इस्रायल सरकारनं 'अल-जझीरा' चॅनेलवर आणली बंदी
इस्रायलमध्ये अल-जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी घालण्यात आलीय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, इस्रायलमध्ये अल-जझीराचं प्रक्षेपण होणार नाही.
अल-जझीराने इस्रायलच्या या निर्णयाला 'गुन्हेगारी' पाऊल म्हटलंय.
अल-जझीरा चॅनेलच्या व्यवस्थापकांनी इस्रायली सरकारचं हे पाऊल धोकादायक असल्याचं म्हणत, अल-जझीरा नेटवर्कची टीम कायदेशीररित्या उत्तर देण्यासाठीची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
इस्रायल सरकारच्या मंत्रिमंडळाने अल-जझीरा टीव्ही नेटवर्कवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. अल-जझीरा चॅनेल इस्रायलच्या 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका' असल्याचं सरकारनं म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलच्या निर्बंधांनुसार, इस्रायलमधील अल-जझीराची कार्यालये बंद केली जातील, प्रसारण उपकरणे जप्त केली जातील आणि चॅनेल उपग्रह आणि केबल कंपन्यांकडून कापले जातील. याशिवाय, अल जझीरा वाहिनीच्या वेबसाईटवरही देशात बंदी घालण्यात येणार आहे.
इस्रायल सरकारने अल-जझीरावर 'इस्रायलविरोधी' असल्याचा आरोप आधीही केला आहे.
अल-जझीरा वाहिनीमध्ये कतार सरकारचाही हिस्सा आहे. गाझामध्ये ओलीस असलेल्या इस्रायलींच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या चर्चेत कतार महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
चार इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार राहिलेले माजी इस्रायली मुत्सद्दी एलॉन पिनकास यांनी बीबीसीशी बोलताना इस्रायली सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय. ते म्हणाले, "अल-जझीरावर चुकीच्या वेळी बंदी घालण्यात आलीय. हे निर्बंध अल-जझीराला वृत्तांकन करण्यापासून थांबवू शकत नाहीत."




