विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं जंतरमंतरवरील आंदोलन पोलिसांनी हटवलं, आंदोलक ताब्यात

Published

विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तिगिरांचं जंतरमंतवर सुरू असलेला आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हाटवलं आहे. बीबीसीच्या वरील फोटोत रिकाम्या जागेत आधी हे आंदोलन आणि कुस्तिगिरांचे तंबू होते. गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं.

आंदोलक कुस्तिगिरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जाण्यासाठी जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली.

नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता.

“सर्व कुस्तीपटू तसंच ज्येष्ठ वयाच्या महिलांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी जंतरमंतर इथले आमचे तंबू काढून टाकायला सुरुवात केली आहे. तंबूमध्ये असलेल्या आमच्या वस्तूही घेतल्या जात आहेत. ही काय गुंडशाही आहे”? असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे.

“खेळाडूंचा आदर करतो पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात आम्ही कोणत्याही स्वरुपाचा अडथळा येऊ देणार नाही”, असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं.

राजधानी दिल्लीत एकीकडे नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यात धक्काबुक्की झाली. कुस्तीपटूंना अटक झाल्याचं साक्षी मलिकने म्हटलं आहे.

नव्या संसदेबाहेर आंदोलक कुस्तीपटूंनी महिला सन्मान महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासाठी हरियाणा इथून मोठ्या प्रमाणावर समर्थक येण्याची शक्यता होती. मात्र नव्या संसदेच्या उद्घाटनच्या सुरक्षिततेचं कारण देत या सगळ्यांना सीमेवरच रोखण्यात आलं.

बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करुन म्हटलं आहे की, “एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे”? असा सवाल बजरंगने केला आहे.

आंदोलक कुस्तीपटू काही दिवसांपूर्वीच जंतरमंतरहून इंडिया गेट इथे गेले होते. इंडिया गेट इथे त्यांनी कँडल मार्च आयोजित केला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ब्रृजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती.

रविवारी नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी नव्या संसदेबाहेर महिला सन्मान महापंचायत आयोजित केली होती. यासाठी ते जात असताना पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ तसंच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना ढकलत, खेचत बसमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महिला पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई अजिंक्यपद यांच्यासह देशविदेशातील असंख्य स्पर्धांमध्ये पदक पटकावणारे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे.

या कुस्तीपटूंनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातही आंदोलन केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणासारखे आरोप केले होते.

ब्रृजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन थांबवणार नाही असं कुस्तीपटूंनी म्हटलं आहे. दुसरीकडे ब्रृजभूषण यांनी कुस्तीपटूंचे आरोप फेटाळले आहेत.

मी कोणाबरोबरही गैरवर्तन केलेलं नाही. मी कुस्तीपटूंना मुलासारखं वागवलं आहे. मी त्यांना आदरसन्मान आणि प्रेमच दिलं असं ब्रृजभूषण यांनी म्हटलं आहे.

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अनेक शेतकरी संघटना आणि खाप पंचायती उभ्या राहिल्या.

रविवारी हरियाणातल्या रोहतक इथे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं की हे आंदोलनही प्रदीर्घ काळ चालेल.

28 मे रोजी दिल्लीत महिलांची महापंचायत होईल. यामध्ये महिला कुस्तीपटू जो निर्णय घेतील त्यावर अंमल केला जाईल.

प्रकरण काय आहे?

18 जानेवारी 2023 रोजी विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलन सुरू केलं. तिघांनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. पायाभूत सुविधांची कमतरता, आर्थिक गफलती, खेळाडूंशी गैरवर्तन हे आरोप होते. मात्र सगळ्यात गंभीर आरोप होता तो म्हणजे लैंगिक शोषणाचा.

विनेश फोगाटने रडत रडत सांगितलं होतं, "राष्ट्रीय शिबिरात ब्रजभूषण आणि कोच महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात. आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. आम्हाला त्रास देतात".

हे आरोप फेटाळताना ब्रृजभूषण यांनी म्हटलं की, "कोणत्याही खेळाडूचं लैंगिक शोषण झालेलं नाही. हे आरोप खरे ठरले तर मी फाशीवर लटकेन".

खेळाडूंच्या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावेळी कुस्तीपटूंशी भेट घेतली. आरोपांसंदर्भात तपास करण्यासाठी 23 जानेवारीला त्यांनी 5 सदस्यीय समितीची स्थापना केली.

'ओव्हरसाईट कमिटी' असं या समितीचं नाव होतं. यामध्ये महान बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्यासह ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटन खेळाडू तृप्ती मुरगुंडे, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईचे माजी कार्यकारी संचालक राधिका श्रीमन यांचा समावेश होता.

