You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

आत्मनिर्भर भारत: 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर

काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. चार राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचा नवा रुग्ण नाही

    मिझोरम, गोवा, मणिपूर तसंच अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

    आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

    मिझोरममध्ये कोरोनाचा एकमेव रुग्ण होता जो बरा झाला आहे.

    गोव्यामध्ये सातजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता हे सातहीजण बरे झाले आहेत.

    मणिपूरमध्ये दोनजणांना कोरोना झाला होता. या दोघांचीही प्रकृती आता चांगली आहे.

    अरुणाचल प्रदेशमध्ये एकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.

  2. न्यूझीलंडसाठी सुदिन; सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण नाही

    न्यूझीलंडमध्ये सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत कोरोनाेचे 1497 रुग्ण आढळले आहेत आणि यापैकी 15 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

    न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 21जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण हॉस्पिटलमध्ये असून कोणीही ICUमध्ये नाही.

    न्यूझीलंडचे पंतप्रधान जैकिंडा आरडर्न यांनी लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिटेल शॉप, सिनेमागृह, खेळांची मैदानं तसंच जिम उघडण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम नागरिकांसाठी लागू असतील.

  3. PM Cares Fundवरून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आमनेसामने

    कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी PM Cares Fund ची घोषणा केली आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याचं देशाला आवाहन केलं होतं.

    पण या नवीन फंडावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. PM National Relief Fund असताना आता या नवीन फंडाची खरंच गरज आहे का? आणि याचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

    काय आहे हे नेमकं प्रकरण? वाचा इथे

  4. कोरोना व्हायरस: महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 23,401

  5. वुहानमध्ये कोरोनाची दुसरी लाट?

    कोरोना विषाणूचं केंद्र असलेल्या चीनमधील वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी चीनमध्ये कोरोनाचे 17 नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी पाच वुहान शहरातील आहेत.

    वुहानमध्ये ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचं मानलं जात आहे.

    याबरोबरच चीनमधील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 82, 919 एवढी झाली आहे.

  6. 24 तासात देशभरात 87 मृत्यू; 3604 नवे रुग्ण

    गेल्या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 2293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

    देशातील कोरोना रुग्णांची संख्या 70756 इतकी झाली आहे. यापैकी 46008 अॅक्टिव्ह केसेस आहेत. 22454 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  7. रशियात कोरोनाचे 11656 नवे रुग्ण

    रशियात कोरोनाचे 11656 नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र याही परिस्थितीत लॉकडाऊन थोडं शिथिल होऊ शकतं असे संकेत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रशियात आतापर्यंत कोरोनाचे 221344 रुग्ण आहेत तर कोरोनामुळे आतापर्यंत 2000हून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

  8. देशभरात धावल्या साडेचारशे श्रमिक स्पेशल ट्रेन

    1 मे पासून देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी जाता यावं यासाठी 450 श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या. या ट्रेन्सच्या माध्यमातून 5 लाख स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतले आहेत अशी माहिती रेल्वेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आर.डी. बाजपेई यांनी सांगितलं.

  9. कोरोना हा छुपा शत्रू-ट्रंप

    कोरोना हा छुपा शत्रू आहे. शत्रू लपलेला आहे आणि हे आपण लक्षात ठेवायला हवं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यासंदर्भात ते म्हणाले, एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एक दिवसापूर्वीच त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

    दरम्यान व्हाईट हाऊस कर्मचाऱ्यांनी मास्क घालायला सुरुवात केली आहे.

    अमेरिकेत कोरोना संकटामुळे 3.3 कोटी नागरिक बेरोजगार झाले आहेत. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पुढच्या वर्षी परिस्थिती सुधारेल असा आशावाद ट्रंप यांनी व्यक्त केला.

    अमेरिकेत दरदिवशी एक लाख 50 हजार ते तीन लाख लोकांच्या कोरोना चाचण्या होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारपर्यंत अमेरिकेत 90 लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेत 13 लाख 37 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

    कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 80 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  10. कोरोना अपडेट्स

    नमस्कार मंडळी,

    सुप्रभात!

    घरीच आहात ना? घरीच थांबा, तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. कोरोनाबाबतचे राज्यातले, देशातले आणि आंतरराष्ट्रीय असे सगळे अपडेट्स तुम्हाला या पेजवर वाचायला मिळतील.

    जगभरात चाळीस लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 14 लाखहून अधिकजण बरे होऊन या आजारातून बाहेर पडले आहेत.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत कोरोनामुळे 282500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 1230 नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या 23,401 झाली आहे.

    गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे 4213 नवे रुग्ण आढळले. देशातील रुग्णांची एकूण संख्या 67,152 एवढी झाली आहे. यातील 44 हजार लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

    आजपासून राजधानी दिल्लीहून देशात विविध ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत.