You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात कोरोनाचे 2436 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात येण्यासाठी परवानगी घेऊन यावं लागेल- राज ठाकरे

    स्थलांतरित कामगारांच्या मुद्यावरून राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्रासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलं असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. उत्तर प्रदेशचे कामगार हवे असतील तर आमची परवानगी घ्यावी लागेल असंही ते म्हणाले. असं असेल तर महाराष्ट्रात शिरतानाही परवानगी घेऊन यावं लागेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    "उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथांनी लक्षात ठेवावं", असं राज ठाकरे म्हणाले.

    "महाराष्ट्र सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा", असं राज यांनी म्हटलं आहे.

  2. राज्याकडून 46 ट्रेन्सची मागणी; 41 ट्रेन रवाना होणार

    राज्य सरकारकडून 46 ट्रेन्स चालवण्याची मागणी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. यापैकी पाच ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जाणाऱ्या आहेत. अम्फान वादळाचा फटका बसल्याने या पाच ट्रेन्स सोडता येणार नाहीत. उर्वरित 41 ट्रेन सोडण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

    राज्य सरकारच्या विनंतीवरून आतापर्यंत महाराष्ट्रातून 557 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सोडण्यात आल्या. या ट्रेन्सच्या माध्यमातून 7.70 लाख प्रवासी आपापल्या गावी परतले आहेत. आणखी ट्रेन सोडण्यासंदर्भात रेल्वे आणि राज्याचे नोडल अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत असं सुतार यांनी सांगितलं.

  3. धावपटू द्युती चंदचा सराव सुरू

    स्टेडियम सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनेक खेळाडू सरावाला लागले आहेत. धावपटू द्युती चंद दोन महिन्यांच्या कालावधीनंतर भुवनेश्वरमध्ये सरावाला सुरुवात केली. द्युतीने केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. दोन महिने घरात बसून माझा फिटनेस गडबडला होता. मात्र आता ग्राऊंड उघडण्यात आले आहेत, त्यामुळे मी सरावाला लागले असं द्युतीने सांगितलं.

  4. देशात जुलैपर्यंत इतक्या लाख लोकांना होऊ शकतो कोरोना?

    कोरोनासंदर्भात काम करणाऱ्या संशोधकांच्या मते जुलै महिन्यापर्यंत देशात काही लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

    सरकारी आकडेवारीनुसार, देशात प्रत्येकी 13 दिवसांनंतर कोरोना संसर्गाचं प्रमाण दुपटीने वाढत आहे. सरकारने लॉकडाऊन शिथिल केला आहे.

    रॉयटर्स वृत्तसंस्थेने मिशिगन विद्यापीठातील बायोस्टॅटिस्टिक्स आणि संसर्गजन्य आजारांचे जाणकार भ्रमर मुखर्जी यांच्याशी बातचीत केली. भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात झालेली नाही. मुखर्जी आणि त्यांच्या टीमच्या मते जुलैपर्यंत 630,000 ते 21 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. देशातल्या कोरोना संसर्गाचं एक पंचमांश हिस्सा एकट्या मुंबई शहराचा आहे.

    सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची संख्या कमी आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना भरती करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय वणवण भटकत आहेत.

    रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सगळ्या रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आवश्यकता नाही असंही सरकारने म्हटलं आहे. हॉस्पिटल्समध्ये बेड्सची संख्या वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.

    सरकारी आकडेवारीनुसार देशात 714,000 हॉस्पिटल बेड्स आहेत.

  5. माणुसकी उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाही- योगी आदित्यनाथ

    "आपल्या घाम आणि रक्ताने महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना शिवसेना-काँग्रेसने वाऱ्यावर सोडलं.

    लॉकडाऊनमध्ये त्यांची काळजी घेणारं कुणीच नव्हतं, त्यांचे प्रचंड हाल झाले, त्यांनी घरी जावं अशी परिस्थिती निर्माण केली.

    या अमानवी वागणुकीसाठी माणुसकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीही माफ करणार नाही", असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या योगी आदित्यनाथ ऑफिस या हँडलवरून म्हटलं आहे.

    दरम्यान महाराष्ट्रातून स्थलांतरित कामगारांना घेऊन अडीचशेहून अधिक ट्रेन्स उत्तर प्रदेशला रवाना झाल्या आहेत.

  6. देशात 24 तासात 6977 नवे रुग्ण, 154 जणांचा मृत्यू

    देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6977 रुग्ण आढळले आहेत तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे.

    देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,38,845 एवढी झाली आहे. बरं झालेल्या 57720 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4021 जणांचा मृत्यू झाला आहे असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं आहे.

  7. डॉक्टर आणि नर्सेस देण्याची राज्य सरकारची केरळला विनंती

    कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने केरळला डाॅक्टर, नर्स देण्याची विनंती केली आहे.

