स्पेसएक्स: अंतराळात मांस तयार केलं जाऊ शकतं का?

    • Author, जेम्स क्लेटन
    • Role, बीबीसी तंत्रज्ञान प्रतिनिधी, उत्तर अमेरिका
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जेफ बेजोस आणि इलॉन मस्क या दोघांनाही अंतराळात घर घ्यायचं आहे. तर नासा आता मंगळावर माणसं पाठवण्याच्या तयारीत आहे. पण माणूस चंद्रावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर राहणार असेल तर तो खाणार काय?

अंतराळात झाड उगवता येईल की नाही यावर अनेक प्रयोग झाले आहेत. आता अंतराळात मांस तयार केलं जाऊ शकतं का? यावरही गेल्या आठवड्यापासून प्रयोग केला जात आहे.

हा प्रयोग भविष्यात अंतराळात प्रवाशांना प्रोटीन मिळावं यासाठी महत्त्वाचा स्त्रोत ठरू शकतो, अशी आशा संशोधकांना आहे.

पेशींपासून मांस तयार करणारी इस्रायलची कंपनी अलिफ फार्म्स यावर काम करत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जाणारी अंतराळ प्रवाशांची पहिली वैयक्तिक टीम हा प्रयोग करत आहे.

दरम्यान, ही पद्धत विश्वासार्ह नसून अंतराळ प्रवासी केवळ यावर विसंबून राहू शकत नाहीत, असं टीकाकारांचं म्हणणं आहे.

मांस कसं तयार केलं जातं?

एवढ्या मोठ्या प्रमाणात पेशींपासून मांस तयार करणं कठीण आहे. अलिफ फार्म्स अशा अनेक कंपन्यांपैकी एक आहे जे कृत्रिम मांस तयार करण्याचा प्रयोग करत आहेत. पण, अंतराळात हा प्रयोग करणारी अलिफ फार्म्स पहिली कंपनी आहे.

कंपनी 'लॅब ग्रोन मीट' यांसारखी वाक्य वापरत नाही. ही प्रक्रिया कोणत्याही पारंपरिक फार्मप्रमाणे अजिबात दिसत नाही.

गायीच्या पेशींना (या पेशी कोणत्याही प्राण्यापासून घेतल्या जाऊ शकतात) अशा गोष्टी दिल्या जातात ज्या त्यांतील वाढ होण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, अॅमिनो असिड आणि कार्बोहायड्रेट

मसल टिश्यू बनत नाहीत तोपर्यंत पेशींची वाढ केली जाते आणि शेवटी मग असे मांस तयार होते जे तुम्ही खाऊ शकता. या प्रक्रियेला कल्टीवेशन किंवा प्रोलिफेरेशन म्हटलं जातं.

दारुच्या कारखान्यात जसे टँक दिसतात अशाच टँकमध्ये हे मांस तयार केलं जातं. हे तयार करण्याच्या या प्रक्रियेत प्राण्याच्या जन्मचक्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं.

ही प्रक्रिया पर्यावरणासाठी फायदेशीर ठरेल, असं या प्रक्रियेच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

अंतराळात मांस तयार करण्याची काय गरज आहे?

अलिफ फार्म्सच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रमुख जवीका तामारी सांगतात, "शून्य गुरुत्वाकर्षणात (झीरो ग्रॅव्हिटी) ही प्रक्रिया करता येऊ शकेल का याविषयी अद्याप वैज्ञानिकांनाही खात्री नाही."

त्या सांगतात, "यापूर्वी केलेल्या प्रयोगांमधून हे लक्षात आलं आहे की मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणात जीवशास्त्र आणि शरीरविज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं काम देतात. त्यामुळे आम्हाला किंवा कोणालाही ही पद्धत अंतराळात प्रत्यक्षात काम करेल का याची खात्री नाही."

8 एप्रिल 2022 रोजी चार अंतराळ प्रवाशांनी स्पेसएक्सच्या रॉकेटमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रासाठी उड्डाण केलं. त्यांच्यासोबत चपलांच्या बॉक्सएवढा कंटेनर होता. यात प्राण्यांच्या पेशी आणि त्यांना वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी होत्या.

लॅरी कोनोर, ईटन स्टिब्बे, मार्क पैथी यांना कैनेडी अंतराळ स्टेशनपासून लाँच केलं. त्यांच्यासोबत माजी अंतराळवीर मायकल लोपेज एलेग्रिया आहेत. त्यांना 24 एप्रिलला अंतराळात पोहचायचं होतं. यानंतर पेशींवरील या प्रक्रियेचं विश्लेषण केलं जाईल.

मांस तयार करणं फायदेशीर ठरेल का?

हा प्रयोग यशस्वी झाला तरी हे सिद्ध होणार नाही की, अंतराळात मांस निर्माण केलं जाऊ शकतं की नाही. त्यामुळे हे फायदेशीर ठरेल का याबाबत काही स्पष्टता नाही.

