणाऱ्या मारहाणीचा व्हीडिओ बनवला. तिने तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु निक्कीला पेटवलं गेलं. नंतर तिने तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेलं, पण ती वाचू शकली नाही."

निक्कीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, जळाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं.

परंतु, सफदरजंग रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निक्कीचा मृत्यू झाला.

कंचनने बनवलेला व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. आता रूपवास गावातील निक्कीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांमध्ये शोक आणि संताप पसरला आहे.

निक्कीच्या आजी फुलवती यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. बीबीसी हिंदीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "आता मी माझ्या मोठ्या नातीला (कंचन) इथं घरातच ठेवेन, नाहीतर ते तिलाही जगू देणार नाहीत. इथंच एक खोली बांधून देईन आणि ती आपल्या मुलांना शिकवेल."

निक्कीची बहीण कंचनला दोन मुलं आहेत. तर निक्कीला एक मुलगा आहे, जो सहा वर्षांचा आहे.

सोशल मीडियावर तिच्या मुलाचं एक वक्तव्यही शेअर केलं जात आहे, ज्यात तो आपल्या आईवर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलत आहे.

निक्कीच्या मावशी हेमलता म्हणाल्या की, "आपण आपल्या मुलीसोबत असं व्हावं म्हणून त्यांना जन्म देतो आणि वाढवतो का? यापूर्वीही तिला मारहाण झाली होती, तेव्हा ती आपल्या वडिलांच्या घरी आली होती, परंतु पंचायतच्या सांगण्यावरून आम्ही तिला परत सासरी पाठवलं होतं."

हेमलता म्हणतात, "समाजाच्या सांगण्यावर आम्ही तडजोड केली होती. सासरच्या लोकांनी सांगितलं होतं की, आता पुन्हा असं काही होणार नाही. पण बघा, आमच्या मुलीबरोबर काय झालं."

सहा महिन्यांपूर्वीच निक्की आपल्या वडिलांच्या घरी आली होती. त्यानंतर या प्रकरणी पंचायत बोलावण्यात आली होती, असं नातेवाईकांनी सांगितलं.

निक्कीच्या वडिलांनी सांगितलं की, पंचायतवरील विश्वास आणि पतीच्या माफीनंतर निक्कीला परत सासरी पाठवण्यात आलं होतं.

आरोपीने काय सांगितलं?

या प्रकरणात निक्कीची बहीण कंचनने निक्कीचा पती, सासू, सासरा आणि दीराविरुद्ध म्हणजेच तिच्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणजे निक्कीचा पती विपिन आणि त्याची आई दयावती यांना घटनेनंतर अटक केली आहे.

दरम्यान, विपिनने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या विपिनवर पत्रकारांनी याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले.

विपिन म्हणतो, "ना मी तिला मारलं, ना काही केलं. ती स्वतःच मरण पावली आहे. सगळीकडेच पती-पत्नीमध्ये भांडणं होत असतात. यापेक्षा जास्त मला काही म्हणायचं नाही."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिनने रविवारी (24 ऑगस्ट) तपासणीदरम्यान पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात ज्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला होता, तो पदार्थ जप्त करताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, असं ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त (एडीसीपी) सुधीर कुमार यांनी सांगितलं.

एडीसीपी सुधीर कुमार म्हणाले की, "आरोपीने पोलीस निरीक्षकाचं पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेचच त्याला घेरलं, तेव्हा त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. त्याला उत्तर म्हणून पोलिसांनीही गोळी झाडली, जी आरोपीच्या पायाला लागली."

आरोपीच्या घराला कुलूप

विपिन काही काम करत नव्हता, म्हणून काही वर्षांपूर्वी निक्कीने तिच्या बहिणीसोबत सासरच्या घरात वरच्या मजल्यावर एक ब्यूटी पार्लर सुरू केलं होतं, असं निक्कीचे वडील आणि इतर नातेवाईकांनी सांगितलं.

पार्लरचं काम चांगलं सुरू होतं, परंतु सासरच्या मंडळींच्या दबावामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांना हे ब्यूटी पार्लर बंद करावं लागलं.

बीबीसी प्रतिनिधी जेव्हा ग्रेटर नोएडा येथील आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा त्या घराला कुलूप लावण्यात आलं होतं.

या घराच्या बाहेर काही दुकानं आहेत, जी बंद होती. त्यातल्या एका बंद किराण दुकानावर 'विपिन' हे नाव लिहिलेलं होतं, जे निक्कीच्या पतीचं नाव आहे.

मात्र, या प्रकरणावर विपिनचे शेजारीही बोलायला तयार नव्हते.

शेजारच्या एका महिलेनं फक्त एवढंच सांगितलं की, निक्कीच्या घरातून आधीही भांडण आणि मारहाणीचे आवाज येत असत.

दादरीचे एसएचओ अरविंद कुमार यांनी बीबीसी हिंदीला याप्रकरणी माहिती दिली. "घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. निक्कीला याआधीही मारहाण झाली असली तरी, अशी कोणतीही माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती," असं त्यांनी स्पष्ट केलं.

निक्कीच्या मोठ्या बहिणीनं आता हे प्रकरण कायद्याच्या दारात नेलं आहे. परंतु, त्यांचा भाऊ अतुलला मात्र हा निर्णय घेण्यास उशीर झाला अशी खंत वाटते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)