You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

फसवी आकडेवारी सांगून सरकारकडून दिशाभूल केली जात आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगभरातले कोरोनाविषयक ताजे अपडेट्स तसंच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ताज्या घडामोडी एकाच ठिकाणी.

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. लॉकडाऊन 5 कसं असेल? आधीचे लॉकडाऊन यशस्वी झाले का?

  3. आजचे महत्त्वाचे अपडेट्स

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. उद्या पुन्हा भेटू...नवीन लाइव्ह पेजवर ताज्या घडामोडींसह. पण जाता जाता आज दिवसभरात नेमकं काय घडलं, ते थोडक्यात पाहू-

    • महाराष्ट्रात बुधवारी (27 मे) कोरोनाची लागण झालेले 2190 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 56,948 झाली आहे. बुधवारी एकूण 105 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
    • मलेरियावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर कोव्हिड-19 च्या रुग्णांवर करण्यावर फ्रान्सनं निर्बंध लादले आहेत.
    • फसवी आकडेवारी सांगून सरकारकडून दिशाभूल केली जात आहे, असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
    • पंतप्रधान निधीला पैसा द्या. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री निधीला पैसा देऊ नका, अशी वृत्ती भारतीय जनता पक्षानं दाखवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र? महाराष्ट्राचा हितचिंतक नक्कीच नाहीये, हे यातून दिसून आलं," अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
    • कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तीन लसींनी चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यापैकी एक लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध होईल असं हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आशिष झा यांनी सांगितलं.
    • मुंबई विमानतळाच्या दिशेने प्रवासाला निघालेले प्रवासी तसंच विमानतळाहून घरी निघालेले प्रवासी ई-पास विना जाऊ शकतात. मात्र प्रवासाचा बोर्डिंग पास आणि अन्य परिचयपत्रं बाळगणं आवश्यक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

    काळजी घ्या...शुभरात्री...गुड नाइट.

  4. राज्यात आज दिवसभरात 105 जणांचा मृत्यू

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगानं वाढताना दिसत आहे.

    महाराष्ट्रात बुधवारी (27 मे) कोरोनाची लागण झालेले 2190 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 56,948 झाली आहे. बुधवारी एकूण 105 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत 1897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 17918 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

  5. आजचं पॉडकास्ट

  6. फ्रान्समध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर निर्बंध

    मलेरियावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर कोव्हिड-19 च्या रुग्णांवर करण्यावर फ्रान्सनं निर्बंध लादले आहेत.

    या औषधाच्या वापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा दोन संशोधन संस्थांकडून करण्यात आल्याचं फ्रान्स सरकारनं म्हटलं आहे. त्यानंतर जे डॉक्टर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं सेवन करत होते, त्यांना या गोळ्या वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

    अर्थात, अजूनही अनेक देशांमध्ये या औषधाचा वापर केला जात आहे तसंच यावर संशोधनही सुरू आहे.

    अमेरिकेच्या सरकारनं आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. रुग्णालयाबाहेर या औषधाचा वापर करण्यास मनाई आहे.

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं समर्थन केलं असून आपण स्वतः या गोळ्या खात असल्याचंही सांगितलं होतं.

    ब्राझीलमध्येही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावरील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो हेसुद्धा हायड्रॉक्सीक्लोक्वीनच्या वापराचे समर्थक आहेत.

  7. ‘मी स्वतः ऑक्सिजन लावला माझ्या पप्पांना, अक्षरशः जमिनीवर पडून ट्रीटमेंट दिली’

  8. महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे शत्रू कोण आणि मित्र कोण - देवेंद्र फडणवीस

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.

