शी जिनपिंग यांनी असं काय केलं की त्यांना चीनमध्ये कुणीच आव्हान देऊ शकत नाही?

    • Author, ग्रेस त्सोई आणि सिल्विया चँग
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शी जिनपिंग हे गेल्या काही दशकांमधील सर्वाधिक खंबीर चिनी नेते बनतील, असं फार कमी जणांना वाटलं होतं. पण ते आता सत्तेची ऐतिहासिक तिसरी टर्म मिळवण्यासाठी तयार आहेत.

एका दशकापूर्वी जिनपिंग यांच्याबद्दल फारसे माहिती नव्हते. ते 'राजपुत्र' आहेत, याव्यतिरिक्त फारशी कुणाला माहिती नव्हती. जिनपिंग यांचे वडील देशाच्या क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते.

यामुळे जिनपिंग यांना पक्षातील ज्येष्ठांचा पाठिंबा मिळवण्यास मदत झाली. हेच त्यांना चीनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) सत्तेवर येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं.

बोस्टन विद्यापीठातील राजकीय तज्ज्ञ जोसेफ फ्यूस्मिथ म्हणाले, "त्यांच्या या पदोन्नतीपूर्वी शी जिनपिंग हे सर्वांशी तडजोड करू शकणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते."

पण, आता 10 वर्षांनंतर जिनपिंग यांची अधिकारशाही एकहाती असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांची शक्तीही अतुलनीय आहे. पण हे कसं घडलं?

बॅरल ऑफ गन

कम्युनिस्ट चीनचे संस्थापक माओ झेडाँग यांनी एकदा म्हटलं होतं की, "क्रांतीचा जन्म बंदुकीच्या नळीतून होतो."

1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेनंतर पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) देश नाही तर पक्ष नियंत्रणात ठेवेल, असं माओ यांनी सुनिश्चित केलं. तेव्हापासून मग सीसीपीचा नेताच केंद्रीय सैन्य आयोगाचा (सीएमसी) अध्यक्ष देखील असतो.

जिनपिंग हे त्यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष हु जिन्ताओ यांच्यापेक्षा अधिक नशीबवान आहेत, कारण त्यांना तात्काळ सीएमसीचं अध्यक्षपद मिळालं. त्यामुळे त्यांनी सशस्त्र दलांमधील विरोध मोडून काढण्यात वेळ वाया घालवला नाही.

सर्वांत धक्कादायक घटना 2014 -2015 मध्ये समोर आली, जेव्हा सीएमसीचे माजी उपाध्यक्ष शु केहाऊ आणि माजी पीएलए जनरल गुओ बॉक्सिओंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

"जेव्हा कुऱ्हाड पडली तेव्हा ते आधीच निवृत्त झाले होते, पण त्यांना लक्ष्य करण्याच्या जिनपिंग यांच्या क्षमतेमुळे पीएलएमधील माजी चीनी नेते जियांग झेमिन यांचा प्रभाव कमी झाला," पेंटागॉन-अनुदानित नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीचे ज्येष्ठ फेलो जोएल वुथनो सांगतात.

"या गोष्टीनं सध्याच्या लष्करी सेवेत कार्यरत अधिकार्‍यांना एक शक्तिशाली संदेश पाठवला की, जिनपिंग यांच्या नियंत्रणास विरोध करणारा कुणीही परिमाण भोगल्याशिवाय राहणार नाही," वुथोन पुढे सांगतात.

2015 मध्ये जिनपिंग यांनी सैन्याच्या संरचनेत बदल केले. त्यांनी चार लष्करी मुख्यालयं यात कर्मचारी, राजकारण, रसद आणि शस्त्रास्त्रं रद्दबातल केली आणि त्यांच्या जागी 15 लहान एजन्सी आणल्या.

नवीन रचनेमुळे सीएमसीला थेट लष्कराच्या विविध शाखांना आदेश जारी करण्याची परवानगी मिळाली.

यानुसार, लष्कराच्या आर्थिक लेखा समितीलाही त्यांचा अहवाल थेट सीएमसीला सादर करावा लागेल, वुथनो सांगतात.

