You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच
महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.
लाईव्ह कव्हरेज
वरळीतून आदित्य ठाकरे आघाडीवर
वरळीतून आदित्य ठाकरे सध्या आघाडीवर आहेत.
आदित्य हे निवडणूक लढवणारे पहिलेच ठाकरे आहेत. शिवसेनेने त्यांना "पुढचे मुख्यमंत्री" म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी उमेदवारीच्या वेळी भरलेल्या अर्जात 6.5 लाखांची BMW गाडी असल्याचं जाहीर केल्यावर बरीच चर्चा झाली होती.
महायुती 200 पार करणारच : गिरीश महाजन
शिवसेनेच्या जागा निवडून येणारच, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की "कोणाच्या किती जागा निवडून येतात, याला महत्त्व नाही. आमच्या महायुतीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येणार हे निश्चित."
शिवसेना आणि भाजप हे दोन वेगळे आहेत. त्यांची धोरणं वेगळी आहेत, जाहिरनामेही वेगळे होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर आमचं एकमत असेल असं नाही.
विरोधात बसून काही होणार नाही : गिरीश महाजन
“सत्तेमध्ये जी कामं होतील, ती विरोधात बसून होणार नाहीत, याची लोकांना खात्री आहे. हे आता लहान मुलांनाही कळालं आहे. त्यामुळे विरोधात बसून करायचं काय असाही एक मतप्रवाह आहे. उदयनराजे मताधिक्याने निवडून येतील,” असं गिरीश महाजन म्हणाले.
मतमोजणीला सुरुवात - पाहा विश्लेषण लाईव्ह
पाहा निवडणूक निकालांचं विश्लेषण - लाईव्ह शो इथे
भाजप आतापासूनच सज्ज, भाजप कार्यालयाची सजावट
मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालय असं सजलं आहे. आकाशदिवे तसंच केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांची पोस्टर्सही लावलेली दिसत आहेत.
भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही : संजय राऊत
"राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करू शकत नाहीत, असं शिवसेनेचे नेेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.
“मी गुळगुळीत बोलत नाही. मी अनेक वर्षं शिवसेनेत आहे. शिवसेनेचं काम करत आहे. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे, त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही. शिवसेना पुढील सत्तेतही राहील.
"कुणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्य नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
ही बातमी 'दिव्य मराठी'ने दिली आहे.
येत्या विधानसभेत नसेन याची खंत : एकनाथ खडसे
"मला नव्या विधानसभेत जाता आलं असतं तर आनंद वाटला असता. येत्या विधानसभेत मी नसेन याची मला आयुष्यभर खंत राहील," हे शब्द आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे.
"आजवर विधानसभेत मी माझ्या राजकीय जीवनातील मोठा काळ विरोधीपक्षाचा आमदार म्हणून घालवला आहे. आजवर मी जनतेच्या विविध प्रश्नांवर सभागृहात आक्रमकपणे प्रश्न मांडले आहेत, अशा प्रकारे माझ्यासाठी विधानसभा जवळची राहिली आहे. आक्रमकपणे प्रश्न मांडताना मला सभागृहातून निलंबित करण्यात आले होते, तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनीही माझ्या या आक्रमकपणाचे कौतुक केलं होतं," अशी आठवणही खडसेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली.
"मी नव्या सभागृहात नसल्याची खंत वाटत असली तरी नवे लोक इथे येतील याचा आनंदच आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
याआधी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी आपण नाराज असल्याचं मान्य केलं होतं. इतकंच नाही तर पक्षाचा निर्णय नाईलाजाने मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट दिलेलं नाही. भाजपने त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी यांना जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
सुप्रभातम्!
बीबीसीच्या निकाल लाईव्ह कव्हरेजमध्ये तुमचं स्वागत :)
आज महाराष्ट्राने कुणाला कौल दिलाय, हे कळणार. तुम्हाला उत्सुकता आहे आणि आम्हीही सज्ज.
तुम्ही बीबीसी मराठीचं संपूर्णतः डिजिटल कव्हरेज पाहू शकाल थेट तुमच्या फोनवर.
- यूट्यूब
- फेसबुक
- ट्विटर
एक्झिट पोलमध्ये महायुतीचा बोलबाला
वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये महायुती जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.