प्रदूषणामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कॅथरीन लॅथम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
जगभरात सध्या शुक्राणूंचा दर्जा घसरत असल्याची समस्या पाहायला मिळतेय. असं असलं तरी वंध्यत्वाच्या या कारणावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र, आता अभ्यासक या समस्येचं मूळ नेमकं काय असू शकतं? याचा शोध घेत आहेत.
"आपण यावर उपचार करू शकतो. काहीच अडचण नाही, तुम्ही काळजी करू नका," असं डॉक्टर जेनिफर हॅनिंग्टन यांना सांगत होते. त्यांनंतर डॉक्टर त्यांच्या पतीच्या म्हणजे कियरनच्या दिशेनं वळत म्हणाले, "तुमच्या बाबतीत मात्र आम्ही फार काही मदत करू शकणार नाही."
हे दाम्पत्य इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहत होतं. जवळपास दोन वर्षांपासून ते बाळ व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. जेनिफर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम या व्याधीनं ग्रस्त होत्या. त्याचा परिणाम थेट प्रजननक्षमतेवर होतो. त्यामुळं त्यांना गर्भधारणा होणं कठिण असल्याची जाणीव त्या दोघांनाही होती.
पण कियरनमध्येही काही समस्या असतील असं त्यांना वाटलं नव्हतं. चाचण्या केल्यानंतर त्यांच्या शुक्राणुंच्या संख्येतील घट आणि शुक्राणुंच्या हालचालीच्या वेगाबाबतही समस्या असल्याचं स्पष्ट झालं.
त्यातही आणखी वाईट गोष्ट म्हणजे, वैद्यकीय दृष्ट्या विचार करायचा झाल्यास जेनिफर यांच्या तुलनेत यावर उपचार करणं हे अधिक कठिण होतं. किंबहुना हे उपचार अशक्यच होते, असं म्हणता येईल.
हॅनिंग्टन यांना अजूनही त्यांची तेव्हाची प्रतिक्रिया स्पष्टपणे आठवते. "धक्का.. दुःख.. मी ते मान्य करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. मला वाटत होतं, डॉक्टरांचंच काहीतरी चुकलं असेल." त्यांना वडील बनण्याची अत्यंत मनापासून इच्छा होती.
"मला असं वाटलं की, मी पत्नीच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही."
जसजशी वर्षे सरकत गेली, तसा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत गेला. ते अधिक काळ एकटे राहू लागले. बेडवर लोळत राहणं आणि बरं वाटण्यासाठी दारु पिणं सुरू झालं. नंतर त्यांना पॅनिक अटॅक येऊ लागले.
"मी संकटाच्या सीमेपर्यंत पोहोचलो होतो," असं ते म्हणाले. "ती अंधकारात अधिक खोलवर रुतला गेलो होतो."
वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांचा विचार केला असता, त्यात पुरुषांच्या वंध्यत्वाचा वाटा हा जवळपास अर्धा आहे. एकूण पुरुषांचा विचार करता सात टक्के पुरुषांमध्ये ही समस्या जाणवत असते. पण तसं असलं तरी, महिलांच्या वंध्यत्वाच्या तुलनेत या विषयावर अत्यंत तोकडी अशी चर्चा होते. कदाचित या विषयाबाबतचा सामाजिक आणि सांस्कृतिक दबाव किंवा याबाबतची चर्चा निषिद्ध समजली जाणं, हेही त्यामागचं कारण असू शकतं.
पुरुषांच्या बहुतांश वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये नेमकं कारण काय हे समोरच येत नाही. अनेकजण याला कलंक समजून शांतपणे सर्वकाही सहन करत असतात.
संशोधनावरून असं समोर येत आहे की, कदाचित ही समस्या आणखी वाढत चालली आहे. प्रदूषणासह अनेक गोष्टींचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
विशेषतः शुक्राणुंच्या दर्जावर त्याचा परिणाम होतोय. वैयक्तिकरित्या काही व्यक्तींबरोबरच संपूर्ण समाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
वंध्यत्वाबाबतचे छुपे संकट?
गेल्या शतकामध्ये जागतिक लोकसंख्येमध्ये नाट्यमय पद्धतीनं वाढ झालेली पाहायला मिळाली. अवघ्या 70 वर्षांपूर्वी पृथ्वीवर केवळ 2.5 अब्ज लोक होते. 2022 मध्ये जगातील लोकसंख्येनं 8 अब्ज आकडा गाठलाय. मात्र, आता प्रामुख्यानं सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळं लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे.
जगभरात जन्मदर नीचांकाचे नवनवीन विक्रम करत आहेत. जगातील 50% लोकसंख्या ही अशा देशांमध्ये राहते, ज्याठिकाणी प्रजनन दर प्रति महिला दोन मुलांपेक्षाही कमी आहे. त्याचा परिणाम म्हणजे, स्थलांतर झालं नाही, तर लोकसंख्या ही हळू हळू कमीच होत जाणार आहे.
