अण्वस्त्रांची भाषा करणं पुतिन यांचा वेडेपणा - युक्रेन

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

  1. पुतिन यांच्या त्या कार्यवाहीची युरोपाला भीती

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन

    युरोपियन युनियन ऊर्जेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. नैसर्गिक वायू विकून रशियाची गंगाजळी भरली जाते. या दोन गोष्टींचं महत्त्व सध्याच्या वर्तमानापासून वेगळं करता येणार नाही.

    युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर युरोपियन युनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले. युरोपियन युनियनने रशियाच्या केंद्रीय बँक तसंच रशियाच्या विमानांवर हवाई क्षेत्रात बंदी घातली आहे.

    युरोपियन युनियन युक्रेनला शस्त्रास्त्रांचाही पुरवठा करणार आहे. युरोपियन युनियनने रशियाकडून नैसर्गिक वायूची आयात बंद केलेली नाही.

    युरोपात नैसर्गिक वायूच्या किंमती आधीच वाढल्या आहेत. नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखला तर युरोपात किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे हे पुतिन यांना माहिती आहे. पुतिन नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखू शकतात किंवा कमी करू शकतात.

    युरोपियन युनियनच्या ऊर्जामंत्र्यांची ब्रसेल्समध्ये आपात्कालीन बैठक होत आहे. युरोपातल्या ऊर्जासंकटासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.

    युरोपातील ऊर्जासंकटाचं आर्थिक समस्येतून राजकीय समस्येत रुपांतर झालं आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर जाहीरपणे गॅसयुद्ध छेडल्याचा आरोप केला आहे.

    युक्रेन संकटामुळे गेल्या सात वर्षातील नैसर्गिक वायूच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातली भागीदारी नाटयमय पद्धतीने वाढीस लागली आहे. रशिया आणि सौदी अरेबिया हे जगातील सगळ्यात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी आहे. तेल निर्यातीवर त्यांचं नियंत्रण असतं.

    अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सौदी अरेबियाला तेल उत्पादन वाढवण्याची सूचना केली होती. सौदीने ही सूचना अंमलात आणली तरी महागाई आणि नैसर्गिक वायू किमती कमी होऊ शकतात. यामुळे रशियाचा फायदा मर्यादित होऊ शकतो. पण सौदी अरेबियाने अमेरिकेचं ऐकण्यास नकार दिला.

  2. भीती दाटते तेव्हा....

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, युक्रेनमधली परिस्थिती

    युक्रेनची राजधानी कीव्ह शहरात एक महिला आपल्या मांजरीला घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना.

  3. रशियाचं चलन रुबलच्या मूल्यात 30 टक्क्यांची घसरण

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशियाचं चलन रुबल

    युक्रेनवरील हल्ल्याचा परिणाम म्हणून युरोपीय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लागू केले. याचीच परिणती होऊन रशियाचं चलन असलेलं रुबलचं मूल्य 30 टक्क्यांनी घसरलं आहे.

    युरो एक टक्क्यांनी घसरला आहे आणि तेलाच्या किमती वाढल्या आहेत. रशियात बँकांसमोर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. बँकेचं कार्ड बंद होईल किंवा बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध लादले जातील अशी भीती अनेकांना आहे.

    युरोपात रशियाच्या बँकांचं कामकाज ठप्प झालं आहे. रशियाच्या केंद्रीय बँकेवरील प्रतिबंधामुळे 630 अब्ज डॉलर विदेशी मुद्रेचा वापर करता येणार नाही. याचा थेट परिणाम रशियाच्या चलनावर म्हणजे रुबलवर होणार आहे. रुबल कमकुवत झाल्यास महागाई वाढेल.

    रशियाच्या केंद्रीय बँकेकडे मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. व्याजदरांमध्ये वाढ आणि देशाबाहेर चलन घेऊन जाण्यावर मर्यादा येऊ शकतात.

    दरम्यान युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली. पुढचे 24 तास युक्रेनसाठी महत्त्वाचे असतील असं झेलन्स्की यांनी जॉन्सन यांना सांगितलं.

  4. रशियासंदर्भात भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती एकत्र

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, @ambtstirumurti

    फोटो कॅप्शन, टीएस तिरुमूर्ती

    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यासंदर्भात या बैठकीत प्रस्ताव पारित केला जाऊ शकतो.

    शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त परिषदेत रशियाने नकाराधिकार वापरत आपल्याविरोधातील प्रस्ताव पारित होण्यापासून रोखला होता.

    या प्रस्तावात युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाचा निषेध नोंदवण्यात आला होता. रशियाने कोणत्याही अटीशर्तींविना युक्रेनमधून लष्कराला परत बोलवावं असं आवाहन यामध्ये करण्यात आलं.

    सोमवारी संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा न्यूयॉर्कमध्ये होत आहे.

    रविवारी युक्रेनवरील हल्ल्याबाबत मतदानावेळी भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य आहेत.

    संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी भारताने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचं सांगत युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती अतिशय दु:खद असल्याचं म्हटलं आहे.

  5. रविवारी काय-काय घडलं?

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशिया-युक्रेन संघर्ष

    नमस्कार,

    रशिया-युक्रेन संघर्षाचा पाचवा दिवस आहे. दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आम्ही लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. चहूबाजूंनी आक्रमण होत असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.

    रविवारी काय काय घडलं

    • रविवारी दिवसभर रशियाच्या फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ले चढवले.
    • युरोपियन युनियनने अभूतपूर्व असा निर्णय घेत युक्रेनला शस्त्रं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
    • युरोपियन युनियनने रशियाच्या विमानांची वाहतूक रोखली आहे. रशियाच्या प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
    • युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश युक्रेनमधून येणाऱ्या निर्वासितांना किचकट कारभाराविना प्रवेश देतील.
    • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्र विभागाला स्पेशल अलर्ट जारी केला आहे.
    • नाटोला इशारा देण्यासाठी पुतिन यांनी ही कृती केली आहे.
    • रशियाच्या 4,300 सैनिकांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केला.
    • रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींची बेलारुस सीमेवर विनाशर्त बैठक होत आहे.

    रविवारी काय घडलं हे सविस्तर वाचण्यासाठी बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजला भेट द्या