    खोटं बोला पण रेटून बोला, असा प्रयत्न या पत्रकार परिषदेतून करण्यात आला. अशी फसवी आकडेवारी देऊन काही होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, की त्यांचा मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

    देवेंद्र यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे-

    • तुम्हाला एका ट्रेनचे तिकिटाचे सात ते आठ लाख रुपये लागतात. पण रेल्वेला एक ट्रेन चालवण्यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च येतो. कापूस खरेदीच्या संदर्भात सर्व पैसे केंद्र सरकार देतं. ते पैसे दिले आहेत.
    • केंद्र सरकारनं डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचे पैसे ज्या खात्यात जायला हवेत, त्याच खात्यात जातात आणि याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्वतः केली आहे.
    • पीपीई किट्स आम्हाला मिळाली नाही, असा आरोप केला. पण कदाचित या सरकारला हे माहीत नाही, की पीपीई किट्स संदर्भात एक डायनॅमिक डॅशबोर्ड आहे. त्यावर प्रत्येक राज्याला किती किट्स देण्यात आले आहेत, त्याची माहिती दिली जाते. त्यानुसार महाराष्ट्राला 26 मे पर्यंत 9 लाख 88 हजार म्हणजे जवळजवळ दहा लाख पीपीई किट्स देण्यात आले आहेत. त्यासोबत 16 लाख N-95 मास्क दिले आहेत.
    • या गोष्टी आम्ही विकत घेतोय, हे सांगितलं. पण विकत घेण्यासाठी 468 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले हे सांगायचं ते विसरले.
    • महाराष्ट्रात जास्त टेस्ट होत असल्यानं रुग्णांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं. पण हे असत्य आहे. मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. टेस्ट आणि रुग्णांची संख्या याचा विचार केला झालेल्या टेस्टपैकी ५ टक्के लोक पॉझिटिव्ह निघतात. पण महाराष्ट्रात हे प्रमाण १३-साडे तेरा टक्के आहे. मे महिन्यात तर मुंबईमध्ये हे प्रमाण 32 टक्के आहे.
    • केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंतचे पूर्ण आले आहेत.
    • सत्य बोलायला एक माणूस लागतो, पण फेकाफेक करायला तीन माणसं लागतात. अशापद्धतीनं आज तीन जणांनी एकत्र येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला विसंगत ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
  9. भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र?- जयंत पाटील

    भाजपनं महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. सरकार आणि जी यंत्रणा कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काम करत आहे, त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.

    "मुख्यमंत्री सहायता निधीला भाजपनं आतापर्यंत एकही पैसा दिलेला नाहीये. पंतप्रधान निधीला पैसा द्या. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री निधीला पैसा देऊ नका, अशी वृत्ती भारतीय जनता पक्षानं दाखवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र? महाराष्ट्राचा हितचिंतक नक्कीच नाहीये, हे यातून दिसून आलं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

    जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुद्दे खोडून काढताना मांडलेले मुद्दे-

    • आता आपल्या राज्यातून मजूर बाहेर गेले आहेत. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. या लोकांकडे जे स्किल आहे, ते महाराष्ट्रातल्या लोकाकंडे नाहीये. मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नाही. महाराष्ट्रातील तरुण इथले कारखाने सुरू करू शकतात. त्यासाठी आवश्यक ते स्किल्स इथल्या तरुणांकडे आहेत.
    • महाराष्ट्र आणि मुंबईतले रुग्ण वाढत आहेत. मुंबईत उत्तम काम सुरू आहे, असं मी अतिशय नम्रपणे सांगतो. आपण टास्क फोर्स स्थापन केला आहे. ही टीम अगदी 24 बाय 7 काम करत आहे.
    • महाराष्ट्रानं डेथ ऑडिट करण्याची सोय आहे. पुण्याला डेथ ऑडिटची टीम आहे, मुंबईमध्ये डेथ ऑडिटची टीम आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी एक टीम आहे
    • महाराष्ट्रात सतत 52 हजार केसेसचा उल्लेख केला जातोय. पण प्रत्यक्षात 35,178 केसेस अॅक्टिव्ह आहेत.
    • राज्यात डबलिंग रेट कमी ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. दोन-दोन जणांच्या १६ हजार टीम्सनं महाराष्ट्रात 66 लाख जणांचा सर्व्हे केला आहे. आज जवळपास 5 लाख 67 हजार लोक होम क्वारंटाईन आहेत.
    • एप्रिलमध्ये 7.6 टक्के असलेला मृत्यूदर आता 3.25 आहे. ही स्पर्धा नाही, पण गुजरातपेक्षा चांगली परिस्थिती आहे.
  10. आधी आमचे हक्काचे 18 हजार 279 कोटी आम्हाला द्या - अनिल परब

