You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया-युक्रेन युद्ध : रशियाकडून शाळेवर बॉम्बहल्ला झाल्याचा युक्रेनचा आरोप, 60 जणांच्या मृत्यूची शक्यता
युक्रेनच्या पूर्व भागात एका शाळेवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात 60 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हल्ला झालेली शाळा लुहान्स्कच्या बिलोहोरिक्वा भागात आहे.
येथील एका शाळेच्या इमारतीत सुमारे 90 जणांनी आश्रय घेतला होता. हल्ल्यानंतर 30 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी (7 मे) रशियाकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप गव्हर्नर हैदई यांनी केला आहे. हैदई यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी बीबीसी स्वतंत्रपणे करू शकलं नाही. शिवाय रशियाकडूनही यासंदर्भात कोणतंच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. रशिया युक्रेनवर अतिशय आक्रमक हल्ले सुरू आहेत. सध्या रशियाने आपला मोर्चा युक्रेनच्या पूर्व प्रांताकडे वळवला आहे. युक्रेनही या रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र आहे.
लुहान्स्क प्रांताचे गव्हर्नर सेरहिय हैदई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींच्या मृत्यूची खात्री पटवण्यात आली असून इतर मृतांबाबत माहिती घेतली जात आहे. या हल्ल्यात किमान 60 मृत्यू झाल्याची शंका प्रशासनाने वर्तवली आहे.
युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, बॉम्बवर्षाव केल्यानंतर शाळेची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यानंतर याठिकाणी आगही लागली. आग विझवण्यासाठी फायर-ब्रिगेडला तीन तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. या शाळेत संपूर्ण गावाने आश्रय घेतला होता, असा आरोप गव्हर्नर हैदई यांनी केला.
सध्या या ठिकाणी ढीगारा हटवण्याचं काम सुरू आहे. यानंतरच मृतांचा नेमका आकडा समोर येऊ शकतो.
बिलोहोरिक्वा भागात गेल्या एका आठवड्यापासून तुंबळ युद्ध सुरू आहे. हे ठिकाण युद्धाचं हॉटस्पॉट बनल्याची बातमी युक्रेनच्या युक्रेनिस्का प्रावदा या वृत्तपत्राने नुकतीच दिली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)