मासे, पाणघोडे यांनाही जिथे द्यावी लागतेय कोरोना चाचणी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोनाचा उदयबिंदू मानलं जाणाऱ्या चीनच्या किनारी भागातील झियामेन शहरात 5 दशलक्ष नागरिकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचे 40 रुग्ण सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एवढ्या प्रचंड संख्येने कोरोना चाचणीचा आदेश देण्यात आला आहे, यामध्ये चक्क माशांचाही समावेश आहे. अधिकृत नोटिशीद्वारे हे स्पष्ट झालंय की समुद्री प्राण्यांनाही कोरोना चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.

झियामेनचे मारिटाईम पॅन्डेमिक कंट्रोल डिस्ट्रिक्ट कमिटीने जारी केलेल्या आदेशानुसार मच्छिमारांनी किनाऱ्यावर परत आल्यानंतर स्वत:ची आणि समुद्रातून आणलेल्या समुद्री प्राण्यांचीही कोरोना चाचणी करून घ्यावी.

टिकटॉकची चीनची आवृत्ती असलेल्या डोयून या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर याचे फोटो समोर आले होते.

विचित्र वाटत असलं तरी माशांना कोरोना चाचणी करून घ्यायला लागण्याची ही पहिली वेळ नाही. झियामेन म्युनिसिपल ओशॅनिक डेव्हलपमेंट ब्युरो याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की आम्ही हैनान शहराकडून बोध घेतला आहे. तिथेही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

समुद्री व्यवहारादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मच्छिमार बांधव कामकाजाच्या निमित्ताने विदेशातील मच्छिमारांशी बोलतात.

चीनच्या दक्षिण भागातील हैनान हा परिसर झियामेनसारखाच किनारी आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून झियामेन प्रांतात कोरोनाचे 10,000हून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा संसर्ग मच्छिमार समाजाच्या अन्य ठिकाणच्या व्यक्तींशी होणाऱ्या दैनंदिन व्यवहारातून झाला असावा असं प्रशासनानला वाटतं.

समुद्री जीव आणि कोरोना यांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता चीनच्या प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली होती. कोरोनाचा उगम वुहानच्या सीफूड मार्केटच्या माध्यमातून झाला असा तर्क व्यक्त करण्यात आला होता.

समुद्री खाद्य हा कोरोनाचा संसर्गबिंदू असण्याची शक्यता मात्र कमी आहे. गोदीत काम करणारे कर्मचारी तसंच शीतगृहं हाताळणारी मंडळी, सीफूड मार्केटमधील कर्मचारी यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असावा असं म्हटलं गेलं.

जून 2020 मध्ये बीजिंगमध्ये अशाच एका कोरोना उद्रेकाचा संबंध सालोमन माशांशी जोडण्यात आला होता.

सालोमान माशांच्या आयातीत वापरणाऱ्या आलेल्या चॉपिंग बोर्ड्सवर कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचं वृत्त चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. यामुळे रेस्तराँ आणि सुपरमार्केट्सनी त्यांच्या भांडारातून सालोमन मासा वजा केला. सालोमान माशाची आयात एकदमच कमी झाली. सामोमन माशाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो म्हटल्यावर देशभरात चिंतेचं वातावरण होतं. समुद्री खाद्य खाण्यासंदर्भात साशंकता व्यक्त करण्यात आली.

गेल्या दोन वर्षात कोरोना चाचणीला सामोरे जाणारे मासे हे एकमेव बिगरमानवी घटक नाहीत. मे महिन्यात सरकारी प्रसारमाध्यमांनी जारी केलेल्या व्हीडिओत एका पाणघोड्याची कोरोना चाचणी घेतली जात असल्याचं दिसत होतं.

झेजिआंग प्रांतात हुझयू या ठिकाणच्या वाईल्डलाईफ पार्कमध्ये असलेल्या पाणघोड्याची कोरोना चाचणी घेण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)