ICC Womens World Cup: भारताचं वर्ल्डकप सेमी फायनलचं स्वप्न भंगलं; दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय

भारत, दक्षिण आफ्रिका, आयसीसी महिला विश्वचषक

फोटो स्रोत, Peter Meecham

फोटो कॅप्शन, दीप्ती शर्मा
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयसीसी विश्वचषकाच्या अटीतटीच्या मुकाबल्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवासह भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. भारताला या लढतीत विजय अत्यावश्यक होता.

275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर एक धाव झाली. दुसऱ्या चेंडूवर त्रिशा चेट्टी रनआऊट झाली. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एकेक धाव निघाली. पाचव्या चेंडूवर मिगनॉनने फटकावलेला चेंडू हरमनप्रीत कौरच्या हातात जाऊन विसावला. अर्धशतकासह खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मिगनॉनला बाद करणं निर्णायक ठरलं असतं पण हा चेंडू नोबॉल असल्याचं पंचांनी जाहीर केलं.

पुढचा चेंडू फ्रीहिट मिळाला. इस्माइलने एक धाव घेत मिगनॉनला शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक दिला. मिगनॉनने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लौरा वोल्व्हरार्टने 11 चौकारांसह 80 धावांची खेळी केली. लारा गुडॉलने 49 तर मिगनॉनने नाबाद 52 धावांची खेळी केली. मॅरिझॉन कापने केलेली 32 धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली. भारतातर्फे राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारत, दक्षिण आफ्रिका, आयसीसी महिला विश्वचषक

फोटो स्रोत, Peter Meecham

फोटो कॅप्शन, मिगनॉन

मिगनॉनला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी सेमी फायनलमध्ये आगेकूच केली आहे.

तत्पूर्वी स्मृती मन्धाना, मिताली राज, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय संघाने आयसीसी महिला विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत 274 धावांची मजल मारली.

सेमी फायनलमध्ये प्रवेशासाठी भारतीय संघाला या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक आहे.

ख्राईस्टचर्च इथल्या हेगले ओव्हले इथे सुरू असलेल्या लढतीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने या लढतीसाठी अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

स्मृती मन्धाना आणि शफाली वर्मा यांनी 91 धावांची खणखणीत सलामी दिली. या दोघींनी आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौकारांची लयलूट केली. ही भागीदारी आफ्रिकेला अडचणीत आणणार असं चित्र असताना शफाली रनआऊट झाली. तिने 8 चौकारांच्या साह्याने 53 धावांची खेळी केली.

यात्सिका भाटिया 2 धावा करून तंबूत परतली. यानंतर स्मृतीला कर्णधार आणि अनुभवी मिताली राजची साथ मिळाली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या स्मृतीला लासने बाद केलं. तिने 6 चौकार आणि एका षटकारासह 71 धावांची खेळी केली.

भारत, दक्षिण आफ्रिका, आयसीसी महिला विश्वचषक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शफाली वर्मा आणि स्मृती मन्धाना यांनी दमदार सलामी दिली.

मिताली राज-हरमनप्रीत कौर जोडीने चांगली भागीदारी केल्याने भारतीय संघाने अडीचशेचा टप्पा ओलांडला. मितालीने 8 चौकारांसह 68 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने 4 चौकारांसह नाबाद 48 धावांची खेळी केली.

आफ्रिकेकडून शबनिम इस्माईल आणि मासाबटा लासने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सुरुवात केली होती. न्यूझीलंडविरुद्ध मात्र भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

या पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 155 धावांनी धुव्वा उडवता मुसंडी मारली. पण या कामगिरीची पुनरावृत्ती इंग्लंडविरुद्ध करता न आल्याने भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

भारत, दक्षिण आफ्रिका, आयसीसी महिला विश्वचषक

फोटो स्रोत, Kai Schwoerer-ICC

फोटो कॅप्शन, मिताली राज

ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सनी विजय मिळवल्याने भारतीय संघासाठी सेमी फायनलची वाट बिकट झाली. पण बांगलादेशविरुद्ध 110 धावांनी दमदार विजय मिळवत भारतीय संघाने सेमी फायनलच्या आशा जिवंत राखल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी भारतीय संघासमोर आहे. भारताने आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघातील खेळाडू उत्तम फॉर्मात आहेत. मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. भारतीय संघाच्या शिलेदार या दोघींना विश्वचषकसह निरोप देण्याचा यंग ब्रिगेडचा प्रयत्न असू शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)