पोटच्या मुलीचं वडिलांनीच केलं अपहरण, डिलीट केलेल्या मेसेजनं कसं उलगडलं प्रकरण?

    • Author, शहजाद मलिक
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इस्लामाबादमधील बिलाल टाऊनमध्ये राहणाऱ्या परवीन (बदललेले नाव) या महिलेनं मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्या नवजात मुलीला अज्ञात लोकांनी पळवून नेल्याची तिची तक्रार होती.

एफआयआरमध्ये आईनं पोलिसांना सांगितलं की, "17 ऑगस्टच्या पहाटे माझ्या मुलीचा जन्म झाला. 17 आणि 18 ऑगस्टच्या मध्यरात्री साधारण दोन वाजता मी बाळाला दूध पाजलं आणि त्यानंतर ती झोपी गेली."

"मी बाळावर चादर पांघरली आणि स्वतःही झोपले. पण साधारण 15 मिनिटांनी माझी झोप उघडली. त्यावेळी मी पाहिलं तर बाळ पलंगावर नव्हतं."

आईनं पोलिसांना ती पती आणि त्याच्या दोन भावांसोबत राहते, असं सांगितलं.

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेनं बाळ जागेवर नसल्याचं लक्षात आल्यानंतर आरडाओरडा केला आणि घरच्यांना सांगितलं.

त्यानंतर तिचा पती आणि दीर बाळाचा शोध घेऊ लागले, पण नवजात मुलीचा काहीच पत्ता लागला नाही.

महिलेनं पोलिसांना बाळ शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून लगेच तपासही सुरू केला.

इस्लामाबादमधील खन्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलाल टाउनमध्ये ही घटना घडली.

'घरातल्याच सदस्यावर होता संशय'

खन्ना पोलीस ठाण्याचे प्रभारी आमीर हयात यांनी बीबीसीला सांगितलं की, तपासाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी घटनास्थळाजवळच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग मिळवण्याचा प्रयत्न केला.

"हा भाग दुर्गम असल्यानं इथं फार सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पण, जवळच्या बिलाल मार्केटमधील कॅमेरे तपासले तेव्हा, घटनेच्या मध्यरात्री अडीच वाजता नवजात मुलीचे वडील आणि दोन काका बाळाला शोधण्यासाठी इकडे-तिकडे धावत असल्याचं दिसून आलं."

त्यांनी सांगितलं की, ज्या घरातून बाळ गायब झालं होतं, त्या घराचीही पोलिसांनी पाहणी केली. तपासात असं समोर आलं की, घराचं दार आतून बंद होतं आणि बाहेरून कोणी येऊन ते उघडूही शकत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी त्याच आधारे पुढील तपास सुरू केला.

घटनास्थळाची पाहणी आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब ऐकल्यानंतर घरातीलच कोणीतरी या गुन्ह्यात सहभागी असू शकतं असा संशय पोलिसांना आला.

'डिलीट केलेला मेसेज'

आमीर हयात यांच्या मते, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी नवजात बाळाचे वडील आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या दोन भावांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आणि त्यांची चौकशीही केली.

नवजात बाळाचे दोन्ही काका वॉटर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं काम करतात, असं आमीर यांनी सांगितलं.

या प्रकरणाच्या तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, बाळाच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. पण त्याचा जबाब त्याच्या पहिल्या जबाबाशी जुळत नव्हता. चार वेळा दिलेला जबाबही आधीच्या जबाबांशी जुळत नव्हता.

खन्ना पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, त्या नवजात बाळाच्या वडिलांचे जबाब सारखे बदलत होते. ते पाहून त्यांच्या मोबाइलचा रेकॉर्ड तपासण्यात आला. त्यातून घटनेच्या रात्री त्यानं अनेक मेसेज डिलीट केले होते, हे समोर आलं. पोलिसांनी नंतर ते रिकव्हरही केले.

त्यांनी सांगितलं की, ज्या नंबरवर मेसेज केला होता आणि नंतर डिलीट केला, तो नंबर मोबाइलमध्ये सेव्ह केला नव्हता. त्यांच्या मते,त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, 'अल्लाह हाफिज, बाय.'

