बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. समलिंगी विवाह : सुप्रीम कोर्टातल्या दहा दिवसांच्या सुनावणीत काय काय झालं?

सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या मागणीशी निगडित याचिकांवर गेले काही दिवस सुनावणी सुरू होती. त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा, आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा या घटनापीठात समावेश आहे.

या प्रकरणाची सुनावणी 18 एप्रिलपासून सुरुवात झाली होती.

त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं की पर्सनल लॉ कायद्यांमध्ये न शिरता समलिंगी विवाहांना मान्यता देणं अवघड आहे कारण यात वारसाहक्क, पोटगी, दत्तकविधान अशा इतर अनेक कायद्यांचा प्रश्न येतो.

2. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला महिना पूर्ण; आजपर्यंत काय काय घडलं?

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई अजिंक्यपद यांच्यासह देशविदेशातील असंख्य स्पर्धांमध्ये पदक पटकावणारे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे.

या कुस्तीपटूंनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातही आंदोलन केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणासारखे आरोप केले होते.

3. शर्मिला टागोर म्हणतात, ‘बॉलिवूडमध्ये संवाद उरलेला नाही, पुरस्कार सोहळे निव्वळ हास्यास्पद’

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत अभिनयाच्या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या शर्मिला टागोर अल्पावधीतच सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.

अनेक हिट चित्रपट देण्याबरोबरच भारतीय क्रिकेटमधील सर्वांत हुशार कर्णधारांपैकी एक असलेल्या टायगर पतौडी यांच्यासोबतचं त्यांचं प्रेम प्रकरणही चांगलंच गाजलं होतं.

शर्मिला टागोर आजकाल पडद्यावर फार काही दिसत नाहीत. मात्र सैफ अली खानची आई आणि करीना कपूर खानची सासू म्हणून त्या प्रसिद्धीच्या झोतात कायम असतात.

4. बाळ होण्यासाठी 7 वर्षे प्रयत्न, आयव्हीएफद्वारे दिला एकाचवेळी 5 बाळांना जन्म

झारखंडच्या सर्वात मोठ्या सरकारी दवाखान्यात 22 मेला दुपारी एका महिलेने पाच बाळांना जन्म दिला.

रांचीतल्या राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये अंकिता कुमारी आणि प्रकाश कुमार साव सध्या आनंदात आहेत कारण लग्नानंतर जवळपास सात वर्षांनी त्यांना बाळं झालीयेत. पण या आनंदात काही चिंताही डोकावताहेत.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की या चिमुकल्या आणि त्यांच्या आईची तब्येत सध्या ठीक आहे, पण तरी त्यांना पुढचे काही आठवडे दवाखान्यात घालवावे लागतील.

त्यांच्या मुलींना दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या निओनेटल आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.

5. थायरॉइड म्हणजे काय? त्यामुळे मृत्यू होऊ शकतो का?

थायरॉइड... भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत.

थायरॉइडची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या 1/3 व्यक्तींना, त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाच नाही. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)