रशिया युक्रेन युद्ध : अर्थपूर्ण चर्चा व्हावी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची मागणी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोणत्याही प्रकारचा विलंब न करता शांतता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला चर्चेसाठी आवाहन केलं आहे.

ते म्हणाले की, "युद्ध सुरूच राहिलं तर रशियाचं इतकं नुकसान होईल की सावरण्यासाठी येणाऱ्या अनेक पिढ्या खर्ची पडतील. रशियाने चूक करत स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलेलं आहे. त्यातून सावरण्याची ही रशियाकडची एकमेव संधी आहे. आपण भेटण्याची - बोलण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही देशांच्या सीमा मर्यादा पुनर्स्थापित करत युक्रेनला न्याय मिळवून देण्याची वेळ आलेली आहे."

दरम्यान रशियाची 12 एअर टार्गेट्स म्हणजेच हवाई हल्ल्यासाठी वापरण्यात येणारी साधनं आपण नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केलाय. यामध्ये 2 विमानं, 3 हेलिकॉप्टर्स, 3 ड्रोन्स आणि 4 क्रूझ मिसाईल्सचा समावेश आहेत.

रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवरील हल्ले सुरूच ठेवलेत.

रशियन रिपोर्टसची खातरजमा करून मारियुपोलच्या महापौरांनी, आता हे युद्ध शहराच्या मध्यभागी पोहोचलं असल्याची माहिती दिली. रशियाने सुरू केलेल्या बॉम्ब हल्ल्यात शहरातील 80% पेक्षा जास्त निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर काही इमारती नष्ट झाल्या आहेत.

गुरुवारी रशियाने बॉम्बफेक केलेल्या मारिओपोलमधील थिएटरच्या तळघरात अजूनही शेकडो लोक अडकले आहेत.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशियच्या गोळीबारामुळे, सैन्याने वेढा दिलेल्या शहरांमध्ये, अधिकाऱ्यांना लोकांना मदत पुरवताना अडचणी येत आहेत.

तर क्रायमियाच्या विलीनीकरणाला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये आयोजित रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. यावेळी पुतिन लोकांना संबोधित करताना म्हणाले की, "आम्ही आखलेल्या सर्व योजना निश्चितपणे पूर्ण करू." मात्र सरकारी टीव्हीवर दाखवण्यात येत असलेला कार्यक्रम अचानकच बंद पडला. यावर क्रेमलिनने तांत्रिक त्रुटीमुळे हे घडल्याचं सांगितलं आहे.

हे युद्ध 4 कोटी लोकांना आत्यंतिक गरिबीकडे नेईल असा गंभीर इशारा यूएस थिंकटँकच्या वतीने देण्यात आला आहे.

24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून जागतिक अन्न आणि ऊर्जेच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

तर किंमतींमध्ये होणारी वाढ बघतात या प्रमाणात तर जगभरातील 4 कोटींहून अधिक लोक "अत्यंत गरिबी" मध्ये ढकलले जाऊ शकतात असा इशारा सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट या अमेरिकन संस्थेने दिला आहे.

हे आकडे विशेषत: पूर्वीच्या सोव्हिएत प्रदेशाच्या कृषी व्यापारासाठी किती महत्त्वाचे आहेत हे दाखवते. जगातील गहू उत्पादनात 29% वाटा हा रशिया आणि युक्रेनचा आहे. रशिया आणि बेलारूसमध्ये जगातील एक षष्ठांश खतांची निर्मिती आहे.

थिंक टँकच्या मते, या युद्धाचा प्रभाव व्यापकपणे जाणवेल, मात्र याचा सर्वात मोठा फटका गरीब देशांना बसेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)