या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच बाबीचा आग्रह करण्यात आला आहे तो म्हणजे जिनपिंग यांच्यावर संपूर्ण निष्ठा ठेवणे.

गेल्या महिन्यात देशाचं अधिकृत लष्करी वृत्तपत्र पीपल्स लिबरेशन आर्मी डेलीनं एक लेख प्रकाशित केला.

त्यात आता सीएमसीच्याच हातात एकंदरीत कमांड असेल, यावर भर देण्यात आला होता.

यूएस थिंक टँक रँड कॉर्पोरेशनचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय संरक्षण संशोधक टिमथी हीथ सांगतात, "सैन्यात विकसित होऊन आणि ज्येष्ठ पीएलए नेत्यांबद्दल एकनिष्ठ राहून कधीतरी जिनपिंग यांना विरोध करतील, अशा कोणत्याही प्रवृत्तीला रोखण्यासाठीचा हा संदेश आहे."

"पक्षाशी निष्ठा म्हणजे पक्षाला आणि विशेषतः जिनपिंग यांना सत्तेत ठेवण्यासाठी पीएलएनं सर्व आदेशांची अंमलबजावणी करणं इथं अपेक्षित आहे," ते पुढे सांगतात.

निष्ठा प्रथम

'बॅरल ऑफ गन' सुरक्षित केल्यानंतर अंतर्गत सुरक्षा उपकरण म्हणजेच चाकू संपूर्ण नियंत्रणात आणणं आवश्यक असतं.

जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांनी माजी देशांतर्गत सुरक्षा प्रमुख झोउ योंगकांग यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.

झोउंचे जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी असलेले आणखी एक 'राजपुत्र' बो झिलाई यांच्याशी जवळचे संबंध होते.

पॉलिटब्युरो स्थायी समिती जी देशाची सर्वांत शक्तिशाली निर्णय घेणारी यंत्रणा आहे, या यंत्रणेतील सदस्य गुन्हेगारी शिक्षेस पात्र होत नाही, या अघोषित नियमास यामुळे तडा गेला.

युरेशिया ग्रुपचे ज्येष्ठ चीनी विश्लेषक नील थॉमस सांगतात, "शी जिनपिंग हे एक हुशार राजकारणी ठरले ज्यांनी संयमानं या व्यवस्थेत राज्य करण्यासाठी आपलं धोरण ठरवलं आणि ते तसं अमंलात आणण्यासाठी एक एक पाऊल टाकलं."

"जिनपिंग यांच्या उदयाला पाठिंबा देणारे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आता कदाचित त्यांचा सत्ता बळकावण्याचा वेग आणि प्रमाण पाहून आश्चर्यचकित झाले असतील," थॉमस पुढे सांगतात.

राजकीय निरीक्षकांच्या मते, जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा उपयोग त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि पक्षांतर्गत विरोधी गटांना दूर सारण्यासाठी देखील केला जात आहे.

गेल्या दशकात भ्रष्टाचार विरोधी पथकानं 47 लाखांहून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

"गेल्या दोन वर्षांमध्ये जिनपिंग यांनी अनेक सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेतून मुक्त केलं," असं सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे राजकीय शास्त्रज्ञ व्हिक्टर शीह सांगतात.

"आता सुरक्षा एजन्सी जवळजवळ केवळ अशा अधिकार्‍यांकडून चालवल्या जातात ज्यांचा जिनपिंग यांच्याशी भूतकाळात संबंध आला आहे आणि ज्यांचा जिंनपिंग यांच्यावर विश्वास आहे," व्हिक्टर पुढे सांगतात.

जिनपिंग यांनी बीजिंग, शांघाय आणि चोंगकिंग या महत्त्वाच्या शहरांतील पक्ष सचिवपदासारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक पदांवर त्यांच्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे.

"ही पदे महत्त्वाची आहेत कारण या भागात लाखो नागरिक राहतात आणि तिथं केंद्रीय निर्देशांचं स्पष्टीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ही पदं जबाबदार आहेत", थॉमस सांगतात.