    अनिल परब यांनी मांडलेले इतर महत्त्वाचे मुद्दे

    • महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18 हजार 279 कोटी रुपये आम्हाला मिळायचे आहेत. शिवाय एप्रिल आणि मे चे 2369 कोटी रुपयेही अजून मिळाले नाहीत.
    • देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, की केंद्रानं कायद्यात बसत नसताना नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे राज्याला दिले आहेत. पण कायद्यात बसणारे 18 हजार 279 कोटी तरी आधी द्या.
    • केंद्रानं जीडीपीच्या पाच टक्के कर्ज घेण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार 1 लाख 60 हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्राला घेता येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. पण तीन टक्क्यांची तरतूद आधीपासूनच होती. उर्वरित रकमेसाठी अनेक अटी-शर्ती आहेत. त्यानुसार कर्ज घेतलं तर राज्य कर्जाच्या खाईत जाईल.
    • पीपीई कीट्स, N95 मास्कचा पुरवठा केंद्राने केला आहे. मार्च महिन्यात आमच्याकडे ज्या वस्तू आम्हाला आल्या त्याचे पैसे आम्ही दिले आहेत. एप्रिल महिन्यापासूनही या वस्तूंचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत. त्यासंबंधीचं पत्र आहे. हे काही फुकट देत नाहीत.
    • 1611 कोटी रुपये हे आपत्ती व्यवस्थापन फंडातून दिले आहेत, काही वेगळे पैसे दिले नाहीत. प्रत्येक राज्याला हा फंड दरवर्षी मिळतच असतो.
    • जेवढ्या टेस्ट महाराष्ट्रात झाल्या, तेवढ्या कुठेच झाल्या नाहीत. मुंबईची लोकसंख्या इतकी दाट आहे. मुंबई महापालिकेनं त्या परिस्थितीतही हॉस्पिटल उभारणीचं काम सुरू केल आहे. पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही
  11. गुजरातला 1500 ट्रेन्स, पण महाराष्ट्राच्या वाट्याला 700 ट्रेन्स- अनिल परब

    शिवसेना नेते अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीवर सरकारची बाजू मांडली.

    अनिल परब यांनी मांडलेले मुद्दे-

    • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यात गहू, तांदूळ, डाळ देत राज्य शासनाला मदत. 1750 कोटी रुपयांचे गहू दिल्याचा दावा फडणवीसांनी केला. पण महाराष्ट्राला एवढ्या किंमतीचा गहू मिळाला नाही.
    • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1626 कोटी दिल्याचा दावा. पण ही योजना आजची नाही. ही आधीपासून सुरू आहे. त्यामुळे या योजनेतून महाराष्ट्राला वेगळी मदत नाही.
    • दिव्यांगांसाठी 116 कोटी दिल्याचं सांगितलं, पण त्याच योजनेंतर्गत 1200 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देतं हे सांगायला फडणवीस विसरले.
    • महाराष्ट्र सरकारने ट्रेनचा 68 कोटी खर्च दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून आम्ही पैसे घेतले नाहीत.
    • आम्ही 80 ट्रेन दिवसाला मागितल्या आणि ते ३० ते ३५ ट्रेन्स देतात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्याचा विरोधकांना इतका राग आला, की एका दिवसात त्यांनी 43 ट्रेन्स पाठवल्या. बंगालनं वादळामुळे ट्रेन्स पाठवू नका असं सांगूनही तिकडे ट्रेन्स पाठवल्या. लोक जाऊ नयेत आणि राज्य सरकार बदनाम व्हावं, असं नियोजम.
    • महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या गुजरातला 1500 ट्रेन्स, तर महाराष्ट्राला 700 ट्रेन्स देण्यात आल्या.
  12. सहकार्याऐवजी विरोधक गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- बाळासाहेब थोरात

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (26 मे) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारनं महाराष्ट्राला आतापर्यंत किती मदत दिली, हे सांगणारी आकडेवारी जाहीर केली. एवढी मदत करूनही महाराष्ट्र सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

    देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि शिवसेनेकडून अनिल परब सहभागी झाले.

    कोरोनाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नीट काम करत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. कोरोनाचं संकट मोठं आहे. या सगळ्या काळात विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा होती, मात्र ते गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत. पण आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

    बाळासाहेब थोरातांनी मांडलेले मुद्दे-

    • महाराष्ट्र उद्योगाचं केंद्र आहे, त्यामुळे इथं परराज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या जास्त. त्यांना सरकारनं सर्वतोपरी मदत केली आहे.
    • त्यांच्या भोजनाची सोय आपण केली. दररोज ७ लाख जणांना जेवण देत आहोत.
    • त्यानंतरही जे मजूर आपापल्या राज्यात परत जात होते, त्यांचीही काळजी आपण घेतली. त्यांच्या रेल्वे तिकिटांचा खर्च राज्य सरकारनं केला. जे पायी प्रवास करत होते, त्यांच्या प्रवासाची सोय केली.
  13. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

  14. मुंबईहून येणाऱ्या ट्रेन्सची माहिती नसल्याचा ममता बॅनर्जींचा दावा

    आम्हाला कोणतीही माहिती न देता 36 ट्रेन्स मुंबईवरून येत आहेत. मी महाराष्ट्र सरकारशीही बोलले आहे. मात्र त्यांनाही यासंबंधीची माहिती उशीरा मिळाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

    रेल्वेनं स्वतःचं गाड्यांचं नियोजन केल्याचंही ममता यांनी म्हटलं.

    गेले दोन दिवस ट्रेन्सच्या नियोजनावरुन रेल्वे मंत्री पीयुष गोयल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलाच 'सामना' सुरू आहे. त्यातच मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही 'अम्फान'मुळे ट्रेन पाठवू नका, अशी विनंती पश्चिम बंगाल सरकारनं केली असली तरी रेल्वेनं मुंबईतून बंगालसाठी गाड्या सोडल्याचा आरोप केला होता.

  15. मोफत जमीन घेणाऱ्या खासगी रुग्णालयात मोफत इलाज का नाही- सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

    ज्या खासगी हॉस्पिटलना मोफत जमीन देण्यात आली आहे, त्या हॉस्पिटल्समध्ये गरीबांवर मोफत उपचार का केले जाऊ शकत नाहीत, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.

    कोर्टानं केंद्र सरकारला या प्रश्नावर एका आठवड्याच्या आत उत्तर मागितलं आहे. जे हॉस्पिटल्स मोफत किंवा किरकोळ शुल्क आकारून रुग्णांवर उपचार करू शकतात, त्यांची यादी बनवण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे.

    सचिन जैन नावाच्या व्यक्तीनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. कोव्हिड-19 च्या रुग्णांवर मोफक किंवा किरकोळ दरात उपचार करण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याची मागणी सचिन जैन यांनी आपल्या याचिकेत केली होती.

    मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे एका आठवड्याच्या आत रिपोर्ट मागवण्यात आला आहे.

    सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारलं, की खाजगी हॉस्पिटल्सना जर मोफत जमीन देता येते, तर ते कोव्हिड-19 च्या रुग्णांवर मोफत इलाज का नाही करू शकत? ज्यांना मोफत किंवा कमी किमतीत जमीन देण्यात आलीये, अशा धर्मादाय हॉस्पिटल्सने कोव्हिड-19 च्या रुग्णांवर मोफत इलाज करायला हवेत.