जन्म दरामध्ये घट होण्यास काही सकारात्मक विकासाचे मुद्देही कारणीभूत आहेत. त्यात महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या प्रजनन आरोग्यावर असलेलं नियंत्रण यांचा समावेश आहे. दुसरीकडं, प्रजनन दर कमी असलेल्या देशांमध्ये, अनेक दाम्पत्यांना अधिक मुलं जन्माला घालायची असतात, हे संशोधनावरून स्पष्ट झालंय.
पण कदाचित कुटुंबाला हवा तसा आधार नसणे अशा सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळं ते तसं करत नाहीत.
त्याचवेळी जन्मदरामध्ये आणखी एका कारणामुळं घट झालेली असू शकते. त्याला प्रजननक्षमता म्हणजे व्यक्तिची पुनरुत्पादनाची शारीरिक क्षमता असंही म्हणतात. अधिक स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, संशोधनावरून हे समोर आलंय की, वंध्यत्वाच्या एकूण समस्यांमध्ये पुरुषांशी संबंधित समस्यांमध्ये अधिक वाढ होत आहे.
त्यात शुक्राणुंची संख्या कमी होणं, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणं आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन (ताठरतेच्या समस्या)चे वाढते प्रमाण तसंच, टेस्टिक्युलर कॅन्सर या समस्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
तरंगणाऱ्या पेशी
"शुक्राणू या उत्कृष्ट पेशी असतात," असं मत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि युनिव्हर्सिटी ऑफ डंडीमधील रिप्रोडक्टिव्ह मेडिसीन विषयातील प्रपाठक सारा मार्टिन्स यांनी व्यक्त केलं.
"ते अत्यंत सूक्ष्म असतात, ते पोहू शकतात आणि ते शरीराबाहेरही जिवंत राहू शकतात. इतर कोणत्याही पेशींना ते शक्य नसतं. हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य आहे," असं त्या सांगतात.
पण अभ्यासावरून असं समोर आलंय की, अगदी किरकोळ बदलांमुळंदेखील या वैशिष्ट्यपूर्ण पेशींवर अत्यंत शक्तीशाली परिणाम होऊ शकतात. विशेषतः त्यांच्या प्रजनन क्षमतेवर. प्रजननक्षमतेसाठीचे काही अत्यंत महत्त्वाचे पैलू असतात.
त्यात शुक्राणुंची सहजपणे हालचाल करण्याची क्षमता, त्यांचा आकार (शेप-साईझ दोन्ही) आणि ठराविक प्रमाणातील वीर्यामध्ये त्यांचे असलेले प्रमाण (त्यालाच स्पर्म काऊंट म्हणतात) यांचा समावेश असतो. पुरुष जेव्हा प्रजनन क्षमतेसंदर्भातील तपासणी करण्यासाठी जातात, तेव्हा याच सर्वाच्या आधारे त्यांची चाचणी होत असते.
"साधारणपणे एका मिलीलीटर वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणुंचा आकडा हा 4 कोटींच्या खाली जातो तेव्हा, त्या व्यक्तीमध्ये प्रजनन क्षमतेसंबंधीच्या समस्या सुरू होत असतात," असं जेरूसलेममधील हिब्रू युनिव्हर्सिटीतील साथरोग विषयाचे प्राध्यापक हगाई लिवीन यांनी सांगितलं.
स्पर्म काऊंटचा प्रजननक्षमतेशी जवळचा संबंध असतो, असं लिवीन म्हणाले. तसं असलं तरी, जास्त स्पर्म काऊंट म्हणजे, गर्भधारणेची अधिक शक्यता असा त्याचा अर्थ नाही, असंही ते म्हणाले. पण प्रती मिलीलीटर वीर्यात 4 कोटी पेक्षा कमी स्पर्म काऊंट असल्यास, गर्भधारणेची शक्यता ही अत्यंत कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
लिवीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्राणुंच्या प्रमाणाबाबतच्या जागतिक ट्रेंडसंदर्भातला एक अहवाल 2022 मध्ये प्रकाशित केला होता. त्यानुसार 1973 ते 2018 दरम्यान दरवर्षी स्पर्म काऊंट साधारणपणे सरासरी 1.2 टक्के एवढा घसरत गेला. म्हणजे स्पर्म काऊंट हा 10 कोटी 40 लाख प्रति मिलीलीटरवरून 4 कोटी 90 लाखावर आला. 2000 पासून तर यात दरवर्षी सुमारे 2.6 टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
लिवीन यांच्या मते, या वाढलेल्या टक्केवारीमुळं एपिजेनेटिक बदलांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे, पर्यावरण किंवा जीवनशैलीतील बदलामुळं याचा परिणाम जनुकांच्या (जीन्स) कार्यप्रणालीवर होऊ शकतो. दुसऱ्या एका अभ्यासानुसार, वीर्य आणि पुरुषांच्या वंध्यत्वामधील बदलातही एपिजेनेटिकची भूमिका असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
"अनेक पिढ्यांमध्ये ते पाहायलाही मिळू शकतं, असेही संकेत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
एपिजेनेटिक बदल हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होऊ शकतात हा मुद्दा नक्कीच वादग्रस्त आहे. पण हे शक्य असू शकतं, हे दर्शवणारे काही पुरावेही आहेत.
