You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाईव्ह कव्हरेज
बंगालमध्ये 1 जूनपासून प्रार्थना स्थळं खुली होणार
पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून मंदिर, मशीद, गुरुद्वारा...आदी सगळ्या प्रकारची प्रार्थनास्थळं उघडली जाणार आहेत. पण, कोणत्याही ठिकाणी 10 पेक्षा अधिक जणांना एकत्र यायला बंदी असेल, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
आजचं कार्टून
कोल्हापूरमध्ये कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले
कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत 30 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 466 झाली आहे.
एकट्या शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 142 आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे
अमित शाहांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 31 मे नंतर लॉकडाऊन असण्याबाबत देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांचा काय दृष्टिकोन आहे याबाबतची माहिती दिली.
गुरुवारी अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कोरोना व्हायरसचा सामना कसा करायचा आणि लॉकडाऊनबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील देण्यासाठी अमित शाह यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
मास्क न लावणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पंजाबमध्ये 500 रुपयांचा दंड
पंजाबमध्ये जी व्यक्ती घराबाहेर पडताना मास्क लावणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकेल त्या व्यक्तीला 500 रुपयांचा दंड लावण्यात येईल असं पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी सांगितलं आहे.
दुकानदारांनी नियम मोडले तर त्यांना 2,000 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. होम क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सिद्धू यांनी दिले आहेत.
पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला कोरोनाची लागण, बसू यांच्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाली त्यानंतर बसू होम क्वारंटाइन झाले होते.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री सुजित बसू यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते होम क्वारंटाइन होते.
ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात बसू हे अग्निशमन दलाचे मंत्री आहेत. बसू यांच्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाली त्यानंतर बसू होम क्वारंटाइन झाले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेले लोकही होम क्वारंटाइन झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे हाल होत असलेल्या एका मेंढपाळाची गोष्ट
अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी मुख्यमंत्र्यांची उद्या कुलगुरुंसोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील वेगवगेगळ्या विद्यापीठातल्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत. यामध्ये ते अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी निर्णय घेणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
महिला काँग्रेस करणार 25 लाख सॅनिटरी पॅड्सचं वाटप
कोरोनाच्या काळात पाणी आणि अन्नाचा अभाव आहे, पण त्याचबरोबर काही महिलांना सॅनिटरी पॅडही उपलब्ध होत नाहीयेत. कोरोनाच्या संकटकाळात सॅनिटरी पॅड विकत घेऊ न शकणाऱ्या महिलांना 25 लाख पॅड्स वाटप करण्याचा निर्णय महिला काँग्रेसनं घेतला आहे.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी ही माहिती दिली आहे.
ICU वॉर्डमध्ये असा सुरू आहे कोरोना रुग्णांचा जीवन-मृत्यूशी खेळ
युकेमधल्या रॉयल लंडन हॉस्पिटमधल्या ICU वॉर्डमध्ये सध्या कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी खूप मेहनत घेत आहेत. मात्र, बऱ्याचदा डॉक्टरांना रुग्णांना वाचवणं शक्य होत नाहीये. तर, काही रुग्णांवरचा धोका कमी करण्याची डॉक्टरांची मेहनत फळाला येत आहे.
या हॉस्पिटलच्या ICU मधले रुग्ण, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे कोणत्या वातावरणात कोरोनाशी लढा देत आहेत याचा आढावा बीबीसीने घेतलाय.
त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर स्थलांतरित जमले
मुंबईच्या कुर्ला भागातील लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर आज स्थलांतरितांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं.
जेवण्या-खाण्यासाठी पैसे उरले नसल्यामुळे गावी जाण्याची तातडीने सोय करावी, अशी मागणी ते करत आहेत.
27 लाखांहून अधिक स्थलांतरित उत्तर प्रदेशात दाखल
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सुमारे 27 लाख स्थलांतरित उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.
या सर्व स्थलांतरितांना रेल्वे/बससेवा मोफत पुरवण्यात आली. स्थलांतरित येत राहतील, तोपर्यंत अशा प्रकारची सेवा त्यांना दिली जाईल, असं अवस्थी म्हणाले.
हरयाणात पीपीई किट घालून लोकांची कटिंग-दाढी
हरयाणामध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला कटिंगचं दुकान चालवणाऱ्या दोन भावंडांनी आपलं दुकान सुरू केलं. त्यांनी पीपीई किट घालून लोकांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
राज्यसभा सचिवालयातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
राज्यसभा सचिवालयातील एका अधिकाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यसभा सचिवालयातील एक भाग सीलबंद करण्यात आला आहे, अशी बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
लॉकडाऊन वाढवण्याची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी
कोरोना व्हायरसच्या प्रसाराचं प्रमाण वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात यावं, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
गेल्या 24 तासांत 116 पोलिसांना कोरोनाची लागण, 3 मृत्यू
राज्यात गेल्या 24 तासांत 116 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. तर एका दिवसात 3 पोलिसांचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला.
आतापर्यंत राज्यात 2,211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 25 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
रेल्वे रिझर्वेशनची मुदत एका महिन्यावरून तीन महिन्यापर्यंत वाढवली
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून हळूहळू रेल्वे सेवा सुरू करण्याचे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत.
येत्या काळातील नियोजित वेळापत्रकातील रेल्वेंचं तिकीट बुकींग करण्यासाठी पूर्वी एका महिन्याची देण्यात आली होती. ही मुदत आता तीन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता तीन महिन्यांपर्यंत तिकीटाचं रिझर्व्हेशन करता येऊ शकेल, असं मंत्रालयाने कळवलं आहे.
इतर आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी रेल्वेप्रवास टाळावा
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग तसंच कमी रोगप्रतिकारशक्ती यांसारख्या आजारांनी ग्रासलेल्या लोकांनी, 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी प्रवास टाळावा, अत्यावश्यक असेल तरच प्रवासासाठी निघावं, असं आवाहन रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.
कोव्हिड-19 ची साथ पसरलेली असताना श्रमिक स्पेशल रेल्वे चालवण्यात येत आहेत. अशा वेळी वरील व्यक्तींनी प्रवास करणं धोक्याचं आहे, असं रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
ब्रेकिंग, कोव्हिड-19 मृत्यूंच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं
भारतीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं आहे.
देशात आतापर्यंत 4706 जणांना कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला असून चीनमध्ये 4638 मृत्यूंची नोंद आहे.
जगभरात रुग्णांच्या बाबतीत भारत नवव्या स्थानी पोहोचला असून भारतात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 386 रुग्ण आढळून आले आहेत.
दहाव्या स्थानी असलेल्या टर्कीमध्ये 1 लाख 60 हजार 979 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
भारतात चौथ्या लॉकडाऊनची मुदत लवकरच संपणार आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल किंवा नाही याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
तज्ज्ञांच्या मते येत्या दोन महिन्यात भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढून शिखर गाठू शकते.
सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदी करण्यासाठी मदत करणारा रोबो एका भारतीय अभियंत्यानं बनवला आहे