मध्यप्रदेशातील पन्नाच्या मजुरांना सापडला अंदाजे 50 लाख रुपयांचा हिरा

फोटो स्रोत, Shuraih niazi
- Author, शुरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
मध्य प्रदेशच्या पन्ना परिसरात हिऱ्याच्या खाणी आढळून येतात. इथला हिरा जगभरात प्रसिद्ध मानला जातो.
इथं हिरे सापडल्याच्या घटनांच्या पूर्वीपासून घडतात. सध्या इथली एक बातमी चर्चेत आहे.
या परिसरातील लहान-मोठ्या मजुरीचं काम करणाऱ्या नऊ मजुरांना तब्बल 10.69 कॅरेटचा हिरा सापडला आणि आता त्यांचं नशीबच पालटलं आहे.
या हिऱ्याच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पण हिरेतज्ज्ञांच्या मते, हिऱ्याची किंमत प्रति कॅरेट पाच लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे या हिऱ्याची किंमत 50 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे.
हा हिरा पन्ना शहर हिरा विभागात जमा करण्यात आला आहे. याचा लिलाव होऊन याला योग्य किंमत मिळण्याची आता प्रतीक्षा आहे.
आनंदीलाल कुशवाहा, राजेश यादव आणि त्यांच्या इतर सात सहकाऱ्यांना हा हिरा सापडला आहे.
सदर हिऱ्याचा दर्जा अतिशय उत्तम असल्याची माहिती हिरा अधिकारी आर. के. पांडेय यांनी दिली. पण त्याची किंमत किती आहे, याबाबत पांडेय यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही.
याची किंमत लिलावादरम्यान ठरते, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, लॉकडाऊननंतरच्या काळात सापडलेला हा सर्वांत मोठा हिरा आहे.
पन्ना जिल्ह्यातील राणीपूर गावात राजेश यादव यांच्या खासगी जमिनीवर आनंदीलाल कुशवाहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरे विभागाची परवानगी घेऊन खोदकाम सुरू केलं होतं.
वीज बिल मीटर रिडिंग मोजण्याचं काम करणारे आनंदीलाल
आनंदीलाल हे मध्य प्रदेश वीज विभागात वीज बिलाकरिता लागणारं मीटर रिडिंग मोजण्याचं काम करतात.
त्याशिवाय इतर लहान-मोठी मजुरीही ते करतात. कधी शेतात गरज पडली तर शेतमजुरी, भाजी विक्री यांसारखी कामं करत असतात.

फोटो स्रोत, Shuraih niazi/bbc
42 वर्षीय आनंदीलाल दिवसातून 2-3 तास मीटर रिडिंगचं काम करतात. यातून त्यांना 2500 रुपये इतका पगार मिळतो. त्यांच्या घरात दोन मुलांसह आई-वडील आणि सासू असे आणखी पाचजण राहतात.
राजेश यादव यांच्या जमिनीवर खोदकाम करण्याबाबत त्यांनी जून महिन्यात अर्ज केला होता. त्यांना जुलै महिन्यात याबाबत परवानगी मिळाली.
वेळ मिळेल तसा हे सगळेजण त्या 25 चौरस फूट जमिनीवर जाऊन खोदकाम करायचे.
आनंदीलाल यांनी यापूर्वीही अनेकवेळा सरकारी विभागात हिऱ्याची शोध करण्याचं काम केलं होतं. पण त्यांना कधीच यश मिळालं नाही. पण यावेळी त्यांच्या नशिबाने साथ दिली.
खासगी जमिनीत हिऱ्याचा शोध
पन्ना हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथं खासगी जमिनीवर हिऱ्यांचा शोध घेण्याची परवानगी मिळवता येते, असं आनंदीलाल सांगतात.
त्यांच्या मते, वनक्षेत्र किंवा इतर कारणांमुळे सरकारी जमीन पट्टे स्वरूपात खोदकामासाठी मिळणं आता बंद झालं. त्यामुळे आता खासगी जमिनीवरच यासाठीची परवानगी मिळवावी लागते.

फोटो स्रोत, Shuraih Niazi/BBC
दुसऱ्यांकडून हे खोदकाम करून घेतल्यास जवळपास 2 लाख रुपये खर्च येतो. जमिनीची मालकी असणाऱ्या व्यक्तीची हिऱ्यामध्ये 25 टक्के भागिदारी आहे.
या घटनेतही राजेश यादव यांच्या जमिनीवर इतर आठ जण खोदकाम करत होते. त्यामुळे आनंदीलाल यांना राजेश यांना 25 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
आता लिलावात याची योग्य किंमत सर्वांना कळेल. हा लिलाव दर तीन ते सहा महिन्यांनी होतो. पण यंदा लॉकडाऊनमुळे यात विलंब होत आहे.
यापूर्वी 2018 मध्ये पन्ना परिसरातच मोतीलाल प्रजापती यांचं नशीब पालटलं होतं. त्यावेळी मोतीलाल चार सहकाऱ्यांसोबत खोदकाम करत होते. त्यामध्ये त्यांना सुमारे दीड कोटी रुपयांचा हिरा सापडला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























