'मला वाटलं शरीर आतून कोसळतंय', अनेक गर्भवतींना होणारा 'प्रोलॅप्स' आजार काय आहे? पुरुषांना होऊ शकतो का?

फोटो स्रोत, Helen Ledwick
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आई झाल्यानंतर शरीरात बदल होणं स्वाभाविक मानलं जातं, पण काही बदल आयुष्यच बदलवून टाकतात.
हेलन लेडविक यांनाही असाच अनुभव आला, त्यांना त्यांचं शरीर आतून कोसळतंय असं वाटलं.
नंतर त्यांना समजलं की, हा 'पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स' नावाचा आजार आहे. दर 12 महिलांपैकी एकीला हा आजार होतो. पण याबद्दल बोलायलाच कोणी तयार नसतं.
हेलन लेडविक यांनी दहा वर्षांपूर्वी गुगलवर, "माझं शरीर आतून कोसळतंय असं मला का वाटतंय?" असं टाइप केलं. पण त्यामुळं लागणाऱ्या शोधानं त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे, याची त्यांना कल्पनाच नव्हती.
बीबीसी 5 लाइव्हच्या माजी पत्रकार आणि पॉडकास्टर असलेल्या हेलन यांना पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स नावाचा त्रास झाला होता.
प्रसूतीनंतर प्रत्येक 12 पैकी सुमारे एका महिलेला होणारा असा हा आजार आहे. पण तरीही अनेकांना त्याचं नावही माहिती नसतं.
जीवघेणा नव्हे पण मनावर परिणाम करणारा आजार
पोटाच्या किंवा ओटीपोटातील (पेल्विक) खालच्या भागातील अवयव जसं मूत्राशय, आतडी किंवा गर्भाशय त्यांच्या जागेवरून सरकून योनीमार्गाकडे झुकतात किंवा फुगतात, त्याला प्रोलॅप्स म्हणतात.
हा आजार जीवघेणा नसला तरी, तो दैनंदिन जीवन, नातेसंबंध आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करू शकतो.
हेलन यांना हा धक्का दुसऱ्या बाळाच्या कठीण प्रसूतीनंतर अवघ्या दोन आठवड्यांत बसला.
त्या आठवत म्हणाल्या, "मी सोफ्यावरून उठले आणि अचानक काहीतरी हलल्यासारखं वाटलं. टॅम्पॉन नीट बसलेला नसतो, तेव्हा होतं तसं काहीतरी चुकतंय असं जाणवलं."
घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या हेलन यांनी काय होतंय हे पाहण्यासाठी लगेच आरसा आणि फोन घेतला.
महिला यावर बोलायलाच तयार नाही
त्या म्हणाल्या की, "प्रोलॅप्स हा शब्द मी आधी कधी ऐकलेलाच नव्हता."
पण जेव्हापासून त्या याबद्दल उघडपणाने बोलू लागल्या, तेव्हापासून त्यांना जाणवलं की, हा आजार सामान्य असला तरी लोक त्याबद्दल बोलायलाच टाळतात.
हेलन यांच्या मते, या आजाराबद्दल असलेली लाज आणि संकोच यामुळेच अनेक महिला आणि आरोग्यतज्ज्ञ याबाबत जागरूक नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता त्याही प्रयत्न करत आहेत.

फोटो स्रोत, Helen Ledwick
डॉक्टरांनी प्रोलॅप्सचं निदान केल्यानंतर हेलन गोंधळल्या आणि घाबरल्या.
त्या म्हणतात, "मला वाटलं होतं, डॉक्टर काही उपाय सांगतील किंवा गांभीर्याने घेतील. पण त्यांनी फक्त वरवरचे उपचार करत जणू काही विशेष नाही असंच दाखवलं."
सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांना, उड्या मारणं किंवा जड वस्तू उचलणं, असं काहीही करू नये, असा सल्ला दिला. कारण त्यामुळे त्रास वाढू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं.
"तेव्हा डॉक्टरांनी जणू, 'तुम्ही आयुष्य जगूच नका' असा सल्ला दिल्याची भावना निर्माण झाली."
शारीरिक त्रासापेक्षाही जास्त कठीण एकटेपणा असल्याचं हेलन यांना सतत जाणवत होतं.
महिलांना बोलतं करण्याचा प्रयत्न
हेलन सांगतात की, "या त्रासाबरोबरच आपल्याला लाज, शांतता, अपराधीपणा आणि एकटेपणात जगावं लागतं. कारण आपण याबद्दल बोलत नाही. त्यामुळं जगात हा आजार फक्त आपल्यालाच झाला आहे, असं वाटतं."
हेलन यांनी सुरुवातीला मदतीसाठी इन्स्टाग्रामवर शोध सुरू केला. तिथे त्यांना त्यांच्यासारख्याच घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या, काही तर लाजेमुळे मदतही न मागणाऱ्या महिलाही भेटल्या.
त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी 'व्हाय मम्स डोंट जम्प' नावाचा पॉडकास्ट लाँच केला आणि पुस्तकही लिहिलं.

