मनीषा रुपेता : पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी माहिती आहेत का?

    • Author, शुमायला खान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

मनीषा रुपेता पाकिस्तानात डीएसपी म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला आहेत. सिंध लोकसेवा परीक्षा पास करून प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना हे पद देण्यात आलं आहे.

मनीषा सिंध जिल्ह्यातल्या एका छोट्या जिल्ह्यातल्या जाकुबाबादच्या आहेत. तिथून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं होतं. त्यांचे वडील जाकुबाबादमध्ये व्यापारी होते. मनीषा तेरा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं.

मनीषा यांनी स्वबळावर पाचही भावंडांचं संगोपन केलं. मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी त्या कराचीला आल्या. आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण काढताना त्या सांगतात की, "जाकुबाबादमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण नव्हतं. जर एखाद्या मुलीला शिक्षणात रस असेल तर तिला फक्त वैद्यकीय शिक्षणसाठी उपयुक्त मानलं जातं."

मनीषा यांच्या तीन बहिणी डॉक्टर आहे तर छोटा भाऊ मेडिकल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.

पोलीस व्हायचं होतं

मनीषा यांनाही डॉक्टर व्हायचं होतं. मात्र त्यांना एक मार्क कमी पडला. त्यानंतर त्यांना डॉक्टर ऑफ फिजिकल थेरपीमध्ये प्रवेश मिळाला.

त्याच दरम्यान कोणालाही न सांगता त्यांनी सिंध सेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. या परीक्षेत निवडल्या गेलेल्या 438 लोकांमध्ये त्यांनी 16 वा क्रमांक पटकावला.

पाकिस्तानात साधारणत: महिलांना पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात जाण्याची गरज पडत नाही. ही ठिकाणं महिलांसाठी उपयुक्त मानली जात नाहीत. म्हणून गरज पडल्यास त्या पुरुषांबरोबर न्यायालयात जातात. अशा परिस्थितीत त्यांनी पोलीस दलात जाण्याचा निर्णय का घेतला?

त्या सांगतात, "आम्हाला हे स्पष्ट माहिती आहे की कोणता व्यवसाय कोणत्या महिलांसाठी आहे आणि कोणता होता? मला कायमच पोलीस सेवेचं आकर्षण वाटतं आणि मला प्रेरणाही मिळते. मला वाटतं की या पेशाने महिलांना सशक्त होण्यास मदत होते."

त्यांनी मला सांगितलं की, त्यांचा मुख्य उद्देश्य पोलिसांच्या पेशाला महिलांना जोडण्याचा प्रयत्न करणं हाही आहे.

कराचीच्या सगळ्यात खडतर भागात झालं प्रशिक्षण

मनीषा सांगतात, "माझ्या मते पीडित महिलांची सुरक्षा करण्यासाठी महिलांचीच जास्त गरज आहे. म्हणून मला पोलीस दलात यायचं होतं."

डीएसपी किंवा उपअधीक्षक पदाचा कारभार सांभाळल्यानंतर त्यांचं ल्यारी या भागात प्रशिक्षण घेतलं. या विभागात पोलीस अधिकारी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

त्यांनी एएसपी आतिफ आमीर यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेतलं. मनीषा यांच्यासारख्या महिला पोलीस दलात आल्या तर पोलिसांची प्रतिमा सुधारायला मदत होईल, असं आमीर यांचं मत आहे.

आमीर सांगतात, "जर एखादा गु्न्हा घडला आणि प्रत्यक्षदर्शी महिला असेल तर ती समोर यायला कचरते. तिला कोणत्याच कायदेशीर प्रकियेत भाग घ्यायचा नसतो. कारण तिला वारंवार पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागतो. जर जास्त पोलीस अधिकारी असतील तर परिस्थिती बदलण्यास नक्की मदत होईल."

मनीषा या नोकरीत टिकतील का?

मनीषा यांनी आम्हाला हेही सांगितलं की, त्यांच्या समाजाच्या लोकांचं असं मत आहे की त्या फार काळ टिकणार नाहीत.

त्याबद्दल मनीषा म्हणतात, "माझ्या यशाने अनेक लोकांना आनंद झाला आहे. आमच्या समुदायातही लोकांना आनंद झाल्याचं दिसलं. संपूर्ण देशाने माझी स्तुती केली. सगळ्यांनी माझी स्तुती केली. मात्र एक विचित्र गोष्टही घडली. माझ्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की थोड्याच काळात मी ही नोकरी सोडून देईन."

त्यांच्या नातेवाईकांची अशी भूमिका असुनसुद्धा मनीषा त्यांच्या नातेवाईकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्या म्हणतात, "पुरुषसत्ताक समाजात पुरुषांना असं वाटतं की हे कामं केवळ पुरुषच करू शकतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे. मात्र येत्या काही वर्षांत त्यांची भूमिका नक्की बदलेल. त्यांच्यापैकी एखाद्या स्त्रीची मुलगी पोलीस विभागात काम करायला लागेल."

मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत

मनीषा त्यांची नोकरी सांभाळून लोकसेवा आयोगाची तयारी करण्याऱ्या एका क्लासमध्येही शिकवतात.

त्याबद्दल बोलताना त्या सांगतात, "हे माझ्यासाठी फारच प्रेरणादायी आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या मार्गदर्शनामुळे मुलींना पुढे जायला मदत होऊ शकेल."

मनीषा यांच्या मते पोलीस सेवा ही धर्म आणि लिंग यांच्यापलीकडे आहे. येत्या काळात अल्पसंख्याक समाजातील अनेक मुली पोलीस दलात येतील, असा विश्वास त्यांना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)