बुद्धिबळातही चीटिंग होते? 'या' खेळाडूवर 100हून अधिक वेळा चीटिंगचा आरोप

    • Author, जाह्नवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

ग्रँडमास्टर हान्स नीमननं शंभरहून अधिक ऑनलाईन सामन्यांमध्ये चीटिंग केल्याची शक्यता असल्याचं एका तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे बुद्धिबळाच्या पटावर उठलेलं वादळ आता इतक्यात शमण्यची चिन्हं दिसत नाहीत.

गेल्या महिन्यात जगज्जेता मॅग्नस कार्लसननं ज्या ग्रँडमास्टरवर फसवणुकीचे आरोप केले होते, तेव्हापासून या खेळाचं जग ढवळून निघालं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल?

कार्लसननं नीमनवरच्या आरोपांचा कुठला पुरावा दिलेला नाही. नीमननं हे आरोप नाकारले, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलं.

त्याच सुमारास चेस डॉट कॉम (Chess.com) या वेबसाईटनं नीमनवर चीटिंगमुळे बंदी घातल्याचं समोर आलं. आता या वेबसाईटनं केलेल्या तपासात आणखी खळबळजनक गोष्ट समोर आली आहे.

नीमननं शंभरहून अधिक ऑनलाईन सामन्यांमध्ये फसवणुक केल्याची शक्यता असल्याचं या तपासातून समोर आलं आहे. नीमननं पटावरच्या खेळात म्हणजे प्रत्यक्ष आमनेसामने बसून खेळताना चीटिंग केल्याचा पुरावा मात्र अजून समोर आलेला नही.

19 वर्षीय नीमनचं यावरील मत जाणून घेण्यासाठी बीबीसीनं नीमनशी संपर्क साधला, पण त्याची प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र याआधी माध्यमांशी बोलताना नीमननं कार्लसन आणि Chess.com मिळून त्याचं करियर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप केला होता.

या प्रकरणात एखाद्या बुद्धिबळाच्या डावासारख्याच मूव्ह्ज म्हणजे चाली दोन्ही बाजूंनी होताना दिसतायत.

कार्लसन विरुद्ध नीमन सामन्यातलं नाट्य

मॅग्नस कार्लसनचं नाव बुद्धिबळाच्या जगातल्या महानतम खेळाडूंमध्ये घेतलं जातं. 2013 पासून तो बुद्धिबळाचा विश्वविजेता राहिला आहे. नॉर्वेच्या या ग्रँडमास्टरनं आजवर पाचवेळा जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे. त्याच कार्लसननं हान्स नीमनवर चीटिंगचा आरोप ठेवला आहे. 19 वर्षांचा नीमन अमेरिकेचा बुद्धिबळपटू असून, गेल्या वर्षी म्हणजे 2021 साली तो ग्रँडमास्टर पदावर पोहोचला.

4 सप्टेंबरला अमेरिकेतल्या सिंकफील्ड कप स्पर्धेत नीमन आणि कार्लसनमध्ये मुकाबला झाला. तीनच दिवस आधी हंगेरीच्या ग्रँडमास्टरनं स्पर्धेतून माघार घेतल्यानं नीमनला संधी मिळाली होती आणि रेटिंगच्या बाबतीतही तो स्पर्धेत सर्वात मागे होता.

पण पहिल्या फेरीत नीमननं काळ्या सोंगट्यांसह खेळताना कार्लसनला हरवलं आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्याच दिवशी कार्लसननं स्पर्धेतून माघार घेतली आणि एक ट्वीट केलं ज्यात फुटबॉल मॅनेजर होसे मोरिन्यो यांच्या एका वाक्यावरचं मीम होतं. त्याचा अर्थ होतो, 'मी बोललो तर मी मोठ्या संकटात सापडेन.'

कार्लसनच्या या ट्वीटनं सगळ्यांना कोड्यात टाकलं. त्यानंतर गेल्या आठवड्यात एका ऑनलाईन मॅचमध्ये दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा कार्लसननं एकच खेळी करून सामना सोडून दिला. नीमनच्या सहभागाचा निषेध म्हणून त्यानं हे केल्याची चर्चा झाली.

