You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यातल्या खासगी रुग्णालयातील 80% बेड्स सरकारने घेतले ताब्यात
राज्याची आरोग्ययंत्रणा कोलमडली, 50 हजार कोटींचं पॅकेज द्या - देवेंद्र फडणवीस
लाईव्ह कव्हरेज
मोदींचं 20 लाख कोटींचं पॅकेज, पुढचे 5 दिवस त्याचा पाढा वाचणं ही क्रूर चेष्टा - सोनिया गांधी
कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी मोदींनी घोषित केलेलं 20 लाख कोटींचं पॅकेज आणि पुढचे 5 दिवस त्याचा पाढा वाचत राहणं म्हणजे एक क्रूर चेष्टा ठरली आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या विरोधी पक्षांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित बेठकीत बोलत होत्या.
प्रत्येक अर्थतज्ज्ञाने लोकांना तातडीची मदत करण्याबाबत सल्ला दिला आहे. सध्या शेकडो किलोमीटर चालून घराकडे जाणारे स्थलांतरित मजूर, भूक आणि औषधांबाबतची त्यांची अस्वस्थता हेच सध्याचं कोरोना महामारीचं चित्र बनलं आहे, असं गांधी म्हणाल्या. या बैठकीत 22 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
ब्रेकिंग, देशातील 80 टक्के कोरोनाग्रस्त 5 राज्यांमध्ये
सध्या देशातील काही राज्य आणि शहरांमध्येच कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. सध्या 5 राज्यांमध्ये 80 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, अशी माहिती एम्पॉवर्ड ग्रुप वनचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या 5 राज्यांमध्येच देशातील 80 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.
तसंच केवळ महानगरांचा विचार केला तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे या 5 महानगरांमध्ये देशातील 60 टक्के रुग्ण आहेत. तर 10 राज्यांमध्ये 90 टक्के आणि 10 शहरांचा विचार केल्यास 70 टक्के रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत, असं पॉल यांनी सांगितलं.
ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभागी
कोरोना संकटाची हाताळणी योग्य पद्धतीने न केल्याच्या मुद्द्यावर आज राज्यभरात भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं. विधानसभेनंतर विधान परिषदेचीही उमेदवारी न दिल्यामुळे पक्षावर टीका करून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे चर्चेत आले होते. पण आजच्या भाजपच्या आंदोलनात खडसे त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत सहभागी झाल्याचं दिसून आलं.
देशात आतापर्यंत 27 लाख 55 हजार कोरोना चाचण्या
देशात आतापर्यंत 27 लाख 55 हजार 714 जणांच्या कोरोना व्हायरससंदर्भातील चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून देशात रोज 1 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी 18 हजार 287 चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये घेण्यात आल्या आहेत, असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांना कोरोनाची लागण
कांग्रेस प्रवक्ते संजय झा यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे.
झा यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असली तरी त्यांच्यामध्ये त्याची लक्षणं नाहीत. तरी खबरदारी म्हणून आपण स्वतःहून होम क्वारंटाईन होत असल्याचं झा यांनी सांगितलं आहे.
'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारलं असतं'
धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी WHOचं कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारलं
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. हा पदभार डॉ. हर्षवर्धन यांनी आज स्वीकारला आहे.
सत्तेच्या लालसेतून भाजपचं लज्जास्पद राजकारण - आदित्य ठाकरे
भाजपने राज्य सरकारविरोधात केलेल्या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
सत्तेच्या लालसेतून भाजप लज्जास्पद राजकारण करत आहे. मुलांना भर उन्हात उभं करण्यात आलं आहे.
त्यांचे मास्कसुद्धा योग्य पद्धतीने लावलेले नाहीत. त्यांना खरंतर घरात सुरक्षितपणे ठेवण्याची गरज आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
एका दिवसात 13 लाख प्रवाशांनी बुक केली रेल्वेची तिकिटं
रेल्वे बुकींग सुरू होताच एका दिवसात 13 लाख जणांनी तिकिटं काढल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. कालपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे रिझर्व्हेशन सुरू करण्यात आलं. एकूण 230 रेल्वेंमध्ये प्रत्येक दर्जाच्या तिकिटांचं बुकींग सुरू करण्यात आलं आहे, असं रेल्वे मंत्रालयाने कळवलं आहे.
कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है- आदित्य ठाकरेंची टीका
'3 मुलांना जगवायचं की गावाला जायला पास काढायचा? ' - पाहा व्हीडिओ
राज्यात 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा
राज्यात 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात रक्ताची गरज भासणार आहे, लोकांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तपेढ्यांना जास्तीत जास्त रक्त संकलन करून द्यावं, असं आवाहन अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.
खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणीसाठी पीपीई कीट आणि एन ९५ मास्क उपलब्ध आहेत. त्यांनी कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी दवाखाने सुरु करावेत, असं शिंगणे म्हणाले.
राज्यात मद्यविक्री दुकाने सुरू, दिवसभरात 34 हजार ग्राहकांना घरपोच विक्री
महाराष्ट्रात 5864 मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली आहेत. काल दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली आहे.
अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 5 हजार 984 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याप्रकरणी 2 हजार 664 जणांना अटक तर 16 कोटी 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं आयुक्त उमाप यांनी सांगितलं.
कोरोनाच्या भयानक संकटात सुचतं कसं राजकारण?- काँग्रेसची भाजपवर टीका
भाजपने राज्य सरकारविरोधात सुरू केलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका कवितेद्वारे टीका केली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस संकटाच्या राजकारणावर काय म्हणाले?
जगभरात कोरोनाचे 51 लाखांहून अधिक रुग्ण
अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगातली कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढून 51 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे.
संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण या देशांमध्ये आहे :
- अमेरिका - 15 लाखांपेक्षा जास्त
- रशिया - 3 लाख 17 हजारांपेक्षा जास्त
- ब्राझील - 3 लाख 10 हजारांपेक्षा जास्त
- ब्रिटन - 2 लाख 52 हजारांपेक्षा जास्त
- स्पेन - 2 लाख 33 हजारांपेक्षा जास्त
महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या महिन्यात 2 एप्रिलला सगळ्या जगातल्या कोव्हिड-19च्या रुग्णांची संख्या 10 लाख होती. ती आता 22 मे रोजी पाच पटींनी वाढून 51 लाखांच्याही पलिकडे गेलेली आहे.
अनेक देशांमध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी असल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या प्रत्यक्षात यापेक्षा अधिक असू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रेल्वे, विमानाने प्रवास करायचा असेल तर हे नियम पाळावे लागतील
IRCTC ने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या 200 गाड्यांच्या बुकिंगला सुरुवात केलेली आहे. 21 मे सकाळी दहा वाजल्यापासून या बुकिंगला सुरुवात झाली.
येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पण विमानात सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही, त्यामुळे सर्व सीट भरण्यात येतील.
पण हा रेल्वे किंवा विमान प्रवास नेहमीसारखा नसेल, त्यासाठी काही नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल. काय आहेत हे नियम? पाहा व्हीडिओ.
गेल्या 48 तासात 278 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग- महाराष्ट्र पोलिस
गेल्या 48 तासात 278 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिस दलात आतापर्यंत 1666 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 16 जणांचा मृत्यू झालाय.