You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

इस्रायल-हमास संघर्षाच्या युद्धविरामाची चर्चा कुठपर्यंत आली?

5 मे च्या बातम्या आणि चालू घडामोडी

थोडक्यात

  • गाझात बंदी असलेल्या इस्रायली नागरिकांसाठी इस्रायलमध्ये आंदोलन
  • इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या युद्धविरामाबाबत इजिप्तमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.
  • राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे.

लाईव्ह कव्हरेज

नितीन आणि तुषार

  1. इस्रायल सरकारनं 'अल-जझीरा' चॅनेलवर आणली बंदी

    इस्रायलमध्ये अल-जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी घालण्यात आलीय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, इस्रायलमध्ये अल-जझीराचं प्रक्षेपण होणार नाही.

    अल-जझीराने इस्रायलच्या या निर्णयाला 'गुन्हेगारी' पाऊल म्हटलंय.

    अल-जझीरा चॅनेलच्या व्यवस्थापकांनी इस्रायली सरकारचं हे पाऊल धोकादायक असल्याचं म्हणत, अल-जझीरा नेटवर्कची टीम कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठीची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

    इस्रायल सरकारच्या मंत्रिमंडळाने अल-जझीरा टीव्ही नेटवर्कवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. अल-जझीरा चॅनेल इस्रायलच्या 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' असल्याचं सरकारनं म्हटलंय.

    इस्रायलच्या निर्बंधांनुसार, इस्रायलमधील अल-जझीराची कार्यालये बंद केली जातील, प्रसारण उपकरणे जप्त केली जातील आणि चॅनेल उपग्रह आणि केबल कंपन्यांकडून कापले जातील. याशिवाय, अल जझीरा वाहिनीच्या वेबसाईटवरही देशात बंदी घालण्यात येणार आहे.

    इस्रायल सरकारने अल-जझीरावर 'इस्रायलविरोधी' असल्याचा आरोप आधीही केला आहे.

    अल-जझीरा वाहिनीमध्ये कतार सरकारचाही हिस्सा आहे. गाझामध्ये ओलीस असलेल्या इस्रायलींच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या चर्चेत कतार महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

    चार इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार राहिलेले माजी इस्रायली मुत्सद्दी एलॉन पिनकास यांनी बीबीसीशी बोलताना इस्रायली सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय. ते म्हणाले, "अल-जझीरावर चुकीच्या वेळी बंदी घालण्यात आलीय. हे निर्बंध अल-जझीराला वृत्तांकन करण्यापासून थांबवू शकत नाहीत."

  2. ब्राझिलच्या दक्षिण भागात अतिवृष्टी, धरण फुटल्यानं पूर

    ब्राझिलच्या दक्षिण भागात अतिवृष्टी आणि आणि धरण फुटल्यानं पूर आला आहे. रिओ ग्रांदे दो सुल या राज्यातल्या निम्म्या शहरांना या पुराचा फटका बसला. हे राज्य आकारानं साधारण महाराष्ट्रापेक्षा थोडंसं लहान आहे.

    गेलेे काही दिवस इथे मुसळधार पाऊस पडत होता. गुरुवारी इथलं एक धरण कोसळल्यानं संकटात आणखी भर पडली. ब्राझिलच्या या भागात अनेक गावा शहरांमध्ये पाणी साचलं असून भूस्खलनही झालं आहेे. त्यात किमान 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

    रिओ ग्रांदे राज्यातला एक पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला, ती दृश्यं कॅमेेऱ्यात कैद झाली.

    एल निनोच्या प्रभावामुळे ब्राझिलमध्ये सध्या एवढा पाऊस पडत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात. पॅसिफिक महासागरातला एल निनो आता मागे हटतो आहे.

  3. 'मी कधीही डोपिंग टेस्टसाठी नकार दिला नव्हता'- बजरंग पुनिया

    मी कधीही नाडाच्या अधिकाऱ्यांना डोपिंग टेस्टसाठी नमुना देण्यासाठी कधीही नकार दिला नाही, असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे.

    बजरंग पुनियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं आहे की, “माझ्यासंबंधी डोपिंग टेस्ट बद्दल जी बातमी येत आहे, त्याविषयी मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मी कधीही नाडाच्या अधिकाऱ्यांना सँपल द्यायला नकार दिला नाही.”

    बजरंग पुनियाने एक जुना व्हीडिओ शेअर करत म्हटल की, “मी त्यांना विनंती केली की पहिल्यांदा माझं सँपल घेण्यासाठी ते जे एक्सपायरी किट घेऊन आले होते त्यावर उत्तर द्यावं. त्यावर त्यांनी कोणती कारवाई केली, काय पावलं उचलली हे सांगावं.”