खरं तर काही कारणांमुळे स्थानिक बाजारपेठेत पेशींपासून तयार झालेलं मांस उपलब्ध नसतं.

आतापर्यंत कृत्रिम मांस तयार करण्याच्या व्यावसायासाठी कोट्यवधी रुपयांच्या डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. पण हा असा पदार्थ आहे जो मोठ्या प्रमाणात तयार करणं सोपं नाही.

इस्रायलमधील रेस्टॉरंटमध्ये मीट विक्री करण्यासाठी अलिफ फार्म परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. हे असं खाद्य आहे जे अद्याप पृथ्वीवरही तयार करण्यात आलेलं नाही. अंतराळ तर फार दूरची गोष्ट आहे.

अंतराळात मांस तयार करण्यासाठी व्यावसायिक आव्हानं आहेत. स्टेरिलिटी हे त्यापैकी एक.

बर्कले येथील केमिकल इंजिनीअर डेव्हिड हमबर्ड सांगतात, "प्राणी पेशी तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो. पेशींमध्ये बॅक्टेरिया किंवा फंगस झाल्यास प्राणी ते अधिक वेगाने पसरतात आणि त्याचा प्रभाव पेशींवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला प्राणी पेशी तयार करता येणार नाहीत."

अलिफ फार्मने मात्र स्टेरिलिटच्या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकेल, असं म्हटलं आहे. विशेषत: अंतराळात जिथे मर्यादित मांस तयार केलं जाणार आहे. पण मंगळावर राहणाऱ्या माणसांना यामुळे काही झाल्यास भयंकर परिस्थिती उद्भवेल.

अंतराळात खाद्यपदार्थ पोहचवणं खूप महाग असल्याचंही अलिफ फार्मचं म्हणणं आहे.

यासंदर्भात आतापर्यंत वेगवेगळ्या आकड्यांचे दावे केले गेलेत. पण 2008 मध्ये नासाच्या अंदाजानुसार, पृथ्वीवरून अर्ध्या किलोपेक्षाही कमी वजन अंतराळात पाठवण्याची किंमत दहा हजार डॉलर्सहून (अंदाजे 7 लाख 65 हजार 649 रुपये) अधिक आहे.

मंगळ ग्रहावर खाद्यपदार्थ पाठवल्यास याहून कित्येक अधिक पटींनी खर्च होणार हे स्पष्ट आहे.

"मंगळ ग्रह पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तिथेच अन्न निर्माण करणं फायदेशीर ठरू शकतं," असं तमारी यांना वाटतं.

दरम्यान, हमबर्ड या संभाव्य फायद्याशी सहमत नाहीत. ते म्हणाले, "या पेशी स्वत: खाण्यायोग्य पदार्थांपासून तयार होतात. यात साखर, अॅमिनो असिड आणि पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तयार होणाऱ्या मांसाचे कॅलरी मूल्य त्यावरील खर्चापेक्षा कमी असणार."

"तुम्ही एकूण कॅलरी मूल्याच्या 25 टक्केच मिळवू शकाल आणि ते खाऊ शकाल. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, एवढ्या कॅलरीचं अन्न तुम्ही अंतराळात का घेऊन जाल आणि 75 टक्के असेच खर्ची घालवणार का?"

पण, दीर्घ काळासाठी अंतराळात थांबण्याचे नियोजन करताना अनेक पातळ्यांवर खबरदारी घेतली जाते. अंतराळ प्रवाशांची सुरक्षा हा त्याचाच एक भाग आहे.

केरेन नायबर्ग या एक अंतराळ प्रवासी आहेत. त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाच महिने राहिल्या आहेत. आता त्या अलिफ फार्म्सच्या सल्लागार समितीत कार्यरत आहेत. प्रवाशांच्या शारीरिक आरोग्यात अन्नपदार्थ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असं त्या सांगतात.

केरेन म्हणाल्या, "खाद्यपदार्थ पांढऱ्या बॅगमध्ये असतात. दुधाची पावडर आणि अशाच इतर गोष्टींमुळे आम्ही हायड्रेट राहतो. मला लसून आणि ऑलिव्ह तेलाच्या सुगंधाची आठवण येत होती. कारण ते आमच्याकडे नव्हतं."

अंतराळात प्रवासी दीर्घ काळासाठी जाणार असतील तर त्यांच्यासाठी ताजी भाजी आणि इतर खाद्य पदार्थ खूप आवश्यक आहेत असंही केरेन सांगतात.

मंगळ ग्रहावर खरंच प्रवासी राहणार असतील तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरोगी आणि स्वादिष्ट जेवण महत्त्वाचं आहे.

अंतराळात मांस तयार होऊ शकतं, हे सिद्ध करणं एक बाब आहे आणि विश्वासार्ह जेवणासाठी पर्याय म्हणून ते वापरणं दुसरी बाब आहे.

अलिफ फार्म्सच्या आशा वाढल्या आहेत हे मात्र नक्की.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)