"शुक्राणुंचे घटणारे प्रमाण हे पुरुषांच्या बिघडत असलेल्या आरोग्याचं लक्षण आहे. कदाचित संपूर्ण मानवजातीचंही ते असू शकतं," असं लिवीन म्हणतात.
"आपण एका सार्वजनिक आरोग्य संकटाचा सामना करत आहोत, आणि ते संकट परत जाईल की नाही, हेही आपल्याला माहिती नाही."
संशोधनावरून असं लक्षात येतं की, पुरुषांमधील वंध्यत्व हे भविष्यातील आरोग्याच्या समस्येबाबत संकेत देऊ शकतं. पण त्याची सटिक माहिती किंवा संबंध अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसंच, जीवनशैलीतील ठरावीक गोष्टी या वंध्यत्व आणि इतर आरोग्याच्या समस्या दोन्हीसाठी कारणीभूत असू शकतात, अशीही एक शक्यता आहे.
"मुलं हवी असणं आणि तरीही गर्भवती राहू न शकणं हा अत्यंत भयावह अनुभव असून, ती खूप मोठी समस्या आहे," असं डा सिल्व्हा सांगतात.
शुक्राणुंचा दर्जा कमी होणं, थांबवण्यासाठी वैयक्तिक जीवनशैलीत बदल हे कदाचित पुरेसं ठरणार नाही. कारण पुराव्यांवरून असं समोर आलंय की, याबाबतचा एक व्यापक आणि पर्यावरणाशी संबंध असलेला धोका आहे, तो म्हणजे विषारी प्रदूषकं.
विषारी जग
रेबेका ब्लँचर्ड या युकेच्या नॉटिंघम युनिव्हर्सिटीतील संशोधक आणि पशुचिकित्सा विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या घरामध्ये आढळणाऱ्या पर्यावरणीय रसायनांचा पुरुषांच्या प्रजननासंबंधी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत संशोधन करत आहेत. त्या यासाठी सेंटिनल मॉडेल म्हणून कुत्र्यांचा वापर करत आहेत. मानवी आरोग्याच्या दृष्टीनं ही एक प्रकारे लवकर इशारा देणारी पद्धत आहे.
"श्वान हे आपल्याच पर्यावरणात राहत असतात. ते आपल्याच घरांमध्ये राहतात आणि आपण असतो तशाच रासायनिक प्रदूषकांशी त्यांचा संपर्क येत असतो. आपण श्वानांचं निरीक्षण केलं तर, मानवांमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे आपण पाहू शकतो," असं रेबेका म्हणाल्या.
त्यांचं संशोधन प्रामुख्यानं प्लास्टिक, अग्निरोधक आणि इतर सर्वसामान्य घरगुती वस्तुंवर लक्ष केंद्रीत करणारं होतं. यापैकी काही रसायनांवर बंदी आहे, पण तरीही ते पर्यावरणामध्ये किंवा जुन्या वस्तूंमध्ये उपलब्ध आहेत.
त्यांच्या अभ्यासावरून हे स्पष्ट झालंय की, ही रसायनं आपल्या हार्मोनल सिस्टीममध्ये समस्या निर्माण करू शकतात आणि त्यामुळं पुरुष आणि श्वान दोघांच्याही प्रजनन क्षमतेवरही नकारात्मक परिणाम करू शकतात.
"आम्हाला पुरुष आणि श्वान दोघांच्याही शुक्राणुंमध्ये प्रामुख्यानं हालचालींमध्ये घट होण्याची समस्या आढळली. त्याचबरोबर डीएनए विखंडन (फ्रॅगमेंटेशन) च्या प्रमाणात वाढ झाल्याचंही आढळून आलं," असं ब्लँचर्ड म्हणाल्या.
शुक्राणुंच्या डीएनएतील विखंडन हे शुक्राणुंच्या अनुवांशिक साहित्याचं नुकसान किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा संकेत देतं. याचा परिणाम हा गर्भधारणेच्याही पुढे होऊ शकतो. डीएनएच्या विखंडनाचं प्रमाण वाढल्यामुळं सुरुवातीच्या काळातील गर्भपाताचं प्रमाण वाढतं, असं ब्लँचर्ड म्हणाल्या.