    ५० डाॅक्टर आणि १०० नर्स देण्याची विनंती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डाॅ. तात्याराव लहानेंनी केली आहे.

    केरळच्या आरोग्य मंत्र्यांना त्यांनी या आशयाचं पत्र लिहिलं आहे.

    दरम्यान महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार असून याठिकाणी १२५ आयसीयू बेड्स असणार आहेत.

  8. मुंबईत विमान वाहतूक सुरू

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून हवाई वाहतूक सुरू होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयानंतर मुंबईत आजपासून हवाई वाहतुकीला सुरुवात झाली.

    नियमांचं काटेकोर पालन केल्यानंतरच प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.

    मुंबईतून 25 विमानं सुटतील आणि 25 विमानं दाखल होतील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

  9. राष्ट्रपतींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    ईद मुबारक! हा सण प्रेम, शांतता आणि बंधुभावाचं प्रतीक आहे. ईदच्या निमित्ताने समाजातील गरजूंचं दु:ख हलकं करून आनंद देण्याचं काम करूया. ईदचं औचित्य साधून आपण दानाचं महत्त्व समजून घेऊया. कोव्हिड-19ला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूया अशा शब्दांत कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  10. ट्रेनवरून राज्य सरकार आणि रेल्वेत टोलवाटोलवी

    स्थलांतरित कामगारांसाठी ट्रेन सोडण्याच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. रेल्वेने ट्रेन सोडण्याकरता यादी मागितली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यादी दिल्याचं सांगितलं. मात्र रात्री 2 पर्यंत 125 नव्हे 46 ट्रेन्सची यादी मिळाल्याचं केंद्रीय रेल्वमंत्री पीयुष गोएल यांनी ट्वीट करून सांगितलं.

    "राज्याने सांगितलेल्या 125 ट्रेन्सची यादी कुठे आहे? रात्री 2 वाजेपर्यंत 46 ट्रेन्सची यादी मिळाली आहे. यापैकी पाच ट्रेन्स पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जाणाऱ्या आहेत. मात्र अम्फन वादळाच्या प्रकोपामुळे या ट्रेन रवाना होऊ शकत नाहीत. उर्वरित 41 ट्रेन सोडण्याची व्यवस्था केली जाईल, आमची तयारी 125 ट्रेन सोडण्याची होती", असं पीयुष गोएल यांनी म्हटलं आहे.

    त्याआधी "महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये", असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

  11. देशांतर्गत हवाई वाहतुकीला सुरुवात

    लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने आजपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाली. दिल्लीहून भुवनेश्वरसाठी विमान रवाना झालं.

    प्रवाशांच्या आरोग्य तपासणीनंतरच प्रवासाची अनुमती देण्यात आली. विमानतळावरील खाद्यपदार्थ तसंच अन्य दुकानं उघडली आहेत. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाच्या टर्मिनल 3 मधून विमानं सुटणार आहेत.

  12. कोरोना आणि लॉकडाऊनमध्येही ईदचा उत्साह

    कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन काळात जगभरात विविध ठिकाणी ईदचा सण साजरा होतो आहे.

    टर्की आणि सौदी अरेबियात लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत, त्यांनी घरातच ईदचा सण साजरा केला. इंडोनेशियातही सरकारने लोकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं होतं. मात्र तरीही असंख्यजण मशिदींमध्ये जमले होते. अन्य देशांमध्येही एकत्र येण्यावर बंदी आहे.

    दरम्यान कोरोनाचं केंद्र असलेल्या वुहान शहरात रविवारी 10 लाख लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. वुहानमधूनच जगभरात कोरोनाचा विषाणू पसरला होता. शनिवारी वुहानमध्ये 14 लाख लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती.

    ब्रिटनमध्ये रविवारी कोरोनामुळे 118 जणांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 36, 793 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पंतप्रधान बोरिज जॉन्सन यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  13. कोरोना अपडेट्स

    गुड मॉर्निंग,

    आठवड्याचा पहिला दिवस. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा. घरी राहा, तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. कोरोनाबाबतच्या राज्यातल्या, देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

    जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता टॉप 10 देशांमध्ये आहे. भारताने इराणला मागे टाकलं.

    स्थलांतरित कामगारांसाठी ट्रेन सोडण्याच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोएल यांच्यात ट्वीटवॉर सुरू आहे.

    दरम्यान मुंबईत प्रत्येक दिवशी 25 विमानांना उतरण्याची व उड्डाणाची परवानगी सरकारने दिली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मे महिन्याच्या अखेरीस मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सव्वा ते दीड लाख होईल असा अंदाज केंद्रीय पथकाने व्यक्त केला होता मात्र प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्याचं त्यांनी सांगितलं.

    राज्यात एका दिवसात 3 हजारांहून नवे कोरोनाग्रस्त आढळले असून राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

    रविवारी दिवसभरात काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.