You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळाचं वजन 7.3 किलो, सिझेरियनने झालं बाळंतपण; बाळांचं वजन प्रमाणाबाहेर वाढण्याचं कारण काय?
- Author, अॅडम टायलर
- Role, लँकेस्टर युनिव्हर्सिटी, ब्रिटन
- Published
ब्राझिलच्या अॅमेझोन राज्यातील एका महिलेने तब्बल 7.3 किलो वजन असलेल्या बाळाला जन्म दिलाय. अॅमेझॉनच्या पॅरिन्टिन्स येथील पॅड्रे कोलंबो हॉस्पिटलमध्ये सिझेरियन करून या बाळाचा जन्म झाला. त्याच्या आईने या मुलाचं नाव अँगरसन असं ठेवलं आहे.
जगातील सर्वात वजनदार बाळ 1955 साली इटलीत जन्माला आलं होतं. या बाळाचं वजन 10.2 किलो इतकं होतं.
नवजात मुलाचं सरासरी वजन 3.3 किलो तर मुलीचं 3.2 किलो इतकं असतं. पण यापेक्षा जास्त वजन असेल तर त्याला 'मॅक्रोसोमिया' (शरीराने मोठी) असं म्हणतात.
गर्भधारणेचा कालावधी कोणताही असो, जर नवजात बाळाचं वजन 4 किलोपेक्षा जास्त असेल तर अशा बाळांना मॅक्रोसोमिक बेबी म्हटलं जातं.
नॉर्मल बाळांमध्ये मॅक्रोसोमिक्स 12 टक्क्यांपर्यंत असतो.
गरोदरपणात बाईच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं तर गर्भात असणाऱ्या बाळाचं वजन 15 ते 45 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं.
पण हे असं का घडतं?
मॅक्रोसोमिक बाळांना जन्म देणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणेवेळी काही समस्या आलेल्या असतात. यातली एक म्हणजे आईचं वजन जास्त असणं.
गर्भधारणेवेळी ज्या स्त्रियांचं वजन जास्त असतं त्या मॅक्रोसोमिक बाळांना जन्म देण्याची शक्यता दुप्पट असते.
शिवाय गर्भधारणेदरम्यान ज्या स्त्रियांचं वजन सातत्याने वाढत असतं त्या देखील मॅक्रोसोमिक बाळांना जन्म देण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात डिटेक्ट होणारा मधुमेह याबाबतीत धोकादायक ठरतोय.
अँगरसनचं वजन वाढण्यामागचं कारण सांगताना पाद्रे कोलंबो हॉस्पिटलमधील डॉक्टर सांगतात की, त्याच्या आईला मधुमेह होता.
गरोदर असताना आईच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे मधुमेह नसला तरी नाळेतून गर्भाकडे जाणाऱ्या ग्लुकोजची टक्केवारी वाढते. यामुळे गर्भातील बाळाचं वजन मोठ्या प्रमाणात वाढतं.
उशीरा झालेली गर्भधारणा देखील मॅक्रोसोमिया मुलांच्या जन्मास कारणीभूत ठरते.
जर स्त्री वयाच्या पस्तिशीनंतर गरोदर राहत असेल तर तिच्या बाळाला मॅक्रोसोमिया होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी जास्त असते.
आईसोबतच वडिलांचं वयही तितकंच महत्वाचं असतं. जर वडिलांनी पस्तिशी ओलांडली असेल, तर मॅक्रोसोमिया असलेल्या बाळ जन्माला येण्याची शक्यता 10 टक्क्यांनी जास्त असते.
गर्भधारणेचा कालावधी 40 आठवड्यांपेक्षा जास्त असेल तरी मॅक्रोसोमिक बाळ होण्याचा धोका संभवतो. 42 किंवा जास्त आठवडे उलटून गेले तर मॅक्रोसोमिक बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढते.
मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये मॅक्रोसोमिया असण्याची शक्यता तीनपट जास्त असते.
बाळंतपणामधले धोके
मॅक्रोसोमियाग्रस्त बाळांचं शरीर मोठं असतं, त्यामुळे सामान्य प्रसूती (नॉर्मल डिलिव्हरी) होणं कठीण असतं. आईच्या प्युबिक बोन्समुळे बाळाचे खांदे निखळण्याची शक्यता असते.
याला वैद्यकीय भाषेत 'शोल्डर डायस्टोशिया' म्हणतात. शिवाय नॉर्मल डिलिव्हरीत बाळ मध्येच अडकण्याची शक्यता असते आणि यामुळे बाळाचा श्वास कोंडू शकतो. शिवाय बाळाची नाळ आकसली जाऊ शकते.
बाळाचा हात आणि खांदा जोडणारा सांधा निखळू शकतो. किंवा मणक्यापासून हात आणि खांद्याला सिग्नल पाठवणाऱ्या नर्व्हस सिस्टीमला इजा होऊ शकते.
एखाद्या गंभीर प्रकरणामध्ये बाळाच्या शरीराच्या अवयवांना कायमचं अपंगत्व येऊ शकतं.
सामान्य बाळांमध्ये शोल्डर डायस्टोसिया होण्याचं प्रमाण 0.7 टक्के आहे. पण मॅक्रोसोमिक बाळांमध्ये हा धोका 25 टक्के असतो.
प्रसूतीदरम्यान आईच्या योनिमार्गाचं नुकसान होण्याचा धोकाही वाढतो रक्तस्त्राव जास्त होतो आणि कधीकधी आईच्या जीवाला धोका निर्माण होतो.
बाळाचं वजन जास्त असेल आणि नॉर्मल डिलिव्हरी असेल तर प्रसूतीदरम्यान योनिमार्गाला इजा होण्याची शक्यता जास्त असते.
जास्त वजन असलेल्या मॅक्रोसोमिक बाळांची हालचाल सुद्धा मंद गतीने होत असते. आईच्या मूत्राशयातून मूत्रविसर्जन होत नाही. अंतर्गत रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.
मॅक्रोसोमिक बाळांबद्दल आणखीन प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे ही बाळं आयुष्यभर लठ्ठच राहतात का?
तर आकडेवारीनुसार, मॅक्रोसोमिक बाळांच्या वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांच्यात लठ्ठपणा असण्याची शक्यता असते. काही संशोधनातून असं समोर आलंय की, या बाळांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
भविष्यात मॅक्रोसोमिक बाळं जन्माला येण्याच्या संख्येत वाढ होऊ शकते. 1970 नंतर जन्माला येणाऱ्या बाळांचं वजन पूर्वीपेक्षा सरासरी 450 ग्रॅमने जास्त आहे.
आईमध्ये असणारा लठ्ठपणा हे मॅक्रोसोमियाग्रस्त मुलं जन्माला येण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे जन्मत: लठ्ठपणा असलेल्या मुलांची संख्या देखील वाढण्याची अपेक्षा आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)