You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवन्नांना अटक

आजच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या. राज्यातील बातम्या आणि लोकसभा निवडणुकीसंबंधीचे अपडेट्सही तुम्ही इथे वाचू शकता.

थोडक्यात

  • कर्नाटकामध्ये कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणी जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवण्णा यांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.
  • राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर अमेठीतून काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
  • तुर्कीने इस्रायलबरोबर सर्व प्रकारच्या व्यापारांवर बंदी घातली आहे.
  • काँग्रेसकडून अद्याप अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवारांची घोषणा नाही. दोन्ही ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस.
  • आयपीएल 17 च्या 50व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सला एका रननं पराभूत केलं.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने, ओंकार करंबेळकर

  1. रोहित वेमुला : क्लोजर रिपोर्टमध्ये असं काय म्हटलंय, ज्यामुळे उपस्थित होतायत प्रश्न

  2. जम्मू आणि काश्मीर: पूंछमध्ये वायु सेनेच्या ताफ्यावर हल्ला

    सर्च ऑपरेशन सुरू भारतीय वायु सेनेच्या एका काफिल्यावर जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात हल्ला झाला आहे.

    भारतीय हवाई दलाने हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला शाहसितार भागाजवळ झाला आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार लष्कराची स्थानिक तुकडीने या भागात शोध मोहिम हाती घेतली आहे.

    वायू सेनेने सांगितलं की काफिला सुरक्षित आहे आणि तपास सुरू झाला आहे. या हल्ल्यात कोणी जखमी झालं की नाही याची माहिती मात्र हवाई दलाने दिलेली नाही.

  3. कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणी प्रज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवन्नांना अटक

    कर्नाटकामध्ये कथित अश्लील व्हीडिओ प्रकरणी जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांचे वडील एचडी रेवण्णा यांना एसआयटीने ताब्यात घेतलं आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एचडी रेवन्ना यांना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

    न्यायालयाने रेवन्ना यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

    गुरुवारी एका पीडित महिलेच्या मुलाने एचडी रेवन्ना आणि त्याच्या साथीदारांविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

    रेवन्ना यांनी कथितरित्या ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं, त्यामध्ये ही महिला देखील होती.

    एचडी रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहे. सध्या ते आमदार आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पोलिसांना हुनसूर इथे सापडली होती. पोलिस तेव्हापासून माहिती घेत होते.

    याच दरम्यान पोलिसांनी अपहरण प्रकरणात रेवन्ना यांचे सहकारी सतीश बाबू उर्फ सतीश बाबन्ना यांना अटक केली. बाबन्ना यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  4. सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय?

  5. रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी क्लोजर रिपोर्टवरून वादंग, पुन्हा चौकशीचं पोलिसांचं आश्वासन

  6. प्रियंका गांधी : पंतप्रधान मोदी माझ्या भावाला 'युवराज' म्हणतात, मला सांगायचं आहे की...

    पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख 'युवराज' असा केल्यावर कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    गुजरातमध्ये एका प्रचार सभेत बोलताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना म्हटलं, "पंतप्रधान मोदी माझ्या भावाला 'युवराज' म्हणतात. मला सांगायचं आहे की माझा भाऊ 4,000 किलोमीटर पायी चालला, देशातील लोकांना भेटला आणि त्यांना विचारलं की त्यांच्या आयुष्यातील अडचणी काय आहेत?"

    "नरेंद्र मोदी राजाप्रमाणे महालात राहतात. त्यांना शेतकरी, महिला यांच्या अडचणी कशा समजणार?"

    प्रियंका गांधी यांनी पुढे म्हटलं की, "नरेंद्र मोदी सत्तेच्या गराड्यात आहेत. त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना घाबरतात. त्यांना कोणीही काहीही सांगत नाही. जर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तो आवाज दाबला जातो."

    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी (3 मे) म्हटलं होतं की, "मी आधीच खात्रीपूर्वक सांगितलं होतं की पराभवाच्या भीतीनं युवराज दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घेत आहेत."

  7. किनारी राज्यांना उधाणाच्या भरतीचा इशारा

    4 आणि 5 मे 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोव्यासह किनारी भागात समुद्राला उधाण येऊन भरतीच्या मोठ्या लाटा येऊ शकतात असा इशारा नॅशनल सेंटर फॅार ओशन इन्फॅार्मेशन सर्व्हिसेस या संस्थेनं दिला आहे.

