गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडत आहे. नागपूर महानगर पालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार शहरात गेल्या आठवडाभरात एकही वेंटीलेटर बेड नव्या रुग्णांसाठी उपलब्ध नव्हते.
नागपूर शहरातील महानगर पालिका क्षेत्रात 551 वेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. महापालिका क्षेत्रात 4 हजार 521 एवढे आॅक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स आहेत. 1 हजार 924 एवढे आयसीयु एवढे बेड्स आहेत. तर विना आॅक्सिजन सपोर्टचे 350 बेड्स उपलब्ध आहेत.
पण या पैकी गेल्या आठवडाभरात महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स कधीही 40 च्या वर उपलब्ध नव्हते. तर आॅक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स 50 च्या वर उपलब्ध नव्हते.
गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आलेख जरी वाढता असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. मंगळवारी 27 एप्रिल रोजी 6 हजार 287 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर शहर आणि ग्रामिण मिळून 101 रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका क्षेत्रातील 54 लोक तर ग्रामिण मधील 39 लोकांचा समावेश आहे.
मंगळवारी शहरात 22 हजार 908 एवढ्या नागरिकांच्या कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या. सोमवारी या चाचण्या महापालिका क्षेत्रात 14 हजार 770 एवढ्या होत्या तर ग्रामीणमधील 4 हजार 270 एवढ्या आहेत. एकुण 18 हजार 997 एवढ्या होत्या. गेल्या आठवडाभर चाचण्या याच क्षमतेनं जिल्ह्यात होत आहेत.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ 27 एप्रिल 2021 रोजी पर्यंत नागपूर महानगर पालिका क्षेत्रात साडे पाच हजारावर अतिरिक्त बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या 7 हजार 144 इतकी झाली आहे.
आय.सी.यू.च्या बेड्समध्ये 1817 ने वाढ झाली असून आणखी व्यवस्था वाढवण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी नागपूर शहरात शासकीय आणि विविध खासगी रुग्णालय मिळून केवळ 1 हजार 514 बेड्सची व्यवस्था होती. सप्टेंबरनंतर आता एप्रिल 2021 मध्ये कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला. दरम्यान, मनपा प्रशासनाने उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन बेड्सची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यश आले असून सुमारे साडे पाच हजारांनी बेड्स वाढले आहेत.
28 सप्टेंबर 2020 मध्ये केवळ 1514 बेड्स विविध रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामध्ये ऑक्सीजनची उपलब्धता असलेले 1144, आय.सी.यू.मध्ये 316 तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले 236 बेड्स उपलब्ध होते. यानंतर प्रत्येक महिन्यात ही संख्या वाढविण्यात आली. 31 डिसेंबर 2020 रोजी 3993 बेड्स रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यात ऑक्सीजनसह 2673, आय.सी.यू.मध्ये 1208 तर व्हेंटिलेटर असलेल्या 349 बेड्सचा समावेश होता.
24 एप्रिल रोजी एकूण बेड्सची संख्या 7144 इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर 2020 नंतर 5 हजाप 630 बेड्स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात 4 हजार 653 बेड्स ऑक्सीजनसह असून 2 हजार 113 बेड्स आय.सी.यू.चे आहेत तर 542 बेड्स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”