You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मार्टा टेमिडो: पोर्तुगालमध्ये गरोदर भारतीय महिलेचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
प्रसूतीगृहात जागा न मिळाल्याने एका गरोदर भारतीय महिलेचा पोर्तुगालमध्ये मृत्यू झाला आहे. ही महिला पर्यटनासाठी पोर्तुगालला गेली होती.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे.
34 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला नेताना कार्डिअक अरेस्टमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.
पण, आरोग्यमंत्र्यांनी राजीनाम्या देण्यामागे हेच एकमेव कारण आहे, असं नाही.
गेल्या काही महिन्यांत पोर्तुगालमध्ये प्रसुतीगृहात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा आरोप वारंवार केला जात होता.
डॉ. मार्टा टेमिडो 2018 पासून आरोग्यमंत्री होत्या. पोर्तुगालमध्ये कोरोना साथीच्या काळात योग्य व्यवस्थापन केल्याचं श्रेय त्यांना दिलं जातं.
पण मंगळवारी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं, "डॉ. टेमिडो यांच्याकडे पदावर राहण्यासाठी कोणतंच कारण आता उरलेलं नाही, याची जाणीव आता त्यांना झाली आहे."
पोर्तुगालच्या लुसा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'पंतप्रधान अँटोनियो कोस्टा म्हणाल्या आहेत की या महिलेचा मृत्यू हे डॉ. टेमिडो यांच्या राजीनाम्यासाठी असलेल्या कारणांच्या श्रृंखलेतील शेवटचं कारण समजू शकतो.'
दुसऱ्या एका प्रसिद्धीपत्रकात पंतप्रधान कोस्टा यांनी सांगितलं की 'आरोग्यमंत्री डॉ. टेमिडो यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. पंतप्रधानांनी टेमिडो यांचे आजवरच्या चांगल्या कामाबाबत आभार मानले.'
स्थानिक माध्यमांमध्ये सांगण्यात आलं की देशातील सर्वात मोठ्या सांता मारिया हॉस्पिटलमध्ये निओनेटॉलॉजी युनिटमध्ये जागा न मिळाल्याने महिलेला लिस्बनच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं. यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथील साओ फ्रान्सिस्को झेवियर हॉस्पिटलने सांगितलं की गरोदर महिलेचं इमर्जन्सी सिझेरियन ऑपरेशन केलं गेलं होतं.
यानंतर महिलेने 722 ग्रॅम वजनाच्या प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला. यानंतर महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच तिचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाने सांगितलं.
महिलेच्या बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं असून त्याची तब्येत चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणानंतर महिलेच्या मृत्यूच्या चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत पोर्तुगालमध्ये अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली होती.
आईला उपचारांसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जावं लागणं, उपचारासाठी झालेला उशीर या कारणांमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या होत्या.
पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचारी, विशेषतः प्रसूती तज्ज्ञांची कमतरता आहे. यामुळे सरकार विदेशातून भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार करत आहे.
पोर्तुगालमध्ये महिलांची प्रसूती करणारी अनेक रुग्णालये बंद झाल्यामुळे इतर रुग्णालयांवर ताण वाढत आहे. यामुळे उपचार करण्यासाठी लागणारा वेळही वाढला आहे.
आरोग्यमंत्री असताना डॉ. टेमिडो यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक आपत्कालीन सेवा बंद केल्या होत्या. या सेवा विशेषतः आठवडा अखेरीस बंद केल्या जात होत्या.
देशातील विरोधी पक्ष, महापालिका, डॉक्टर आणि परिचारिका यांच्या संघटना याचं खापर माजी आरोग्यमंत्र्यांवरच फोडतात.
त्यांच्या मते, प्रसूती सेवा बंद केल्यामुळेच महिलांना लांब अंतरावर जाण्याचं भाग पडतं. यामध्ये धोका जास्त आहे.
पोर्तुगाल येथील डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष मायकल गुईमरेस यांनी RTP या स्थानिक माध्यमाशी बोलताना म्हटलं, "आम्हाला राजीनाम्याची अपेक्षा नव्हती. देशातील वैद्यकीय क्षेत्र संकटात आहे, अशा वेळी त्यांनी राजीनामा देणं आश्चर्यजनक आहे."
डॉ. टेमिडो यांना कोरोना काळातील उत्तम व्यवस्थापनाबद्दल ओळखलं जातं. विशेषतः कोव्हिड-19 लसीकरणाच्या यशाचं श्रेय टेमिडो यांनाच दिलं जातं.
लसीकरण मोहिमेमुळे गेल्यावर्षी झालेल्या ओपिनियन पोलमध्ये टेमिडो या सरकारमधील सर्वाधिक लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)