प्लास्टिक, घरगुती औषधी, खाद्य आणि हवा यातील रसायनांचा प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम याबाबतच्या इतर संशोधनांशी या निष्कर्षांचं साधर्म्य आहे. विशेष म्हणजे याचा पुरुषांबरोबरच महिला आणि लहान मुलांवरही परिणाम होतो. कारण, ब्लॅक कार्बन, पर्यावरणातील कायमस्वरुपी रसायनं आणि फालेट्स (प्लास्टीक अधिक टिकाऊ बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायने) ही अगदी गर्भातील बाळापर्यंत पोहोचल्याचंही आढळून आलंय.
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर हवामान बदलाचादेखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण काही प्राण्यांच्या संशोधनावरून असं संकेत मिळाले आहेत की, शुक्राणू हे वाढत्या तापमानाच्या दृष्टीनं अधिक संवेदनशील असतात. उष्णतेच्या लाटेमुळं किटकांमध्ये शुक्राणुंना हानी पोहोचल्याचं पाहायला मिळालं आहे. मानवांमध्येही तसाच परिणाम पाहायला मिळाला आहे. 2022 मधील एका अभ्यासातून असं समोर आलंय की, ग्लोबल वॉर्मिग किंवा उष्ण वातावरणात काम केल्यानं वाढणारं तापमान हे शुक्राणुच्या दर्जावर नकारात्मक परिणाम करतं.

फोटो स्रोत, Getty Images
चुकीचा आहार, तणाव आणि दारू
पर्यावरणाशी संबंधित या गोष्टींबरोबर वैयक्तिक समस्यांमुळंही पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचू शकते. त्यात चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, तणाव आणि दारू तसेच ड्रग्जचा वापर याचा समावेश होतो.
गेल्या काही दशकांमध्ये लोकांच्या उशिरा पालक बनण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. महिलांना वारंवार त्यांच्या जैविक किंवा शारीरिक चक्राबाबत आठवण करून दिली जात असताना, पुरुषांसाठी मात्र, यादृष्टीनं वय हा फार गंभीर मुद्दा नाही असं समजलं जातं. पण आता हा विचार बदलत आहे. आता पालकत्वासाठीच्या वयाचा संबंध शुक्राणुंचा घसरलेला दर्जा आणि कमी झालेली प्रजनन क्षमता याच्याशी जोडला जात आहे.
पुरुषांच्या वंध्यत्वाबाबत अधिक माहिती व्हावी, तसंच त्यापासून संरक्षण, निदान किंवा त्याच्या उपचाराबाबत नवा दृष्टीकोन निर्माण व्हावा, त्याचबरोबर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी जनजागृती याची तातडीनं गरज आहे.
हे सर्व असतानाच, एखादा व्यक्ती त्याच्या शुक्राणुंचा दर्जा कायम राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वैयक्तिकरित्या काही करू शकतो का?
यादिशेनं व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब ही चांगली सुरुवात ठरू शकते. कारण याचा संबंध शुक्राणुच्या दर्जाशी जोडण्यात आला आहे. ब्लँचर्ड यासाठी सेंद्रिय खाद्य पदार्थ आणि बीपीएमुक्त प्लास्टिकची उत्पादने वापरण्याचा सल्ला देतात. कारण बिस्फेनॉल ए या रसायनाचा संबंध पुरुष आणि महिलांच्या प्रजनन विषयक समस्यांशी आहे. त्यामुळं "अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं," असं त्या म्हणतात.
तर हॅनिंग्टन हे मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ नका असं सांगतात.
पाच वर्षांचे उपचार आणि तीन वेळा ICSI (Intracytoplasmic Sperm Injection)हे एक प्रकारचे आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर त्यांना आता दोन मुलं आहेत. वंध्यत्वाच्या उपचारांसाठी ज्यांना स्वतःच खर्च करावा लागतो, त्यांच्यासाठी अशा उपचार पद्धती कधीही परवडणाऱ्या नसतात.
अमेरिकेमध्ये एका वेळच्या IVF साठी 30,000 डॉलरपेक्षा जास्त खर्च लागतो. तसंच यासाठीचा इन्शुरन्सही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात हॅनिंग्टन यांच्या मते, ते अजूनही त्यावेळची मानसिक अग्निपरीक्षा विसरू शकलेले नाहीत.
"मुलं मिळाली म्हणून मी, रोज कृतज्ञता व्यक्त करतो. पण लक्षात असू द्या, ते नेहमीच माझा एक भाग राहतील," असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























