व्हर्जिनिटी टेस्ट: महिलांना जिथे कौमार्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं

ग्राफिकल इमेज - एक महिला आणि पुरुष पलंगावर एकत्र आहेत, महिलेच्या चेहऱ्यावर तणाव दिसतो आहे आणि पुरुष रागानं तिच्यावर ओरडतो आहे.

फोटो स्रोत, Manuella Bonomi

फोटो कॅप्शन, कौमार्याच्या मुद्द्यावरून नाराजीमुळे जोडप्यांमधली नातीही अनेकदा तुटतात, पण महिलांना त्यात जास्त त्रास सहन करावा लागतो.
    • Author, फिरोझा अकबरियन आणि सोफिया बेत्तिझा
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

लग्नाआधी मुलींचं कौमार्य इराणमधल्या अनेक कुटुंबांमध्ये महत्त्वाचं मानलं जातं. मुलींना कौमार्याची चाचणी द्यावी लागणं ही प्रथा मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी आहे, असं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चं म्हणणं आहे.

पण तरीही कधीकधी पुरुष अशा प्रमाणपत्राची मागणी करतात. पण गेल्या वर्षभरात अनेकजण त्याविरोधात आवाज उठवू लागले आहेत.

"तुझं कौमार्य अबाधित नव्हतं म्हणून तू मला फसवून माझ्याशी लग्न केलंस. खरं काय ते कळलं असतं कोणीच तुझ्याशी लग्न केलं नसतं."

हे बोल मरियमच्या नवऱ्यानं तिच्यासोबत पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्यावर तिला ऐकवले होते.

मरियमनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, जरी संभोगादरम्यान तिला रक्तस्त्राव झाला नसला तरी तिनं याआधी कधीही कोणाशीही शरीरसंबंध ठेवले नव्हते.

पण त्याचा विश्वास बसला नाही, आणि त्यानं तिला कौमार्याचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.

इराणमध्ये अशा घटना असामान्य नाहीत. साखरपुडा झाला की अनेक महिला एखाद्या डॉक्टरकडे जातात आणि अशी चाचणी करून घेतात ज्यातून त्यांनी कधीच शरीरसंबंध ठेवले नसल्याचं सिद्ध होत असल्याचं सांगितलं जातं.

पण अशा कौमार्य चाचणीला कुठलाच वैज्ञानिक आधार नसल्याचं जागतिक आरोग्य परिषदेनं स्पष्ट केलं आहे.

मरियमच्या प्रमाणपत्रात लिहिलं आहे की तिचं हायमेन (योनीच्या आतला पडदा) लवचिक स्वरुपाचं आहे, त्यामुळे शरीरसंबंधांदरम्यान ते फाटून रक्तस्त्राव होण्याची शक्यता नाही.

ती सांगते, "माझा स्वाभिमान दुखावला गेला. मी काही चुकीचं केलं नव्हतं, पण तरीही माझा नवरा माझा पाणउतारा करत राहिला. मला ते सहन होत नव्हतं, त्यामुळे मी काही गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला."

वेळेत हॉस्पिटलला नेण्यात आल्यामुळे तिचा जीव वाचला. मरियम म्हणते, "मी ते काळे दिवस विसरू शकणार नाही. तेव्हा माझं वजन 20 किलोनं कमी झालं."

कौमार्य चाचणी बंद करण्याची वाढती मागणी

मरियमची कहाणी हे इराणमधल्या अनेक महिलांसाठीचं वास्तव आहे. लग्नाआधी कौमार्य अनेक मुली आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये महत्त्वाचं मानलं जातं. या गैरसमजाची पाळंमुळं सांस्कृतिक रूढीवादामध्ये रोवली गेली आहेत.

पण आता परिस्थिती बदलते आहे. इराणमध्ये दशभरातील महिला आणि पुरुष कौमार्य चाचण्या थांबवण्यासाठी मोहीमच राबवत आहेत.

2021 सालच्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भातल्या एका ऑनलाईन याचिकेवर महिनाभरातच जवळपास 25,000 जणांनी सह्या केल्या. इराणमध्ये एवढ्या लोकांनी कौमार्य चाचणीला विरोध करण्याची ही पहिलीच वेळ होती.