नंतर या समितीत भाजप नेता बबिता फोगाट यांचाही समावेश करण्यात आला.

ब्रृजभूषण यांच्यासह कोचवर झालेल्या लैंगिक छळाचे आरोप, आर्थिक गफलती आणि प्रशासकीय त्रुटी या आरोपांची छाननी करणं हे समितीचं काम होतं.

समितीने एक महिना भारतीय कुस्ती महासंघाचं काम पाहणंही अपेक्षित होतं.

चार आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला. नंतर आणखी दोन आठवड्यांसाठी कालावधी वाढवण्यात आला.

खेळाडूंनी सांगितलं की, समितीची स्थापना होऊन तीन महिने झाले पण समितीने आरोपांची काय शहानिशा केली, तपासाचा काय निष्कर्ष निघाला, हे अद्यापही समोर आलेलं नाही.

चौकशीच्या अहवालातील काही गोष्टी मीडियात लीक होत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला. दरम्यान या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

समितीच्या अहवालावर असंतुष्ट कुस्तीपटूंनी 23 एप्रिल रोज आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीचं जंतरमंतर गाठलं आणि आंदोलनाला बसले.

21 एप्रिल- महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या कनॉट प्लेस पोलीस स्थानकात ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार केली पण पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही.

23 एप्रिल- जंतरमंतर इथे आंदोलनाला सुरुवात

24 एप्रिल- पालम 360 खापचे प्रधान चौधरी सुरेंद्र सोलंकी यांनी जंतरमंतर इथे कुस्तीपटूंची भेट घेतली.

25 एप्रिल- विनेश फोगाटसह सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली. कोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत उत्तर मागितलं.

26 एप्रिल- जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जंतरमंतर इथे कुस्तीपटूंची भेट घेतली. ही देशातल्या मुलींसाठीची लढाई आहे. दिल्लीत जी बेशरम माणसं बसली आहेत त्यांना ब्रृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करायला एक मिनिटंही लागायला नको होतं असं त्यांनी सांगितलं.

27 एप्रिल- लैंगिक शोषणाच्या आरोपांसंदर्भात ब्रृजभूषण सिंह यांनी कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलं.

28 एप्रिल- इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या विनेश फोगाटच्या बातमीनंतर ऑलिम्पिक पदकिवेजेते नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा, टेनिसपटू सानिया मिर्झा, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, कपिल देव यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला.

विनेशने सांगितलं की देशातले सगळे प्रमुख खेळाडू आमच्या आंदोलनासंदर्भात मौन बाळगून आहेत.

दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयर दाखल केल्या. एक पॉक्सो अक्टअंतर्गत लागू करण्यात आली.

कुस्तीपटूंनी आरोप केला की जंतरमंतर इथे रात्रीच्या वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आंदोलनस्थळी पाणी पोहोचू नये यासाठी कारवाई करण्यात आली.

29 एप्रिल- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी घटनास्थळी पोहोचल्या. महिलांचं शोषण होतं तेव्हा हे सरकार गप्प बसतं असा आरोप त्यांनी केला.

3 मे- जंतरमंतर इथे रात्रीच्या वेळी कुस्तीपटूंचा हल्ला झाल्याचा आरोप. पोलिसांशी धक्काबुक्की. पोलिसांच्या कारवाईत दोन कुस्तीपटू जखमी झाल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला. पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले नेते आणि लोकांना पोलिसांनी अटक केली. रात्रभर गोंधळ सुरूच राहिला.

7 मे- कुस्तीपटूंनी कँडल मार्च काढला.

8 मे- अनेक भागातले शेतकरी जंतरमंतर इथे पोहोचले आणि त्यांनी कुस्तीपटूंना समर्थन दिलं.

11 मे- कुस्तीपटूंना दंडाला काळी फीत लावून ब्लॅक डे साजरा केला. अल्पवयीन मुलींनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर जवाब नोंदवला.

20 मे- कुस्तीपटू दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इथे सामना पाहण्यासाठी पोहोचले. कुस्तीपटूंनी आरोप केला की त्यांना मैदानात प्रवेश नाकारण्यात आला.

21 मे- हरियाणातल्या रोहतक इथे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायत झाली. पंचायतीमध्ये ब्रृजभूषण यांना अटक करण्याची तसंच नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली.

22 मे- ब्रृजभूषण यांनी म्हटलं की नार्को, पॉलिग्राफ आणि लाय डिटेक्टर चाचणीसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण अट अशी ठेवली की त्यांच्यासह विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचीही अशीच चाचणी व्हावी.

बृजभूषण सिंह कोण आहेत?

बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.

1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.

एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.

बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.

राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दोऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.

राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.

अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.

"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.

मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.

भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)