You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 हजारांहून अधिक

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट 25.19 टक्के - आरोग्य मंत्रालय

    भारताच्या आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली.

    त्यांनी मांडलेले मुद्दे –

    1.मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांच्या स्थलांतराविषयी परवानगी देण्यात आली आहे. या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल. प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल. प्रवाशांची तपासणी करण्यात येईल.

    2.देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1718 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 33 हजार 50 झाली आहे.

    3.गेल्या 24 तासांत 67 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत देशात 1074 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

    4.देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 25.19 टक्के झाला आहे, आधी तो 13.06 टक्के होता.

    5.लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातील कोरोनाचा डबलिंग रेट जास्त होता, आता तो कमी झाला आहे. अनेक राज्यांमध्ये ही स्थिती दिसून आली.

  2. महाराष्ट्र सरकारची स्थलांतरितांविषयीची नियमावली जाहीर

    लॉकडाऊनमुळे राज्यासह राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

    याबाबतीत सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

    यामध्ये खालील निर्देश सांगितले आहेत :

    1.प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास, त्यावर सर्व प्रवाशांची नावं व इतर माहिती असणे गरजेचं. वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक. पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार.

    2.वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहनं जंतुनाशकांनी फवारलेली असावीत. वाहनात देखील सोशल डिन्सस्टिंग पाळणं गरजेचं. इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

    3.राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होणार. त्यानंतर संबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांना केंद्र शासनाचं आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याशी कायम संपर्क ठेवता येईल.

  3. 'उन्हाळ्याच्या दिवसांत मजूर बसमध्ये कसा प्रवास करतील?'

    लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यांत जवळपास 2 कोटी मजूर अडकले आहेत. केंद्र सरकारनं या मजूरांच्या स्थलांतरासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना योग्य नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात सलग 3 ते 4 दिवस हे मजूर बसमध्ये कसा प्रवास करतील? बसपेक्षाही ट्रेननं या मजुरांनी त्यांच्या गावी पोहोचवणं सोयीस्कर होईल, असं तेलंगणा सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री तलासानी श्रानिवास यादव यांनी म्हटलं आहे.

  4. 29 फेब्रुवारीनंतर दक्षिण कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

    29 फेब्रुवारीनंतर दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशात कोरोनामुळे 247 जणांचा मृत्यू झाला आणि एकूण 10 हजार 765 रुग्ण आढळले होते.

    29 फेब्रुवारीपूर्वी देशात कोरोनामुळे भीतीचं वातावरण होतं. दवाखाने पूर्णपणे भरले होते. आता मात्र इथले लोक बुद्ध जयंतीनिमित्त रोषणाईचा आनंद घेत आहेत. शहरातील बगीचे लोकांनी व्यापले आहेत, अनेक जण खेळाताना दिसून येत आहे.

    असं असलं तरी कोरोना व्हायरस परत येऊ नये, अशी भीती लोकांच्या मनात कायम आहे.

  5. आतापर्यंत दिवसभरात काय घडलं?

    1.देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारनं एक आदेश प्रसिद्ध केला आहे. पण, मजूरांना गावी पाठवण्यासाठी रेल्वे सोडल्या नाहीत तर मजुरांचे स्थलांतर शक्य होणार नाही असं महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

    2.चीन कोरोना व्हायरसची महामारी ज्या पद्धतीने हाताळत आहे, ते पाहता मी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू नये, असं चीनला वाटतं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

    3.जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 लाख 25 हजारांच्या पुढे गेली आहे.आतापर्यंत जगात सुमारे 31 लाख जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

    4.सरकारी आणि खासगी रुग्णालयांबाबत सरकारची नवी नियमावली जाहीर झाली आहे. त्यानुसार, मुंबई शहरातील अॅम्ब्युलन्सच्या वापराबाबत डिजास्टर सेल निर्णय घेईल. कोणत्याही रुग्णाला उपचार न देता आणि प्राथमिक तपासणी न करता परत पाठवता येणार नाही

    5.कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर देशासमोर आर्थिक संकट उभं राहणार आहे. यामध्ये बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं. कोरोना व्हायरसनंतर सरकारने शेती, उद्योग आणि व्यापारसंबंधित मोठे निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

    6.देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 1718 ने वाढली. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33050 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

  6. केंद्र सरकारनं मजूरांसाठी पॅकेजची घोषणा करावी – केरळचे अर्थमंत्री

    आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय मजुरांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. केंद्र सरकारनं या मजुरांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केरळचे अर्थमंत्री थॉमस इस्साक यांनी केली आहे.

  7. कोरोना लॉकडाऊन : अडकलेल्या सर्वांना लवकरच दिलासा – नवाब मलिक

  8. कोरोनाच्या आडून विरोधकांची गळचेपी करण्याचे सरकारचे प्रयत्न?