"कौमार्य चाचणी हा महिलांचा अपमान आहे आणि ते त्यांच्या खासगी तसंच मानवी हक्कांचं उल्लंघन आहे," असं नेदा सांगते. ती 17 वर्षांची असताना तिच्या बॉयफ्रेंडसोबत शरीरसबंध जुळले.

ती सांगते, "मला तेव्हा काही सुचेनासं झालं. माझ्या घरच्यांना कळलं तर काय होईल या विचारानं मी घाबरून गेले होते."

त्यामुळे नेदानं 'हायमेन दुरुस्ती'साठी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं.

एक मुलगी तिचा लॅपटॉप, ज्वेलरी एक पुरुषाला विकत आहे, जो तिला पैसे देतो आहे.

फोटो स्रोत, Manuella Bonomi

फोटो कॅप्शन, रूढीवादी समाजामध्ये महिलांनाच या प्रथेमुळे मोठी किंमत मोजावी लागते.

तांत्रिकदृष्ट्या ही शस्त्रक्रिया बेकायदेशीर नाही, पण त्याचे भयानक सामाजिक पडसाद पाहता कोणतंच रुग्णालय अशी शस्त्रक्रिया करण्यास तयार होत नाही.

त्यामुळे नेदानं एक असं खासगी रुग्णालय शोधलं जे भरपूर किंमत मोजल्यावर अशी शस्त्रक्रिया करण्यास तयार होतं, पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार होती.

"मी माझ्याकडे साठवलेले सगळे पैसे खर्च केले. माझा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि माझे सोन्याचे दागिनेही विकले," असं नेदा सांगते. शस्त्रक्रीयेत काही बरंवाईट झालं, तर त्याची जबाबदारी फक्त नेदाची असेल असं सांगणाऱ्या कागदपत्रांवर तिला सही करावी लागली.

बाळंतपणात दाई काम करणाऱ्या एका महिलेनं तिच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यासाठी चाळीस मिनिटं लागली. पण नेदा बरी होईपर्यंत अनेक आठवडे गेले.

"मला खूप त्रास होत होता. मी माझे पायही हलवू शकत नव्हते," नेदा ते दिवस आठवते. तिला हा सगळा प्रकार आई-वडिलांपासून लपवून ठेवावा लागला होता.

"मला खूप एकटं वाटत होतं. पण घरच्यांना कळलं तर काय होईल या भीतीनं मी वेदना सहन करत होते."

एवढं सहन करूनही काही उपयोग झाला नाही. वर्षभरानंतर नेदाला असा पुरुष भेटला, ज्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण त्याच्यासोबत सेक्सदरम्यान तिला रक्तस्त्राव झाला नाही. शस्त्रक्रिया अपयशी ठरली होती. "त्यानं माझ्यावर आरोप ठेवला की लग्न करण्यासाठी मी त्याला भाग पाडते आहे, मी खोटारडी आहे. तो मला सोडून गेला."

कुटुंबाकडून येणारा दबाव

कौमार्य चाचणी ही नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि तिला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही इंडोनेशिया, इराक, तुर्कस्तान अशा अनेक देशांमध्ये ही प्रथा पाळली जाते. भारतातही अनेक समाजांमध्ये कौमार्य चाचणी महत्त्वाची मानली जाते.

इराणीयन वैद्यकीय संघटनेचा दावा आहे की कोर्टातला खटला किंवा बलात्काराचा आरोप अशा काही विशिष्ठ परिस्थितीतच कौमार्य चाचणी घेतली जाते.

पण कौमार्य प्रमाणपत्राविषयीची मागणी बहुतेकदा अशा जोडप्यांकडून केली जाते ज्यांचं लग्न ठरत आहे. त्यामुळे महिला बऱ्याचदा आईसोबत खासगी रुग्णालयात जातात.

एखादी दाई किंवा स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) तपासणी करून प्रमाणपत्र देते. त्यात महिलेचं पूर्ण नाव, तिच्या वडिलांचं नाव, तिचा राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांक आणि कधीकधी तिचा फोटोही असतो. या प्रमाणपत्रात तिच्या हायमेनचं वर्णन केलेलं असतं आणि असं विधान असतं की, "या मुलीचं कौमार्य कायम असल्याचं दिसत आहे."

एक गायनॅकॉलॉजिस्ट महिलेची कौमार्य तपासणी करते आहे, दोन महिला (आया) मागे उभ्या राहून पाहात आहेत.