    या काळात 0.5 ते 1.5 मीटरपर्यंत लाटा उसळू शकतात असं INCOIS नं म्हटलं आहे. त्यामुळे विशेषतः भरतीच्या वेळेत समुद्रावर जाऊ नये असंही या अलर्टमध्ये म्हटलं आहे.

    शक्यतो या काळात किनाऱ्यावर जाऊ नये, किनाऱ्याजवळ सखल भागात मासेमारी करणाऱ्यांनी लाटांवर लक्ष ठेवावे, किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटींची टक्कर होऊ नये यासाठी एकमेकांपासून त्या दूर बांधाव्यात असंही या अलर्टमध्ये म्हटलं आहे. 4 मेच्या पहाटेपासून 5 मे रोजी रात्री 11:30 पर्यंत हा इशारा दिला आहे.

  8. काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंतींनी पक्षाला तिकीट परत केलं

    काँग्रेस नेत्या सुचरिता मोहंती यांनी पुरी लोकसभेचं तिकीट परत केल्याचा दावा केलाय.

    ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट आपण परत केल्याचा दावा काँग्रेस नेत्या सुचरिता मोहंती यांनी केला आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सुचरिता मोहंती म्हणाल्या की, पक्षाने मला तिकीट दिलं खरं पण पक्ष मला निधी देऊ शकत नसल्याने मी तिकीट परत केलं आहे. दुसरं कारण असं की माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभेच्या जागांवर विजय मिळवतील अशा उमेदवारांऐवजी इतरांना तिकिटं देण्यात आली आहेत.

    या दोन परिस्थितीत प्रचार करणं माझ्यासाठी कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. "पक्षाकडून काही सकारात्मक संकेत मिळाले असते तर मी माझे तिकीट परत केले नसते. मला स्वतःचा निधी उभारावा लागेल आणि मला निधी दिला जाणार नाही, असं सांगण्यात आलं."

    पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर संबित पात्रा निवडणूक लढवत आहेत. पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 मे आहे ओडिशातील पुरी लोकसभा जागेसाठी सहाव्या टप्प्यात म्हणजेच 25 मे रोजी मतदान होणार आहे.

  9. रोहितला न्याय देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय- राजा वेमुला

    रोहित वेमुलाचा भाऊ राजा वेमुला म्हणाला, "क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर तेलंगण डीजीपी यांनी ही पुन्हा चौकशी करणार असल्याचं आणि ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलंय. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी रोहित वेमुलाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शी चौकशीचे आश्वासन दिले आहे. आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस सरकार या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल."

  10. रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत तेलंगण पोलिसांचं निवेदन

    रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत तेलंगण पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

    तेलंगण पोलिसांचे डीजीपी म्हणाले की, या प्रकरणात आधी मिळालेल्या क्लोजर रिपोर्टवरच पुढील तपास केला जाईल.

    पूर्वी केलेल्या तपासावर रोहित वेमुलाची आई आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे तेलंगण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या ज्यात असं म्हटलं होतं की, तेलंगण पोलिसांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी जो क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे त्यातील सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे.

    क्लोजर रिपोर्टनुसार, तेलंगण पोलिसांनी केलेल्या तपासात रोहित वेमुला हा दलित नसून त्याच्या आईने बनावट प्रमाणपत्र बनवले होते. आता या क्लोजर रिपोर्टवर तेलंगणा पोलिसांचं निवेदन सादर करण्यात आलं आहे. डी

    जीपी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, "रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत अनेक बातम्या प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियावर फिरत आहेत."

    "ज्या अहवालाचा संदर्भ दिला जातोय तो 2018 मध्ये तयार करण्यात आला होता आणि 21 मार्च 2024 रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला होता."

    निवेदनात म्हटलंय की, "जो तपास झालाय त्यावर रोहितच्या आईने प्रश्न उपस्थित केले आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करू." "तपास पुढे नेण्यासाठी संबंधित न्यायालयात याचिका दाखल करून परवानगी घेतली जाईल."

  11. अमेरिकेतील विद्यापीठात गाझा समर्थनार्थ निदर्शनं होत आहेत. देशात निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यानिमित्ताने राज्यभर आणि देशभरात नेत्यांच्या सभा होताना दिसत आहेत.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या सर्व बातम्यांच्या ताज्या अपडेटस तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पानावर वाचायला मिळतील.