पोलिसांच्या मते, शेवटचा डिलीट केलेला मेसेज हा जेव्हा बाळाच्या आईनं तिच्या नवजात मुलीच्या अपहरणाची घटना घडल्याचं सांगितलं होतं, त्या वेळचा होता. त्या नंबरवर कॉल केल्यावर एका महिलेनं फोन उचलला आणि आपलं नाव सांगितलं.

पोलीस अधिकारी आमीर हयात म्हणाले की, त्या महिलेबद्दल जेव्हा बाळाच्या वडिलाला विचारलं तेव्हा ते सुरुवातीला काहीही सांगू लागले. पण, पोलिसांनी आणखी सखोल चौकशी केली तेव्हा कळलं की, बाळाच्या अपहरणात वडिलांचाच हात होता.

आमीर हयात यांच्या मते, याच क्षणी या प्रकरणाशी संबंधित आणखी तिघांचे धागेदोरे समोर आले.

निपुत्रिक महिलेला दिलं बाळ

पोलिसांच्या माहितीनुसार, नवजात मुलीचे वडील पाण्याचा टँकर चालवतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची ओळख त्याच गल्लीतील एका महिलेशी झाली होती. त्या महिलेच्या मुलीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, परंतु तिला अपत्य होत नव्हतं.

'आरोपीला आधीपासूनच तीन मुलं आहेत. त्यानं त्या महिलेला वचन दिलं होतं की, आता त्याला मुलगा किंवा मुलगी झाली तर तो ते बाळ तिच्या मुलीला देईल.'

तपास अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपीची पत्नी गर्भवती राहिल्यावर त्यानं ही माहिती त्या महिलेला दिली. त्या महिलेनं ही गोष्ट आपल्या मुलीला सांगितली आणि मुलीनं आपल्या सासरच्यांना आपण गर्भवती असल्याचं सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार तब्बल नऊ महिने असाच सुरू होता.

एसएचओंनी सांगितलं की, ज्या मुलीला बाळ द्यायचं ठरलं होतं तिच्या पतीला या गोष्टीबाबत माहिती होती.

पण ती मुलगी सासरच्यांसमोर पोटावर कापड बांधून फिरत होती, जेणेकरून ती गर्भवती असल्यासारखी सर्वांना दिसावी.

चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं की, मुलगी जन्मल्यावर त्यानं सगळ्यात आधी त्या महिलेला कळवलं. आणि तिला सांगितलं की, तो वचन पाळेल व आपली मुलगी तिच्या निपुत्रिक मुलीला देईल.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात त्या महिलेची मुलगी प्रसुतीच्या बहाण्याने आईच्या घरी राहायला आली.

आरोपीनं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं की, 18 ऑगस्टच्या रात्री त्यानं नवजात मुलगी त्या महिलेकडे सुपूर्द केली. त्यानंतर महिलेनं मुलीच्या सासरच्यांना बाळाचा जन्म झाल्याची माहिती दिली आणि पहिलं अपत्य झाल्याच्या आनंदात मिठाईही वाटण्यात आली, असं पोलीस म्हणाले.

आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस बाळाला परत घेण्यासाठी त्या महिलेच्या घरी गेले, तेव्हा तिनं बाळ देण्यास नकार दिला आणि ही तिचीच मुलगी आहे, तिचा जन्म पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पिम्स) हॉस्पिटलमध्ये झाला असल्याचं सांगितले.

पोलीस अधिकारी आमीर हयात म्हणाले की, पोलिसांनी पिम्सच्या स्त्रीरोग वॉर्डचे रेकॉर्ड तपासले तेव्हा तिथं त्या महिलेचं नाव नोंदवलेलं नव्हतं.

या प्रकरणाच्या तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, ज्या महिलेला बाळ देण्यात आलं होतं, तिनं चौकशीदरम्यान सांगितलं की आरोपीनं नवजात मुलगी तिच्याकडे दिल्यावर ती आपल्या आई आणि पतीसोबत पिम्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोग वॉर्डमध्ये गेली होती.

त्यावेळी तिनं बाळासोबत व्हीडिओ काढून तो आपल्या सासरच्यांनाही पाठवला होता.

पोलिसांनी नवजात बाळाची सुटका करून तिला तिच्या आईकडे परत दिलं आहे. तसेच बाळाचे वडील आणि त्यांनी ज्यांना बाळ दिलं ती महिला तिचा पती आणि त्या महिलेची आई या सर्वांना अटक केली.

या चारही आरोपींना इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)