  16. ब्राझीलमध्ये 1 ऑगस्टपर्यंत मृतांचा आकडा पाच पटीने वाढण्याची शक्यता

    26 फेब्रुवारी 2020 पर्यंत ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नव्हता. म्हणजेच चीनबाहेर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतरही जवळपास महिनाभर ब्राझीलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता.

    26 फेब्रुवारीला साओ पावलोमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. हे ब्राझीलमधलं लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं शहर आहे.

    उत्तर इटलीमधील लॉम्बार्डीमधून प्रवास करून आलेल्या एका 61 वर्षाच्या वृद्धाला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

    अधिकृतरित्या हा ब्राझीलमधला कोव्हिड-19 चा पहिला रुग्ण समजला जात असला, तरी अनेक तज्ज्ञांच्या मते ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग याआधीच सुरू झाला होता.

    अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची योग्य ती दखल घेतली जात नव्हती. मात्र त्यानंतर ब्राझीलमध्ये जणू रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आणि आतापर्यंत ब्राझीलमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 24,512 झाली आहे.

    11 एप्रिलला सांगण्यात आलं, की दक्षिण गोलार्धात असलेला ब्राझील हा पहिला देश आहे, जिथे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1 हजारहून अधिक झाली आहे. तोपर्यंत उष्ण हवामान असलेल्या देशात कोरोनाचा तितका प्रादूर्भाव दिसणार नाही, जितका युरोपमधल्या शीत हवामानाच्या देशात होतो, असंच मानलं जात होतं.

    17 मे पर्यंत ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या स्पेन आणि इटलीतील रुग्ण संख्येहूनही अधिक झाली होती. आता तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये ब्राझील हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

    अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली आणि ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ब्राझीलपेक्षा जास्त आहे. पण 1 ऑगस्टपर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या पाच पटीने वाढून एक लाख 25 हजार होऊ शकते. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

    ब्राझीलमधून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला प्रवेश देणार नसल्याचं अमेरिकेनं नुकतंच म्हटलं आहे.

    फेब्रुवारी पासून एप्रिलपर्यंत ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसेनारो कोरोना व्हायरसची तुलना सर्दी-पडशासोबत करत होते. माध्यमांमधून कोरोनासंबंधी भीतीचं वातावरण पसरवत असल्याची टीका त्यांनी केली होती.

  17. सोशल डिस्टन्सिंग पाळून खरेदीसाठी मदत करणारा रोबो

  18. एका कोरोनाच्या स्मशानभूमीत मी फोटो स्टोरीसाठी गेलो तेव्हा....

  19. राज्यात राष्ट्रपती राजवट, राजकीय सत्ताबद्दल नाही- नाना पटोले

    कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका होते आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट किंवा सत्ताबद्दल होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राज्यात अशी कोणतीही शक्यता नसल्याचं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हेच उद्दिष्ट आहे. राजकीय स्थितीबाबत जे बोललं जात आहे त्यात तथ्य नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, कोरोनाविरुद्धची लढाई सुरू आहे.

    कोणत्याही आघाडी सरकारला समन्वयासाठी बैठका घ्याव्या लागतात. यामध्ये नवीन किंवा अनोखं काहीही नाही. मी कॅबिनेटचा भाग नाही त्यामुळे मला याविषयी फार कल्पना नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी पटोले दिल्लीत आहेत.

    गेल्या वर्षी भाजपला सत्तेसाठी आवश्यक सत्ताबळ गाठता न आल्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बोलावल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत.

  20. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस मिळेल-आशिष झा

    कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तीन लसींनी चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यापैकी एक लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध होईल असं हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आशिष झा यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झा यांच्याशी संवाद साधला.

    अमेरिका, चीन, ब्रिटनमध्ये लसींची चाचणी सुरू आहे. त्याचे सुरुवातीचे निकाल उत्तम आहेत. यापैकी एक लस कोरोनाला रोखण्यात परिणामकारक ठरले. ही लस कशी मिळवायची यासंदर्भात भारताला आखणी करावी लागेल असं झा यांनी सांगितलं.

    प्राध्यापक झा हे हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे जाणकार आहेत.