कार्लसननं ती स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर या प्रकरणावर भाष्य केलं. 27 सप्टेंबरला कार्लसननं आपलं सविस्तर म्हणणं ट्विटरवर मांडलं, ज्यात त्यानं नीमनवर चीटिंगचे म्हणजे खेळ जिंकण्यासाठी फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.

कार्लसननं नेमके काय आरोप केले आहेत?

कार्लसन म्हणला, "मी वैतागलो आहे, मला सर्वोत्तम पातळीवर, सर्वोत्तम स्पर्धांमध्ये बुद्धिबळ खेळत राहायचं आहे."

"मला वाटतं, बुद्धिबळात चीटिंग बरंच फोफावलं आहे आणि हे खेळाच्या अस्तित्वासाठी मारक आहे. बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजक आणि खेळाच्या पावित्र्याविषयी ज्यांना काळजी वाटते अशा सर्वांनीच सुरक्षा उपाय वाढवायला हवेत आणि चीटर लोकांना पकडू शकतील अशा पद्धती शोधायला हव्यात."

"मला वाटतं नीमननं मान्य केलं आहे त्यापेक्षा जास्त वेळा आणि अलीकडच्या काळात चीटिंग केलं आहे."

कार्लसननं नीमनच्या गेल्या काही वर्षांतल्या असामान्य प्रगतीकडे लक्ष वेधलं आहे. कार्लसनचा दावा आहे की सिंकफील्ड कपमध्ये खेळताना नीमन ना तणावाखाली होता, ना पूर्णपणे खेळावर त्याचं लक्ष होतं, तरीही तो जिंकला, जे थोड्या लोकांनाच शक्य होतं.

"चीटिंग रोखण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. माझ्याबाजूनं मी आता यापुढे अशा लोकांशी खेळणार नाही, ज्यांनी याआधी वारंवार चीटिंग केली आहे. कारण मला माहिती नाही, ते भविष्यातही पुन्हा अशी फसवणूक करू शकतात," असंही कार्लसन पुढे म्हणाला.

कार्लसनचं म्हणणं आहे की त्याला आणखीही काही बोलायचं आहे, पण "नीमनची परवानगी घेतल्याशिवाय मी उघडपणे बोलणार नाही".

"मी आतापर्यंत केवळ माझ्या वागणुकीतून मला काय म्हणायचं आहे ते दाखवलं आहे. हे स्पष्ट आहे, की मला नीमनसोबत बुद्धिबळ खेळायची इच्छा नाही."

वेबसाईटच्या तपासातून काय समोर आलं?

Chess.com या वेबसाईटवर जगभरातले टॉप प्लेयर्स स्पर्धेत उतरतात, काही वेळा अशा स्पर्धेत रोख पुरस्कारही दिले जातात.

या वेबसाईटवरील डावांतच नीमननं चीटिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वेबसाईटनं यासंदर्भात एक 72 पानी अहवाल सादर केला आहे.

नीमननं अगदी अलीकडे म्हणजे 2020 सालीही चीटिंग केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. तसंच त्यानं मोठ्या खेळाडूंविरोधातल्या सामन्यांतही चीटिंग केली असा दावा वेबसाईटनं केला आहे.

या अहवालात नीमननं केलेल्या खेळींची संगणकानं सुचवलेल्या खेळींशी तुलना करण्यात आली. संगणक अगदी सर्वोत्तम खेळाडूंपेक्षाही उत्तम खेळू शकतात, हे इथे लक्षात घ्यायला हवं. या वेबसाईटनं संशयास्पद असलेल्या सामन्यांमध्ये नीमनच्या विजयाची शक्यता किती आहे याचं विश्लेषण करण्यात आलं.

"नीमननं शंभरहून अधिक डावांत चीटिंग केल्याचं समोर आलं आहे. तो 17 वर्षांचा असताना त्यानं काही सामन्यांत आणि डावांत चीटिंग केलं आहे. त्यात 25 वेळा तो लाईव्ह स्ट्रीमही करत होता." असं हा अहवाल सांगतो.

नीमनची प्रगती काहीशी अतर्क्य असल्याचंही या वेबसाईटनं म्हटलं आहे. त्याचा खेळात सुधारणेचा आणि रँकिंगमध्ये वर सरकण्याचा वेग लक्षणीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या केवळ दोन वर्षांत नीमननं रँकिंगमध्ये 800 वरून टॉप 50 पर्यंत मजल मारली आहे. त्याच्या वयाच्या खेळाडूंपेक्षा बऱ्याच वेगानं आणि बऱ्याच उशीरा नीमननं ही प्रगती केली आहे.