फोटो स्रोत, Manuella Bonomi

फोटो कॅप्शन, कौमार्य प्रमाणपत्राची मागणी अनेकदा अशा जोडप्यांकडून होते, जे लग्न करण्याच्या तयारीत आहेत.

काही कुटुंबं जास्त रूढीवादी असतात. अशा वेळेस प्रमाणपत्रावर दोन साक्षीदारांची (बहुतेकदा आईची) सही असते.

डॉ. फरिबा अनेक वर्षं अशी प्रमाणपत्र देत आल्या आहेत. ही एक अपमानजनक प्रथा असल्याचं त्या मान्य करतात, पण त्यातून महिलांना फायदा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

"मुलींवर घरच्यांकडून एवढा दबाव असतो. कधी कधी मी अशा जोडप्यांसाठी शब्दशः खोटंही बोलले आहे. त्यांचं लग्न होणार असेल पण त्याआधीच दोघांमध्ये शरीरसंबंध आला असेल तर मी त्यांच्या घरच्यांसमोर मुलीचं कौमार्य अबाधित असल्याचं सांगते."

पण अनेक पुरुषांसाठी होऊ घातलेल्या पत्नीचं कौमार्य ही मूलभूत मागणी असते.

"लग्नाआधी एखाद्या मुलीचं कौमार्य भंग झालं असेल तर ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसते. ती दुसऱ्या एखाद्या पुरुषासाठी नवऱ्याला सोडून जाऊ शकते," असा दावा शिराझ शहरात राहणारा अली करतो.

पण पेशानं इलेक्ट्रिशियन असलेल्या अलीनं स्वतः मात्र आजवर दहा मुलींशी संबंध ठेवले आहेत. "मी स्वतःला थांबवू शकत नाही," असं तो म्हणतो.

इराणच्या समाजाचं वागणं दुटप्पीपणाचं आहे हे तो मान्य करतो. पण परंपरा मोडण्याची काहीही गरज नाही असं त्याला वाटतं. "सामाजिक धारणेनुसार पुरुषांना महिलांपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे असं सर्वांनी मान्य केलं आहे," असं स्पष्टीकरण तो देतो.

इराणमध्ये अनेकांचा, विशेषतः ग्रामीण भागातील परंपरावादी लोकांचा दृष्टीकोन अलीसारखाच आहे.

कौमार्य चाचणीविरोधात निदर्शनं वाढत आहेत. पण हे विचार इराणच्या संस्कृतीत एवढे खोलवर रुजले आहेत, की या प्रथेवर सरकारकडून किंवा कायद्यानं कुठली बंदी येणं इतक्यात शक्य नाही असं अनेकांना वाटतं.

भविष्यातली आशा

छळ करणाऱ्या नवऱ्यासोबत राहिल्यावर आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर चार वर्षांनी मरियमला अखेर कोर्टातून घटस्फोट मिळवणं शक्य झालं.

काही आठवड्यांपूर्वीच ती त्या बंधनातून मुक्त झाली.

"आता कुठल्याही पुरुषावर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण जाणार आहे. मी इतक्यात लग्न करेन असं मला वाटत नाही," असं मरियम सांगते.

इराणमधल्या इतर शेकडो, हजारो महिलांप्रमाणेच मरियमनंही कौमार्य चाचण्या थांबवण्याची मागणी करणाऱ्या अनेक ऑनलाईन याचिकांपैकी एकावर सही केली आहे.

परिस्थिती लवकर बदलेल, तिच्या हयातीत काही बदल होतील अशी तिची अपेक्षा नाही, पण एक दिवस इराणमध्ये महिलांना आणखी समान हक्क मिळतील असा विश्वास तिला वाटतो.

ती सांगते, "मला खात्री आहे, एक दिवस हे नक्की प्रत्यक्षात येईल. मला ज्या त्रासातून जावं लागलं, ते भविष्यात कुठल्याही मुलींच्या वाट्याला येणार नाही अशी मी आशा करते."

या लेखातील सर्व व्यक्तींची नावं त्यांची ओळख सुरक्षित राखण्यासाठी बदलली आहेत.

तुम्हाला या लेखात मांडलेल्या समस्येमुळे काही त्रास होत असेल, तर मदतीसाठी कृपया बीबीसी अ‍ॅक्शन लाईनच्या वेबसाईटला भेट द्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)