  9. बसने मजुरांचं स्थलांतर अशक्य, विशेष ट्रेन हवीच - नबाव मलिक

  10. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा स्वयंसेवी संस्थांशी संवाद

    केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकार अमिताभ कांत यांनी स्वयंसेवी संस्थांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

  11. कोरोना व्हायरसचा जन्म नेमका कुठे आणि कसा झाला?

  12. मी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू नये यासाठी चीन काहीही करेल – डोनाल्ड ट्रंप

    चीन कोरोना व्हायरसची महामारी ज्या पद्धतीने हाताळत आहे, ते पाहता मी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू नये, असं चीनला वाटतं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मला रोखण्यासाठी चीन काहीही करेल, याचा हा पुरावा आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.

    त्यांनी बुधवारी रॉयटर्स न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. कोरोना व्हायरसबाबत चीनने आणखी सक्रिय होणं गरजेचं होतं. त्यामुळे जगाला याचं गांभीर्य कळालं असतं, असंही डोनाल्ड ट्रंप म्हणाले.

  13. ब्रिटनने प्रसिद्ध केली नवी आकडेवारी

    ब्रिटनने कोरोना व्हायरसशी संबंधित नवी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं दिसून येतं. यानुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत 26 हजार 166 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूंच्या बाबतीत त्यांनी इटली आणि स्पेनला मागे टाकलं आहे.

  14. जगभरात 2 लाख 25 हजार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू

    जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 लाख 25 हजारांच्या पुढे गेली आहे.

    आतापर्यंत जगात सुमारे 31 लाख जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

  15. रेमडेसिविअर औषधाबाबत चीन आणि अमेरिकेचं मत वेगळं

    कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी महत्त्वाचं मानलं जात असलेल्या रेमडेसिविअर औषधाबाबत चीन आणि अमेरिकेचं वेगवेगळं मत आहे.

    अमेरिकेला हे औषध परिणामकारक ठरत असल्याचं वाटतं तर चीनला या औषधाचा लाभ दिसून येत नाही.

  16. कोरोना व्हायरस : लहान मुलांमध्ये विचित्र लक्षणं

    युरोप ते अमेरिकेपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. या दरम्यान कोरोना व्हायरसची लागण झालेल्या मुलांमध्ये विचित्र लक्षणं दिसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

    यामध्ये लहान मुलांच्या शरिरातील रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. ब्रिटनसह अमेरिका, फ्रान्स आदी देशांमध्ये अशी 100 प्रकरणं समोर आली आहेत.

  17. सरकारी आणि खासगी रुग्णालयांबाबत सरकारची नवी नियमावली

    मुंबई शहरातील अॅम्ब्युलन्सच्या वापराबाबत डिजास्टर सेल निर्णय घेईल

    कोणत्याही रुग्णाला उपचार न देता आणि प्राथमिक तपासणी न करता परत पाठवता येणार नाही

    रुग्णालयात आलेल्या प्रत्येकावर उपचार करावेच लागतील आरोग्यसेवा अधिकाऱ्यांनी स्क्रिनिंग, उपचार यासाठी प्रोटोकाॅल तयार करावा

    डिझास्टर विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक रुग्णाला युनिक आयडेटिटी नंबर द्यावा. याशिवाय अॅडमिशन देऊ नये.

    लक्षणं नसलेल्यांना कोव्हिड रुग्णालयात दाखल करू नये खासगी रुग्णालयांने (लक्षण नसलेल्यांना) होम क्वारेंन्टाईनबाबत काउंसिल करावं.

    केंद्राच्या गाईडलाइन्स पाळाव्यात, मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह वाॅर्डमधून ३० मिनिटांत बाहेर काढावा. 12 तासात मृतदेह योग्य पद्धतीने डिस्पोज (विल्हेवाट) करावा

  18. आरोग्य सेतू अॅपमुळे कोरोनाबद्दल माहिती मिळते, पण तुमचा डेटा सुरक्षित राहतो का?

  19. कोरोनानंतर शेती, उद्योग आणि व्यापारसंबंधित मोठे निर्णय घेण्याची गरज – शरद पवार

    कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर देशासमोर आर्थिक संकट उभं राहणार आहे. यामध्ये बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं. कोरोना व्हायरसनंतर सरकारने शेती, उद्योग आणि व्यापारसंबंधित मोठे निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

    महाराष्ट्र सरकारचं 2020-21 चं बजेट 3 लक्ष 47 हजार कोटींच्या आसपास आहे. पण 1 लक्ष 40 हजार कोटी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. एकूण उत्पन्नात 40 टक्के घट होणार आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारला पत्र लिहिल्याचं पवार यांनी सांगितलं.

    मुंबई-पुण्यात संख्या अधिक असली तरी घाबरण्याचं कारण नाही. ठराविक भागातच कोरोनाचा जास्त फैलाव झालेला आहे. महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत आहेत. स्थलांतरित मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी मोठे प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असं पवार म्हणाले.

    कोरोनाच्या प्रादुर्भावाची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागली आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पाश्चिमात्य देशातील प्रादुर्भाव गंभीर आहे, असं पवार म्हणाले.

  20. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फेसबूकद्वारे जनतेशी संवाद