You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
M.techचे शिक्षण अन् IT कंपनीत नोकरी केलेल्या तरुणाला जुगाराचं व्यसन; घरफोड्यांच्या आरोपात अटक
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
चांगले गुण मिळवून आधी इंजिनिअरींग आणि त्यानंतर एम. टेकचे शिक्षण पूर्ण केले. आयटी कंपनीत नोकरीवरही लागला. पण, हाच तरुण घरफोडीत सराईत झाला आणि चोरी करू लागला, असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे.
25 वर्षांच्या या तरुणाचं नाव आहे आशिष रेडीमल्ला.
संबंधित तरुणाने पोलिसांसमोर चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
इतका सुशिक्षित असतानाही हा तरुण नेमका कशामुळे चोरीच्या घटनांकडे वळला? यावरुन चर्चा सुरू झाली आहे. तो चोऱ्या कशा करायचा आणि पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, हे आपण पाहू.
नागपूर पोलिसांच्या हाती कसा लागला?
धंतोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विकासनगर भागातल्या शितल चिंतलवार या दोन दिवसांसाठी चंद्रपूरला गेल्या होत्या.
त्याच दिवसांत त्यांच्या घराचं कुलूप तोडून त्यांच्या घरातून 22 हजार रुपये चोरीला गेले होते.
ही घटना 8 जूनला घडली होती. त्यानंतर त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता आरोपीचा स्पष्ट चेहरा त्यात दिसला. त्यानंतर हा आरोपी नागपूर शहरातला नाही, असं समजल्यानंतर पोलिसांनी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये फोटो पाठवले.
हा आरोपी चंद्रपूरचा असल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात देखील चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला अटकही झाली होती.
या घटनेनंतर 13 जून रोजी नागपूर पोलिसांनी चंद्रपूरला त्याच्या घरी जाऊन त्याला अटक केली.
त्याला कोर्टात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याला आता पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल.
नागपुरातील अजनी आणि सोनेगाव पोलीस त्याची कोठडी मागणार आहेत, अशी माहिती धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.
आशिषला अटक केल्यानंतर चौकशी केली असता त्यानं चोरी केल्याची कबुली दिली.
याआधीही धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच चोऱ्या झाल्या होत्या. पण, त्यामधील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नव्हते. पण, आताच्या चोरीत चोराचा चेहरा स्पष्ट दिसत होता.
त्याआधारे आरोपीला अटक केल्यानंतर या पाच चोऱ्यांपैकी तीन चोऱ्या त्यानं केल्या असल्याची कबुली दिली आहे. तसेच नागपूर शहरातील सोनेगाव आणि अजनी भागात सुद्धा चोरी केल्याची कबुली त्यानं दिली आहे.
त्याच्याकडून जवळपास 2 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये विदेशी चलन सुद्धा आहे.
यामध्ये अमेरिकन डॉलर आहेत, 100 युरो आहेत जे चोरीच्या माध्यमातूनच एका घरातून त्याला मिळाले आहेत.
आरोपी उच्चशिक्षित आणि नोकरी करणारा असून चोरीकडे कसा वळला?
आरोपी आशिष रेडीमल्ला याने सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरींग आणि एम. टेकचे शिक्षण घेतले.
आशिष नागपुरच्या मिहानमधील एका कंपनीत नोकरीलाही लागला.
त्यामुळे तो नागपुरातच राहायचा. त्यानंतर त्याला पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीत मिळाली. तिथं त्याला सुरुवातीला 38 हजार रुपये पगार मिळत होता. पण, एम. टेकचे शेवटचे वर्ष असल्यानं प्रोजेक्ट सबमिट करायला तो चंद्रपूरला आला आणि परत गेलाच नाही.
सुट्ट्या जास्त झाल्यानं त्याला नोकरीवरून काढूनही टाकलं. त्यानंतर तो चंद्रपुरात त्याच्या घरीच राहत होता.
इंजिनिअरींग करतानाच त्याला जुगाराची सवय लागली होती. 2019 पासून तो जुगार खेळायचा.
सुरुवातीला खूप पैसे जिंकले. त्यामुळे त्याची जुगाराचं व्यसन वाढत गेलं.
नोकरीला लागल्यानंतरही तो जुगार खेळायचा. नोकरी सुटल्यावर चंद्रपुरात राहायला आला त्यावेळी जुगाराची सवय आणखी वाढली.
जुगारामुळे त्याच्यावर 23 लाख रुपये कर्ज सुद्धा झालं आहे. हे कर्ज फेडण्यासाठी आणि पुन्हा जुगार खेळण्याकरीता पैसे जमवण्यासाठी त्यानं 2022 मध्ये पहिली चोरी केली.
तो राहत असलेल्या रामनगर परिसरातच त्यानं पहिली चोरी केली. त्यानंतर असं करत करत तो घरफोड्या करण्याकडे वळला, अशी माहिती अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.
चंद्रपूरहून रात्री नागपुरात बसने येऊन करायचा चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो नागपुरात मिहानमध्ये नोकरी करायचा.
त्यामुळे त्याला सोनेगाव, धंतोली, छत्रपती चौक हा परिसर चांगलाच माहिती होता. त्याचाच फायदा त्यानं घेतला.
तो बसनं सायंकाळी चंद्रपूरवरून नागपुरात येत होता. छत्रपती चौकात उतरायचा. तिथेच रात्री 1 वाजेपर्यंत थांबायचा आणि लोक झोपी गेले की कुलूपबंद घर शोधत फिरायचा.
त्याच्याकडे बॅगमध्ये लोखंडी रॉड होता. त्या रॉडने तो घरफोडी करायचा. विशेष म्हणजे या सगळ्या चोऱ्या त्यानं एकट्यानं केल्या आहेत. तसेच तो पाठीवर बॅग घेऊन फिरायचा.
त्यामुळे तो कोणी चोर असेल अशी शंकाही येत नव्हती. चोरी केल्यानंतर पुन्हा सगळा माल घेऊन तो चंद्रपूरला जायचा. तिथं जुगारात पैसे उडवले की पुन्हा दुसरी चोरी करायचा.
जुगाराच्या व्यसनामुळे एक एम. टेक. शिकलेला, नोकरीवर असलेला मुलगा घरफोड्यांकडे वळला आणि चोर झाला. त्यामुळे जुगाराचं व्यसन किती भंयकर असतं याची कल्पना येईल, असं पोलिसांनी म्हटले.
दरम्यान, बीबीसी मराठीने संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर बातमी अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)