महिलांना आपले अनुभव मोकळेपणाने सांगता यावेत आणि पेल्विक आरोग्याबद्दल बोलतं करावं, हे त्यांचं उद्दिष्ट होतं.
त्या म्हणतात, "मला सुरुवातीला राग आला, कारण कुणीच याबद्दल बोलत नव्हतं. मग मीच बोलायचं ठरवलं."
त्या म्हणाल्या की, "मला महिलांना अशी माहिती द्यायची होती, जी शोधायला मला खूप त्रास झाला होता. या संघर्षात त्या एकट्या नाहीत, हे त्यांना जाणवावं असं मला वाटत होतं."
प्रोलॅप्स होण्याची कारणं वेगवेगळी
महिला आरोग्यतज्ज्ञ डॉ. निघत आरिफ सांगतात की, हेलन यांचा अनुभव फारसा वेगळा नाही. अशा समस्या अनेकांना जाणवतात, कारण त्याची लक्षणं नेहमी स्पष्ट दिसत नाहीत.
"कधी शरीरावर गाठीसारखं काही दिसत नाही, फक्त दबाव जाणवतो. तो कमरेखाली, पुढच्या बाजूला किंवा पोटाजवळ असू शकतो. हा त्रास लैंगिक संबंधांच्या वेळी जास्त जाणवतो, पण त्याबद्दल बोलणं अजूनही टॅबू (निषिद्ध) मानलं जातं," असं त्या म्हणाल्या.
प्रोलॅप्स होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं बाळंतपणानंतर, जड वस्तू उचलल्याने, जास्त वजनामुळे किंवा गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतरही हा त्रास होऊ शकतो. क्वचित प्रसंगी पुरुषांनाही हा त्रास जाणवू शकतो.
पेल्विक फ्लोअर व्यायाम आणि जीवनशैलीत बदल केल्याने प्रोलॅप्सची लक्षणं कमी होऊ शकतात.
पण काही वेळा उपचारासाठी योनीमध्ये बसवले जाणारे पेसरी उपकरण किंवा शस्त्रक्रियाही करावी लागते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ख्रिस्तीन एकेची सांगतात की, प्रोलॅप्स झालेल्या महिलांना योनीच्या आत सूज किंवा गाठीसारखं काही जाणवू शकतं.
कारण पेल्विक फ्लोअरमधील स्नायू आणि लिगामेंट्स (अस्थिबंधन) कमकुवत होतात, ज्यामुळे मूत्राशयासारखे अवयव खाली सरकू शकतात किंवा हलू शकतात.

फोटो स्रोत, Helen Ledwick
हेलन म्हणतात की, 15 वर्षांपूर्वी मी एकटीने गुगलवर शोधलेली गोष्ट आज अनेक महिलांना मदत करत आहे. त्यांना आपल्याला त्रास आहे हे ओळखायला मदत योग्य ठरते.
त्यांच्या बाबतीत बरे होण्याची प्रक्रिया हळू म्हणजेच मंद होती, पण ती आयुष्य बदलून टाकणारी ठरली.
त्या म्हणतात, "माझ्यासाठी हा हळूहळू बरा होण्याचा प्रवास होता, प्रसूतीनंतरचे सोपे व्यायाम करून आणि थोडी थोडी ताकद वाढवत गेली."
शेवटी त्या एका फिजिओथेरपिस्टकडे गेल्या, ज्यांनी त्यांना पुन्हा धावायला मदत केली. हेलन सांगतात, "तो माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता, कारण मला वाटलं होतं की, मी पुन्हा कधीच धावू शकणार नाही."
आता हेलन स्वतःलाही आश्चर्य वाटेल असं काही करत आहेत. त्यांनी 10 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेसाठी नाव नोंदवलं आहे.
"आता मला बरं वाटतंय आणि माझ्या त्रासाचं व्यवस्थापन कसं करायचं हे मी शिकले आहे. अजूनही मला प्रोलॅप्स आहे, पण आता तो माझं आयुष्य नियंत्रित करत नाही," असं त्या म्हणाल्या.
"मला वाटतंय की, मी आता ही लढाई जिंकत आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























