'रोहित वेमुलाची आत्महत्या जातिभेदामुळे झाली नाही,' पोलिसांच्या अहवालात काय म्हटलं?
हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी राहिलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अंतिम अहवाल दाखल केला आहे.
पोलिसांनी हे प्रकरण बंद करताना सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, रोहितला त्याची खरी जात लोकांना कळेल याची 'भीती' सतावत होती आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली. रोहित वेमुलाने 17 जानेवारी 2016ला आत्महत्या केली होती. तेलंगणा पोलिसांनी या अहवालात अनेक राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली आहे.
या प्रमुख लोकांमध्ये सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन रामचंद्र राव, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावांचा समावेश आहे. स्मृती इराणी त्या वेळी मानव संसाधन आणि विकास मंत्री होत्या. अभाविपच्या अनेक सदस्यांनाही क्लीन चिट देण्यात आली आहे.
पोलिसांना त्यांच्या तपासात असे आढळून आले आहे की, रोहित वेमुला अनुसूचित जातीचा नसल्यामुळे त्याच्या खऱ्या जातीचे सत्य बाहेर येण्याची भीती होती.
पोलिसांनी आपला अहवाल तेलंगणा उच्च न्यायालयात सादर केला असून रोहितला त्याच्या आईला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याचे माहीत होते. या प्रमाणपत्राद्वारे रोहित वेमुलाने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत प्रगती केल्याचे पोलिसांनी आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वेमुलाला भीती वाटत होती की जर आपल्या जातीबद्दल सत्य बाहेर आले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या आत्महत्येनंतर देशभरातील विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू झाली. रोहित वेमुला आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेचा सदस्य होता.
भाजपाच्या प्रवक्त्या रचना रेड्डी म्हणतात, "तेलंगणाच्या गृह मंत्रालयानं 2016 च्या रोहित वेमुला आत्महत्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या वादग्रस्त प्रकरणासंदर्भात अंतिम अहवाल सादर केला आहे.
व्यवस्थापनाच्या धोरणामुळे दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करावी लागल्याबद्दल हैदराबाद सेंट्रल विद्यापीठात आगडोंब उसळला होता आणि निदर्शनं झाली होती...या प्रकरणातील तपासात भाजपाचे मातब्बर नेत्यांवर आरोप होता. मात्र पोलिसांनी मार्च महिन्यात सादर केलेल्या विस्तृत अंतिम अहवालात म्हटलं आहे की या प्रकरणात अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं (एससी-एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रोसिटिज अॅक्ट) उल्लंघन झाल्याचं आढळून आलं नाही.
रोहित वेमुला याची आत्महत्या दुर्दैवी होती. मात्र यात आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचं दिसून येत नाही, असं या अहवालात म्हटलं आहे आणि तपास थांबवण्यात आला आहे..."