एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला; घेतलं कामाख्या देवीचं दर्शन

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. इच्छुक, मग इच्छुकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानं नाराजी, मग नाराजीतून दुसरे पर्याय शोधणं, ऐनवेळी पक्ष बदलणं अशा नाना घटना दर तासाला घडताना दिसतायेत.

आजपासून, 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली असून, 20 नोव्हेंबरला मतदान आणि दोनच दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

राज्याच्या राजकारणात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यासोबतच परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडीही मैदानात उतरली आहे. याशिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी असे काही पक्षही मैदानात आहेत.

सध्या भाजपने आपली पहिली 90 जणांची यादी जाहीर केली आहे. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 45 जणांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभरात घडणाऱ्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत. तिथे उपस्थित पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "मी देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आमची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे. दुसरी लवकरच जाहीर होईल. या निवडणुकीमध्ये महायुती नक्कीच जिंकेल."

2022 साली शिवसेनेत बंड केल्यानंतर तसेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, असं एकूण दोनवेळा एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा सहकुटुंब कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत.

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे.

नवाब मलिकांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक - शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मात्र सना मलिक यांचा उमेदवारी अर्ज भरायची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती आज 22 ऑक्टोबर रोजी दुपारीच समजली आहे. भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याची चर्चा होत आहे.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे.

मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक - शेख यांच्यासाठी सोडला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :

अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)

अर्ज पडताळणीची तारीख - 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)

अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख - 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)

मतदानाचा दिवस - 20 नोव्हेंबर 2024

मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर 2024

2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. तत्कालीन शिवसेनेचे 56, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची त्या निवडणुकीत बरीच घसरण झाली होती, त्यांचे 44 आमदार निवडून आले होते.

या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर 16 आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रातील 7 लाख 42 हजार 134 मतदारांनी नोटाला मतदान केलं होतं.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्षानं आपली वेगळी रणनिती आखायाला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निकालाचं आपल्या पद्धतीनं आकलन करून विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.