31 प्रांतीय स्तरावरील पक्ष सचिवांपैकी किमान 24 हे जिपनिंग यांचे एकतर राजकीय सहकारी आहेत किंवा कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत किंवा त्यांनी जिनपिंग यांच्याबरोबर काम केलेय किंवा त्यांच्या जवळच्या मित्रांपैकी एकासाठी काम केलंय, थॉमस सांगतात.

दरम्यान, प्रांतीय स्थायी समित्यांमधील 281 स्थायी समिती सदस्यांपैकी जवळपास सर्व सदस्यांना जिनपिंग यांनी पदोन्नती दिली, असं कॅनडातील व्हिक्टोरिया विद्यापीठातील राजकारणाचे प्राध्यापक वू गुओगुआंग यांनी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार दिसून येतं.

वैयक्तिक ठसा

2018 मध्ये 'नवीन युगासाठी चायनीज वैशिष्ट्यांसहितच्या समाजवादावर शी जिनपिंग यांचा विचार' चीनच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला.

हे केवळ राज्यघटनेतील एक परिषिष्ठ नसून जिनपिंग यांच्या नावावर असलेली विचारधारा आणि त्यांचा वारसा दृढ करणारी गोष्ट होती.

जिनपिंग यांच्या आधी केवळ माओ यांनी हे साध्य केलं होतं. चीनच्या आधुनिकीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेंग झियाओपिंग यांच्याकडेही त्यांच्या नावाखाली फक्त एक 'सिद्धांत' होता, तर जिनपिंग यांचे पूर्वसुरी जियांग झेमिन आणि हू जिन्ताओ यांनी त्यांच्या नावांशी कोणताही विचार किंवा सिद्धांत जोडलेला नव्हता.

जिनपिंग यांच्या विचारांचा नेमका अर्थ काय, हा चर्चेचा विषय आहे. पण, इथं मुद्दा तो नसून ही सत्तेसाठीची चाल आहे, असं विश्लेषक सांगतात.

"स्वतःचं स्थान आणि सत्तेला कायदेशीर मान्यता मिळवणं, बळकटी देणं हे शी जिनपिंग यांचं प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. कम्युनिस्ट पार्टी आणि देश त्यानंतर येतात. हा एका नवीन पर्सनालिटी कल्टचा भाग आहे, जो जिनपिंग यांना केवळ माओ यांच्याशीच नव्हे तर जुन्या काळातील सर्वात गौरवशाली आणि यशस्वी चीनी सम्राटांशी जोडतो," असं हाँगकाँग बाप्तिस्ट युनिव्हर्सिटीमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक जीन-पियर कॅबेस्टन सांगतात.

हाँगकाँगच्या मिंग पाओ या वृत्तपत्रानुसार, प्रतिष्ठित पेकिंग विद्यापीठ आणि शिंजुआ विद्यापीठासह डझनभर विद्यापीठे व संस्थांनी जिनपिंग यांच्या नावाखाली संशोधन केंद्रं स्थापन केली आहेत.

ऑगस्टमध्ये चीनच्या शिक्षण मंत्रालयानं जिनपिंग यांच्या विचारांचा राष्ट्रीय अभ्यासक्रमात प्रचार करण्यासाठीच्या योजनेचं अनावरण केलं.

2019 मध्ये श्वेशी क्यांगक्वो नावाचं एक मोबाइल अॅप विकसित करण्यात आलं. ज्याचा शब्दशः अर्थ 'जिनपिंग यांच्याकडून शिका आणि देशाला मजबूत बनवा' असा होतो. या अॅपमध्ये जिनपिंग यांच्या विचारांवर आधारित क्विझचा समावेश करण्यात आला आहे.

"आपल्याकडे योग्य विचारधारा आहे आणि प्रत्येकानं ती स्वीकारली पाहिजे,असा जिनपिंग यांना विश्वास आहे," असं कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक अँड्र्यू नॅथन सांगतात.

"जेव्हा जेव्हा माओ यांनी धोरणात्मक भूमिका घेतली तेव्हा तेव्हा प्रत्येकाला त्याच रांगेत उभं राहावं लागलं आणि आता हे जिनपिंग यांच्या बाबतीतही खरे ठरत आहे," नॅथन पुढे सांगतात.

(इलुस्ट्रेशन्स- डेव्हिस सूर्या)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)