उर्फी जावेदवरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकरांमध्ये जुंपली...

Published

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) उर्फी जावेदवरून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकरांमध्ये जुंपली...

मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून सुरू झालेला वाद आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचलाय. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आलीय. यावर चित्रा वाघ यांनी ट्वीट करून या नोटीशीवर प्रतिक्रिया देत चाकणकरांवर निशाणा साधलाय. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीय.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटलंय की, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटिशीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी एकाची भर.

“जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला पाठवली आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार आहे,” असंही चित्रा वाघांनी म्हटलंय.

यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या की, “

आज पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, “कोणत्याही प्रकरणावर कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे.

“गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली, महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती.

“चित्रा वाघ आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.”

2) पक्षात आवश्यक असल्यास काही बदल झाले पाहिजेत – नीलम गोऱ्हे

नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “शिंदे गटात प्रवेश केलेल्यांची नावेही नाशिककरांना माहिती नाहीत. कुणीतरी येडेगबाळे पकडायचे आणि प्रवेश करून घ्यायचा अशा शब्दात संजय राऊतांनी या पक्षप्रवेशाची खिल्ली उडवली.”

मात्र, त्याचवेळी या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, “काही बदल आवश्यक असतील तर ते झाले पाहिजेत.”

“कमीत कमी लोक पक्ष सोडून जातील यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरीही आम्ही कुठे कमी पडत असू तर याबाबत जरूर काही बदल झाले पाहिजेत, असं मला वाटतं,” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

लोकमत वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

3) आमची निवृत्तीची वेळ, आता शिवसेनेची सूत्रं आदित्य ठाकरेंकडे – राऊत

“शिवसेनेतल्या आमच्या सारख्या लोकांनी आता पुढच्या सीटवरुन मागच्या सीटवर जायला हवं आणि शिवसेना नेतृत्वाची कमान पुढच्या पिढीकडे सोपवायला हवी. त्याच दृष्टीने मी आदित्य ठाकरेंकडे पाहतो. आदित्यचं नेतृत्व दिवसेंदिवस प्रगल्भ होतंय,” असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आदित्यला युवासेना सांभाळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून खूप उत्तम काम केलंय. तरुण नेतृत्वाकडे शिवसेना पक्षाची कमान जाताना मला आदित्य ठाकरेंमध्ये ते सर्व गुण दिसतात.”

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचे संकेतही यावेळी संजय राऊतांनी दिले.

“आता कुठेतरी आमच्या सारख्या लोकांनी मागे जायला हवं आणि पुढच्या पिढीकडे ही कमान सोपवायला पाहिजे. त्याच दृष्टीने मी आदित्यकडे पाहतो. आम्ही आणखी किती वर्ष काम करणार? कधीतरी आम्हाला निवृत्त व्हावे लागेल. योग्य वेळी निवृत्त व्हायला हवं. आम्ही निवृत्त होताना तरुण नेतृत्वाच्या हाती शिवसेना पक्षाची धुरा जायला हवी आणि आदित्य ठाकरेंमध्ये मला सगळे नेतृत्वगुण दिसतात,” असं म्हणत संजय राऊतांनी निवृत्तीचेही संकेत दिले.

महाराष्ट्र टाइम्सनं घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

4) जम्मू-काश्मीरमध्ये गुलाम नबी आझादांच्या समर्थकांची ‘घरवापसी’

काँग्रेसला राम राम करून नवा पक्ष (डेमोक्रॅटिक आझाद पार्टी) स्थापन करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीरमध्ये धक्का बसलाय. आझाद यांच्यासोबत पक्ष सोडून गेलेले अनेक मोठे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, बलवान सिंग यांसारखे दिग्गज नेते काँग्रेस सोडून आझाद यांच्या सोबत नव्या पक्षात गेले होते. मात्र, ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेत.

काहीच दिवसात राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. त्यापूर्वीच जम्मू-काश्मीर काँग्रेसला पुन्हा बळकटी मिळालीय.

5) गुजरातमधील बंधाऱ्यास पंतप्रधान मोदींच्या आईचं नाव

गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला (बंधारा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. हा बंधारा ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’च्या उभारण्यात येत आहे.

राजकोट-कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून यासाठी 15 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

बुधवारी स्थानिक आमदार आमदार दर्शिता शाह आणि राजकोटचे महापौर प्रदीप देव यांच्या उपस्थितीत या बंधाऱ्याचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला आदरांजली म्हणून या बंधाऱ्याचं नामकरण ‘हिराबा स्मृती सरोवर’ असं करण्यात आलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

यामुळे इतरही लोकांनाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दान करण्याठी प्रेरणा मिळेल, हा यामगचा हेतू होता, अशी माहिती ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’चे अध्यक्ष दिलीप सखिया यांनी दिली.