    “आधी या गोष्टीचं उत्तर द्यावं आणि मग माझी डोपिंग टेस्ट घ्यावी. माझी वकील विदुष सिंघानिया त्यांच्या पत्राला योग्यवेळी उत्तर देतील.

    बजरंग पुनियाने नाडाच्या अधिकाऱ्यांना सँपल द्यायल नकार दिला, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, अशा आशयाचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाली आहेत.

    या वृत्तांमध्ये बजरंग पुनियाला निलंबनाच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी 7 मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

    बजरंग पुनियाने 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

    भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधाती महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात बजरंग पुनियाही सहभागी झाला होता.

  4. सोने तस्करीच्या आरोपानंतर अफगाण वाणिज्यदूत झाकिया यांचा राजीनामा

    25 किलो अवैध सोने आणण्यात कथितरित्या सहभागी झाल्याच्या आरोपानंतर अफिगाणिस्तानच्या कॉन्सल जनरल (वाणिज्यदूत) झाकिया वरदाक यांनी राजीनामा दिला आहे.

    गेल्या महिन्यात झाकिया यांना 25 किलो सोने दुबईतून मुंबई विमानतळावर अवैधरित्या आणल्या प्रकरणी पकडण्यात आले, पण दूतावासातील कर्मचाऱ्यांचे विशेषाधिकार पाहता त्यांना अटक करण्यात आली नाही. झाकिया यांनी मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

    "सार्वजनिक जीवनात माझ्यावर कुणी टीका करत असेल तर त्यासाठी मी तयार आहे परंतु माझ्या आप्तांना आणि नातेवाईकांना याचा त्रास भोगावा लागत असेल तर ते दुर्दैवी आहे, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे," असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

    भारताने आपल्याला दिलेला पाहुणचार आणि वागणूक याबद्दल आपण आभारी आहोत असं देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.

  5. अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही इराण कच्चे तेल विकून कसं कमावतोय अब्जावधी डॉलर?

  6. गाझात बंदी असलेल्या इस्रायली नागरिकांसाठी इस्रायलमध्ये आंदोलन

    गाझात बंदी असलेल्या इस्रायली नागरिकांसाठी इस्रायलमध्ये शनिवारी रात्री मोर्चे निघाले. आपल्या फायद्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी हे युद्ध सुरू ठेवले असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केल्या आहे.

    युद्ध नाही तर जीवन आवश्यक आहे असा नारा आंदोलकांनी यावेळी दिला. इजिप्तच्या काहिरा या ठिकाणी युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले.

    इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीने शनिवारीपासून वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. या वाटाघाटींमध्ये हमासचे उच्चपदस्थही सहभागी झाले आहेत.

    शनिवारच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर रविवारी वाटाघाटी सुरू आहेत. ओलीस असलेल्या नागरिकांना सोडण्याच्या बदल्यात 40 दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव इस्रायलने दिला आहे. इस्रायलच्या कैदेत असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याचा प्रस्तावदेखील इस्रायलनी दिला आहे.

  7. गाझामध्ये शस्त्रसंधीसाठी इजिप्तमध्ये सुरू असलेली शांतता चर्चा कुठपर्यंत पोहोचली?

    गाझामधील इस्रायलच्या बंदींची सुटका आणि शस्त्रसंधीसाठी इजिप्तची राजधानी काहिरामध्ये सुरू असलेली शांतता चर्चा रविवारीही सुरू राहणार आहे.

    ''शनिवारी यावर काहीही एकमत होऊ शकलं नाही, त्यामुळं रविवारी आणखी एका टप्प्यातील चर्चा सुरू राहील," असं हमासच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

    गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध बंद करण्याचा उल्लेख नसेल तर असा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असं हमासचे आणखी एक अधिकारी म्हणाले.

    त्याचवेळी इस्रायलच्या सरकारनं एकमत झालं किंवा नाही झालं तरी राफाहवर आक्रमण करण्याच्या दिशेनं पावलं उचलणार असल्याचं आधीच म्हटलं आहे.

    इस्रायलनं दक्षिण गाझाच्या राफाह शहरावर हल्ल्याची योजना आखली आहे. राफाहमध्ये शरण घेतलेले 12 लाखांहून अधिक पॅलिस्टिनी आहेत.

    इस्रायलच्या हल्ल्यांमुळं गाझामध्ये 34 हजारांहून अधिक पॅलिस्टिनींनी प्राण गमावला आहे.

    नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपले स्वागत आहे.