नीमनचे निकाल आकडेवारीच्या दृष्टीनं असामान्य आहेत, पण कार्लसनविरुद्ध विजय मिळवताना किंवा पटावर प्रत्यक्ष खेळताना त्यानं चीटिंग केल्याचा पुरावा या तपासात तरी मिळालेला नाही.

नीमनविरोधात कार्लसननं आपल्यावर दबाव आणल्याचे आरोप वेबसाईटनं नाकारले आहेत.

नीमनचं म्हणणं काय आहे?

नीमननं कार्लसनचे आरोप फेटाळले . पण 12 आणि 16 वर्षांचा असताना म्हणजे दोनदा ऑनलाईन बुद्धिबळ खेळताना चीटिंग केल्याचं कबूल केलं आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे चेस डॉट कॉम या वेबसाईटनं त्यासाठी नीमनवर बंदीही घातली.

पण बुद्धिबळाच्या कुठल्याही स्पर्धेत पटावरच्या खेळात चीटिंग केलेलं नाही, हे ठासून सांगितलंय. आपली बाजू पटत नसेल तर नग्न होऊन खेळण्यासही मी तयार आहे असंही विधान त्यानं केलं.

वाद सुरु झाल्यापासून नीमन आरोप नाकारत आला आहे. तो म्हणाला होता की, "मला फरक पडत नाही, कारण मी फसवणूक केलेली नाही. मला एखाद्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन न होणाऱ्या बंद बॉक्समध्ये खेळावं लागलं तरी हरकत नाही. मला जिंकायचं आहे आणि तेच माझं ध्येय्य आहे."

पण या सगळ्या प्रकरणानं बुद्धिबळाचं विश्व ढवळून निघालं आहे, चाहते आणि खेळाडूही संभ्रमात आहेत.

बुद्धिबळात चीटिंगची समस्या किती गंभीर?

कार्लसनच्या आरोपांवर बुद्धिबळाच्या जगातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत.

कुणाला नीमनच्या कामगिरीविषयी शंका वाटते आहे. शरिरात लपवलेलं एखादं प्लॅस्टिकचं उपकरण खेळाडूंना एखाद्या खेळीविषयी संकेत पाठवू शकतं, याची चर्चा होते आहे. नीमननं असं काही केल्याचा कुठलाही पुरावा मात्र नाही.

दुसरीकडे कार्लसन सध्या अपयशाचा सामना करावा लागल्यामुळे असे आरोप करत आहे, असं काहींना वाटतं.

पण सगळ्यांनीच हे मान्य केलंय की तंत्रज्ञानाच्या युगात बुद्धिबळात चीटिंगकडे आणखी गंभीर्यानं पाहण्याची गरज आहे.

या खेळात फसवणुकीच्या घटना नव्या नाहीत.

2015 साली भारतात एक प्रकरण समोर आलं होतं ज्यात एका खेळाडूनं चीटिंगसाठी पायाला बांधलेल्या मोबाईलचा वापर केला होता.

2006 सालच्या जागतिक स्पर्धेत तेव्हाचा विजेता व्लादिमीर क्रॅमनिक बाथरूम ब्रेकमध्ये चीटिंग करत असल्याचा आरोप व्हेसलिन टोपालोव्हनं केला होता, हे प्रकरण तेव्हा टॉयलेटगेट म्हणून गाजलं होतं.

भारताचे ग्रँडमास्टर आणि भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या फेअरप्ले कमिटीचे माजी अध्यक्ष प्रवीण ठिपसे सांगतात, की "बुद्धिबळाच्या खेळात चीटिंगचं प्रमाण नेमकं किती आहे हे सांगता येणं कठीण आहे."

ते पुढे म्हणतात, "ऑनलाईन चीटिंग करणं तुलनेनं सोपं असतं, पण पटावरच्या खेळात होणाऱ्या चीटिंगकडेही गांभीर्यानं पाहायला हवं. कार्लसनला संशय आला होता तर त्यानं तिथेच तक्रार करायला हवी होती. आताही त्यानं पुरावे शोधून काढले तर कारवाई केली जाऊ शकते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)